दारूच्या व्यसनात ‘विजय’ हरला! हॉस्पिटलमध्येच गळफास घेऊन तरुणाने संपविले जीवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
दारूच्या व्यसनात ‘विजय’ हरला! हॉस्पिटलमध्येच गळफास घेऊन तरुणाने संपविले जीवन

दारूच्या व्यसनात ‘विजय’ हरला! हॉस्पिटलमध्येच गळफास घेऊन तरुणाने संपविले जीवन

सोलापूर : दारूच्या व्यसनात विजय पांडुरंग सोनार (रा. हनुमान नगर, भवानी पेठ) याने स्वत:चे राहते घर विकले. त्याच्या त्रासला कंटाळून बायको माहेरी निघून गेली. आजारी असल्याने त्याने सिव्हिलमधून उपचार घेतले. पण, राहायला घर नसल्याने तो आईसोबत सिव्हिल हॉस्पिटलमधील ‘बी’ ब्लॉकसमोर राहत होता. त्याने शनिवारी (ता. ३०) पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास हॉस्पिटलमधील विसावा कक्षातील लोखंडी ॲंगलला वायरच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

भवानी पेठेत राहणाऱ्या विजयला वडिल नव्हते आणि त्यामुळे त्याचा सांभाळ आईनेच केला. त्यानंतर आईने त्याचा विवाह लावून दिला. स्वत:च्या घरात विजयचा सुखाचा संसार सुरु होता. पण, विजयला दारुचे व्यसन लागले आणि विजयच्या संसारात वाद होऊ लागले. व्यसनाच्या आहारी गेलेल्या विजयने ना आईचे ना बायकोचे ऐकले. दारुच्या तो एवढा आहारी गेला की, त्याने स्वत:चे राहते घर विकून टाकले. त्याला दुखापत झाली होती म्हणून आईने विजयला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. महिन्यापूर्वी त्याला डिस्चार्ज मिळाला होता. पण, त्यांना राहायला हक्काचे घर नसल्याने विजय हा आईसोबत सिव्हिल हॉस्पिटलमधील ‘बी’ ब्लॉकसमोरील विसावा कक्ष परिसरात राहत होते. त्यावेळी विजय हा रोजनिशी लिहायचा. शनिवारी (ता. ३०) तो आईसोबत विसावा कक्षात झोपला होता. आई गाढ झोपेत असताना त्याने पहाटेच्या सुमारास वायरच्या मदतीने त्याचठिकाणी गळफास घेतला. तेथील सुरक्षारक्षकांना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सिव्हिल पोलिस चौकीला कळविले. त्यानंतर सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पोपटराव धायतोंडे, पोलिस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, पोलिस नाईक विजय जमादार हे घटनास्थळी दाखल झाले. बेशुध्दावस्थेतील विजयला दवाखान्यात नेले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

रोजनिशीत लिहिली दारुमुळे झालेली वाताहात
सर्वकाही ठिक सुरु असतानाच दारुच्या व्यसनाने विजयचे आयुष्य बरबाद झाले. त्याचे हसते-खेळते कुटुंब रस्त्यावर आले. आईच्या म्हातारपणात तो आईचा आधार बनायला हवा होता, त्यावेळी त्याला आईनेच सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आयुष्यातील सर्व घटना विजय दररोज त्याच्याजवळील वहीत लिहून ठेवत होता. सदर बझार पोलिसांना मयत विजयच्या आईजवळील पिशवीत विजयची रोजनिशी आढळली. त्यात त्याने स्वत:ला दारुचे व्यसन लागल्यानंतर झालेली वाताहात लिहून ठेवली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Vijay Death In Alcohol Addiction The Young Man Ended His Life By Hanging Himself In The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top