विजयसिंह मोहिते-पाटील भाजपच्या विशेष निमंत्रित यादीमध्ये 

संतोष सिरसट 
शुक्रवार, 3 जुलै 2020

विशेष निमंत्रीतांमध्ये दोन देशमुख तर निमंत्रितात माजीमंत्री ढोबळे 
भाजपने आज 58 जणांची विशेष निमंत्रित सदस्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय निमंत्रीत यादीमध्ये माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील, राजेंद्र मिरगणे यांचाही समावेश आहे. प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राजश्री नागणे यांचा समावेश आहे. सोलापूरच्या भाजप जिल्हाध्यक्षपदी सांगोल्याच्या श्रीकांत देशमुख यांची निवड केली आहे. 

सोलापूर ः राष्ट्रवादीचे नेते, माजी खासदार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव भाजपच्या प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये घेण्यात आले आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने सुरवात झालेल्या या यादीमध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव 17 व्या क्रमांकावर आहे. मात्र, त्यांचा जिल्हा सातारा दाखविला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून मी राष्ट्रवादीतच असल्याचे सांगणारे मोहिते-पाटील आता खरोखरच भाजपवासी झाल्याचे या यादीतील नावावरुन दिसून येते. 

लोकसभा निवडणुकीच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी जाहीर सभा अकलूज येथे घेण्यात आली होती. त्या व्यासपीठावर माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पहिल्यांदा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या सभेमध्ये विजयसिंह मोहिते-पाटील व्यासपीठावर होते. पण, आपण राष्ट्रवादीच असल्याचे त्यानंतरही त्यांनी सांगितले होते. पण, आज जाहीर झालेल्या यादीत श्री. मोहिते-पाटील यांचे नाव आहे. त्यामुळे तेही आता भाजपवाशी झाल्याचे स्पष्ट होते. 

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत भाजपला झाला. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना माळशिरस तालुक्‍यातून लाखाच्यावर मताधिक्‍य देण्यात आले होते. तेव्हापासून भाजपमध्ये मोहिते-पाटील यांचा बोलबाला सुरु झाला होता. त्यावर आता विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या निवडीने शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट होते. विजयसिंह यांच्यामुळे एक जाणकार राजकारणी भाजपच्या गोटात सामील झाले असल्याचा आनंद भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे. मोहिते-पाटील यांच्या नावासमोर सातारा जिल्हा असे लिहिले आहे. पण, सातारा जिल्ह्यात या नावाचे कोणीही राजकीय व्यक्ती नाहीत. त्यामुळे हे मोहिते-पाटील अकलूजचेच असल्याचे स्पष्ट होते. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Singh Mohite-Patil in BJP's special invited list