महाविजयात महिलांचा मोठा वाटा 

विजया रहाटकर
शुक्रवार, 24 मे 2019

"मोदीजीने हमे गैस दिया,' असे सांगताना अमेठी मतदारसंघातील बन्ना टीकर गावातील रुक्‍मिणी कश्‍यप ओक्‍साबोक्‍सी रडू लागली.

"मोदीजीने हमे गैस दिया,' असे सांगताना अमेठी मतदारसंघातील बन्ना टीकर गावातील रुक्‍मिणी कश्‍यप ओक्‍साबोक्‍सी रडू लागली. म्हणाली, "आई नाही, वडील नाही, पतीही नाही. पदरी एक लहान मुलगी. मरण्यापूर्वी वडिलांनी "प्रधानमंत्री आवास योजने'चा अर्ज भरला होता. तो मंजूर झाला आणि मला  घर मिळाले. मोदी नसते तर मला कोणी आश्रय दिला असता?' भाजप महिला मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने या निवडणुकीत मी जवळपास देश पालथा घातला. सुमारे 27 हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करून 16 राज्यांमधील 52 मतदारसंघांमध्ये 92 सभा घेतल्या. पण, त्या नुसत्या सभा नव्हत्या, तो संवाद होता- विशेषतः महिला मतदारांशी. महिना उलटलाय; पण ती ढसाढसा रडणारी रुक्‍मिणी डोळ्यांसमोरून हटत नाही. रुक्‍मिणीचा भावनावेग आवरण्यापूर्वी तिच्या शेजारी असलेल्या सत्तरीतील सुशीलाजी उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, ""मोदी राज में हमें आवास, शौचालय और बिजली मिली, मोदी तो हमारे हृदय में बसे है,'' पण अशी एखादीच रुक्‍मिणी किंवा सुशीला नाहीत. त्यांच्यासारख्या मोदी सरकारच्या  लाभार्थ्यांची संख्या काही कोटींमध्ये असू शकते. त्यामुळे आज मोदींना जे भरभरून यश मिळालंय, त्याचं मला आश्‍चर्य वाटत नाही. निवडणूक जाहीर झाल्यानंतरचे पन्नास दिवस आणि तत्पूर्वीचे सहा-आठ महिने आम्ही पायाला भिंगरी लावल्यासारखे पळत होतो. सरकारच्या लाभार्थ्यांशी संपर्क साधणं, एवढंच उद्दिष्ट होतं. हे करताना जाणवत होतं, की मोदींनी स्वतःची एक जबरदस्त मतपेढी (संकुचित नव्हे, तर सकारात्मक व व्यापक अर्थाने) बांधलीय. ती म्हणजे महिला आणि अतिगरिबांची! 

सर्वसामान्यांना कदाचित खरे वाटणार नाही. पण, वस्तुस्थिती ही आहे, की मोदींच्या योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या 32 कोटींच्या पलीकडे जाईल. उज्ज्वला योजनेत साडेसात कोटी, मुद्रा योजनेत सुमारे 16 कोटी (त्यात 12 कोटींहून अधिक महिलांना लाभ), दोन कोटी घरे, नऊ कोटी शौचालये, दोन कोटी घरांमध्ये प्रथमच वीज, सुकन्या समृद्धी योजनेत दीड कोटींहून अधिक खाती, जनधन योजनेत 32 कोटींहून (ज्यात महिलांचं प्रमाण 18 कोटींहून) अधिक बॅंक खाती... काहींना तर अनेक योजनांचा लाभ झालेला. उच्च मध्यमवर्गीयांना गॅस, वीज, शौचालये यांचे महत्त्व समजणार नाही. त्यामुळे ते मोदींनी काय केले, असा प्रश्न विचारू शकतात. पण, अंधार होण्याची वाट पाहणाऱ्या माय-बहिणींना शौचालयाचे महत्त्व विचारा, प्रथमच वीज आल्याचा आनंद गरीब  घरातील भगिनीला, त्यांच्या मुलाबाळांना विचारा, आयुष्यभर विषारी धूर पचविणाऱ्या माऊलीला विचारा प्रदूषणविरहित गॅसचे सुख काय असते ते.... 

मोदींच्या सर्व प्रमुख योजनांच्या केंद्रस्थानी आहेत महिला. उज्ज्वला असो, मुद्रा असो, शौचालय असो अथवा घरे  असोत. स्वातंत्र्योत्तर काळातील कदाचित हे पहिलेच सरकार असेल, की ज्याच्या धोरणांच्या केंद्रस्थानी निःसंशयपणे महिला होत्या. 
अगदी जन्मापासून ते वृद्धापकाळापर्यंत महिलांसाठीच्या योजना सरकारने आखल्या, त्यांच्यासाठी कायदे केले. महिला व बालकांची तस्करी रोखण्यासाठी 
कायदा केला. "तोंडी तलाक'सारखी कुप्रथा मोडून काढण्यासाठी कायदा करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्रिमंडळात सात महिला कॅबिनेट मंत्री, मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीत सुषमा स्वराज व निर्मला सीतारामन यांच्या रूपाने प्रथमच दोन महिला, सहा महिला राज्यपाल... महिलांचे इतके आर्थिक, सामाजिक व राजकीय सक्षमीकरण यापूर्वी क्वचितच झाले असेल. 

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ठरला तो महागाईवरील नियंत्रण. महागाई हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. मोदींच्या कारकिर्दीत बहुतांश जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव स्थिर राहिले. कदाचित स्वातंत्र्योत्तर काळानंतर ही पहिलीच निवडणूक होती, की त्यात महागाईचा (आणि हो भ्रष्टाचाराचाही) मुद्दा गायब आहे. 

विरोधकांना महागाईवर काही बोलता आले नाही, हे मोदींचे मोठे यश आहे. या सर्वांचा परिपाक असा होता, की महिलांमध्ये मोदींनी स्वतःची एक ठाशीव मतपेढी बांधल्याचे जाणवत होतेच; पण प्रचारात तर ते ठळकपणे जाणवले. अमेठीसारख्या मागास ठिकाणच्या महिला मोदींबद्दल इतक्‍या कौतुकाने बोलतात, तेव्हा त्या मतपेढीच्या ताकदीची प्रचिती येते. या वेळेला महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का हे त्याचेच फलित म्हणता येईल. तब्बल तेरा राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान जास्त झाले, ही त्यावर शिक्कामोर्तब करणारी बाब. म्हणून तर मी सुरवातीपासून म्हणत होते, की आमची ब्रह्मास्त्रे दोन : मोदी आणि महिला ! हा अंदाज प्रत्यक्षात खरा ठरल्याचा आनंद वाटतो. निःसंशयपणे मोदींच्या या विजयात मोठा वाटा महिलांचा आहे. 

याआधी जातींच्या व धर्माच्या मतपेढ्या बांधल्या गेल्या. पण, प्रथमच महिलांची मतपेढी उदयास आली आणि त्याचे श्रेय मोदींना, त्यांच्या महिलाकेंद्री  धोरणांना आहे. सतराव्या लोकसभेचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य राहील. या जनादेशाचा सखोल अभ्यास केला जाईल, तेव्हा मोदींनी "सायलेंट'ली  बांधलेल्या या मतपेढीचे महत्त्व लक्षात येईल. 

विजया रहाटकर,  (राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप महिला मोर्चा) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijaya Rahatkar article Women have a big share in the victory