अद्याप सरकार स्थापनेची कोंडी कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 5 November 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस लोटले, तरी महाराष्ट्रात अद्याप सरकार स्थापनेबाबतची कोंडी कायम आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा आता दिल्लीदरबारी पोचला असून, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील पीक नुकसानीबरोबरच राजकीय घडामोडींचेही ब्रिफिंग केले. त्याचवेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा घेतला. दहाव्या दिवसांनंतरही सत्तास्थापनेची कोंडी फुटलेली नाही.

दिल्लीत फडणवीस शहा भेट; तर शरद पवारांची सोनियांशी चर्चा
मुंबई/नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस लोटले, तरी महाराष्ट्रात अद्याप सरकार स्थापनेबाबतची कोंडी कायम आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा आता दिल्लीदरबारी पोचला असून, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील पीक नुकसानीबरोबरच राजकीय घडामोडींचेही ब्रिफिंग केले. त्याचवेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा घेतला. दहाव्या दिवसांनंतरही सत्तास्थापनेची कोंडी फुटलेली नाही.

एकीकडे सत्तास्थापनेबाबतची अनिश्‍चितता आणि दुसरीकडे पावसामुळे पिकांची झालेली हानी, या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी दिल्ली गाठली.

फडणवीस यांनी आज अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन सरकार स्थापनेच्या रणनीतीची चर्चा केली आणि ‘लवकरात लवकर आम्ही नवे सरकार देऊ,’ असे आत्मविश्‍वासाने भरलेले विधान त्यांनी केले. अमित शहा यांच्या निवासस्थानी चाळीस मिनिटे दोन्ही नेत्यांची बंद दरवाजाआड खलबते झाली. भाजपच्या अन्य कोणत्याही नेत्याचा त्यात सहभाग नव्हता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी युतीच्या कोंडीवर भाष्य करण्याचे टाळताना सरकार स्थापनेच्या हालचालींवर आणि शिवसेनेकडून होणाऱ्या आक्रमक दाव्यांबद्दल बोलण्यास नकार दिला.

शरद पवार-सोनिया गांधी भेट
आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप श्रेष्ठींची भेट घेतलेली असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या राजधानीत भेटी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. शिवसेनेचा १७० संख्याबळाचा दावा, या पार्श्‍वभूमीवर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीबद्दल तर्कवितर्क लढविले जात होते. माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी राज्यातील नेत्यांशी चर्चेनंतर पुन्हा सोनिया गांधींना भेटणार, असे सांगून सरकार स्थापनेचे गूढ आणखी वाढविले. पवार म्हणाले की, निवडणूक निकालानंतर स्थानिक परिस्थितीबाबत काँग्रेस नेतृत्वाला कळविण्यासाठीची आजची भेट होती. ही भेट पर्यायी सरकार स्थापनेसाठी आहे काय? यावर थेट बोलण्याचे पवार यांनी टाळले. मात्र, ‘महाराष्ट्रातील जनभावना भाजपच्या विरोधातील आहे,’ अशी पुस्ती त्यांनी जोडली. एवढेच नव्हे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्यावरही त्यांनी संदिग्धता कायम ठेवली.

राऊत यांची राज्यपालांसोबत चर्चा
दिल्लीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत कोंडी सोडण्याचे प्रयत्न सुरू असताना इकडे मुंबईत शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना भेटलो. ही केवळ सदिच्छा भेट होती. त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलत आहे, यावर मी काहीही प्रतिक्रिया देणार नाही. भाजपमधील कोणीही बोलणार नाही. महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्‍यकता असून, नक्कीच सरकार स्थापन होईल. लवकरात लवकर नवे सरकार बनेल. याची आम्हाला खात्री आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

शिवसेनेला आपल्या नेतृत्वाखाली सरकार हवे आहे. हाच आग्रह भाजपचाही आहे. हा त्यांचा अंतर्गत विषय असला, तरी यामुळे निर्माण झालेली स्थिती सोनिया गांधींच्या कानावर घातली आणि पुन्हा भेटण्याचे ठरले. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून पुन्हा सोनिया गांधींना भेटणार.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मंत्रिमंडळातील सर्व मंत्रिपदे तुम्ही घ्या, पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. गेल्या पाच वर्षांत भाजपने सुडाचे राजकारण केले आहे. 
- संजय राऊत, शिवसेना नेते

सत्तास्थापनेला वेळ लागत असला तरीही भाजप-शिवसेनेचेच सरकार स्थापन होणार आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही.
- रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री

जे आमदार स्वपक्षातून फुटून भाजपकडे जातील त्यांच्या विरोधात सर्व पक्ष मिळून एकच उमेदवार उभा करू व त्या फुटीर आमदारांना पाडू. 
- जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष

महाराष्ट्र सरकार स्थापनेबाबत दिल्लीतील नेत्यांनी लक्ष घातलंय ते सर्व बघताहेत. त्यामुळे सगळं व्यवस्थित होईल. सरकार महायुतीचेच होईल. मुख्यमंत्री भाजपचाच होईल.
- गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha government Politics Leader confusion