उमेदवारी जाहीर झाल्यावर मग या नेत्यांना कळेल : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादीतील नेते सत्ताधारी पक्षात जात असले तरी, कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. ते कायम संपर्कात आहेत. ही आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे.
- अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

पुणे - भाजप-शिवसेनेमध्ये विरोधी पक्षांतील नेते मोठ्या प्रमाणात जात आहेत; परंतु विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षात प्रवेश करणारे नेते सैरभैर होतील. त्यामुळे महाराष्ट्रात वेगळे चित्र पाहायला मिळेल, असे भाकित माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. 

पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या बुधवार पेठ शाखेचे स्थलांतर गुरुवार पेठेतील जैन मंदिराजवळ झाले. या नवीन कार्यालयाचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. भाजप-शिवसेनेमध्ये कितीही नेते प्रवेश करत असले, तरी विधानसभेच्या २८८च जागा आहेत. त्यापेक्षा जास्त जागा लढवता येणार नाहीत, असा उपरोधिक टोला मारत पवार म्हणाले, ‘‘या दोन्ही पक्षांची युती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत; पण युती झाली तर प्रत्येकी १४४ च्या जवळपास जागा मिळतील. भाजपचे सध्या १२३ आमदार आहेत. सात-आठ अपक्ष आमदार भाजपसोबत आहेत. त्यात परत आत्ता भाजपमध्ये प्रवेश करणारे आहेतच.

नव्याने पक्षात आलेले, निष्ठावंत कार्यकर्ते यांना सामावून घेताना त्यांची तारेवरची कसरत होईल. पक्षांतर केलेले नेते सैरभैर होतील. त्यामुळे उमेदवारी जाहीर होताना महाराष्ट्रामध्ये वेगळे चित्र पाहायला मिळेल.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Candidate Ajit Pawar NCP Politics