Vidhansabha 2019 : देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा 1 ऑगस्टपासून

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 24 July 2019

यात्रेच्या प्रवासाचे विभागश : विवरण पुढीलप्रमाणे -
विदर्भ- 1232 , किलोमीटर (44 मतदारसंघ)
उत्तर महाराष्ट्र - 633 किलोमीटर (34 मतदारसंघ )
मराठवाडा -1069 , किलोमीटर ( 28मतदारसंघ)
पश्‍चिम महाराष्ट्र - 812 किलोमीटर (29 मतदारसंघ)
कोकण - 638 किलोमीटर (15 मतदारसंघ)

भाजपच्या विधानसभा प्रचारास सुरवात
मुंबई - भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून येत्या 1 ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 150 विधानसभा मतदारसंघात महाजनादेश यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेचे उद्धघाटन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते तर समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहाणार आहेत.

राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून 1 ऑगस्ट पासून प्रारंभ होणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून सुरु होणाऱ्या या यात्रेचा समारोप 31 ऑगस्ट रोजी नाशिकयेथे होणार आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून एक ते नऊ ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा होणार असून या भागातील एकुण 14 जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान 57 विधानसभा मतदार संघातून, 1639 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे. यात्रेचा दुसरा टप्पा 17 ऑगस्ट रोजी सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यांत ही यात्रा 18 जिल्ह्यातल्या 93 विधानसभा मतदारसंघात , 2475किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. यात्रेचा एकूण प्रवास 32 जिल्ह्यांतून 4384, किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून 150 विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान 87 मोठ्या सभा, 57 स्वागत 238 सभा होणार आहेत. याशिवाय एकुण पेक्षा अधिक गावांमध्ये स्वागत स्वीकारून यात्रा नाशिक येथे पोहोचेल. या यात्रेचे प्रमुख प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर हे आहेत.

यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी आणि समारोप प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. फडणवीस सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचे दर्शन घडविणारा एलईडी रथ यात्रेबरोबर असणार आहे. तसेच यात्रेदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यात्रा ज्या-ज्या जिल्ह्यांतून प्रवास करेल तेथे त्या-त्या जिल्ह्यांतील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

त्या त्या विधानसभा क्षेत्रात आयारामांचा होणार भाजपमध्ये प्रवेश
भाजपमध्ये येण्यास इच्छुक असलेल्या आयारामांचा या यात्रेदरम्यान त्या त्या विधानसभा मतदारसंघात पक्षप्रवेश होणार आहे. यावेळेस शक्‍तीप्रदर्शन ही केले जाणार आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षासह शिवसेनेतील ही आजी माजी आमदार, मंत्री, तसेच ताकदवर नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री होण्याची ईच्छा बाळगणे गैर नाही - पाटील
शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचे नाव शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री पदासाठी घेतले जाते याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की मुख्यमंत्री होण्याची ईच्छा बाळगणे गैर नाही. मात्र मला याबाबत काही माहित नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Devendra Fadnavis Mahajanadesh Yatra Politics