विखे पाटलांकडे गृहनिर्माण, तर अनिल बोंडे कृषीमंत्री

cabinet
cabinet

मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या "टीम देवेंद्र'च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे. अनिल बोंडे यांच्याकडे कृषी खात्याचा भार सोपविण्यात आला आहे. 

प्रकाश महेतांसह बड्या मंत्र्यांना डावलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथविधी सोहळ्यानंतर खातेवाटपात मोठे फेरबदल केले असून, विनोद तावडे यांच्याकडील शालेय शिक्षण खाते त्यांचेच मित्र आशीष शेलार यांच्याकडे सोपविले आहे. महेता यांच्याबद्दलचा लोकायुक्‍तांचा अहवाल कृती अहवालासह अधिवेशनात सादर केला जाईल, त्यांच्याकडील महत्त्वाचे असणारे गृहनिर्माण खाते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. शिवसेनेतील तानाजी सावंत यांना जलसंधारणाचा कार्यभार देण्यात आला आहे, तर विशेष मागास प्रवर्ग खाते आता नवे मंत्री संजय कुटे सांभाळतील. डॉ. अनिल बोंडे यांना कृषी खाते देण्यात आले आहे. तावडे यांचे उच्च व तंत्र शिक्षण खाते कायम आहे, तसेच ते सांस्कृतिक आणि संसदीय कामकाज खाते सांभाळतील. सुरेश खाडे यांना सामाजिक न्याय खाते देण्यात आले.

या खात्याचे मंत्रीद्वय राजकुमार बडोले आणि दिलीप कांबळे यांचा अगोदरच राजीनामा घेण्यात आला आहे. अशोक उईके हे आता विष्णू सवरा यांच्या राजीनाम्याने रिक्‍त झालेल्या आदिवासी विकास विभागाचे काम करतील. संभाजी पाटील निलंगेकर यांचे कामगार खाते कुटे यांच्याकडे वर्ग केले गेले. ते आता अन्न व नागरी पुरवठा तसेच कौशल्य विकासाकडे लक्ष पुरवतील. मुंबईचे योगेश सागर आता नगरविकासराज्यमंत्री असतील. 

बड्यांना डच्चू 
राजभवनाच्या प्रांगणात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. या सोहळ्यास मंत्रिमंडळातील सदस्य, नवनियुक्‍त मंत्र्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, कार्यकर्ते यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहतादेखील उपस्थित होते. 

जुन्या मंत्रिमंडळातील सहा वादग्रस्त आणि अकार्यक्षम मंत्र्यांना मंत्रिपद गमवावे लागले असून, त्यामध्ये "एमपी मिल कंपाउंड गृहनिर्माण' प्रकल्पात लोकायुक्‍तांनी ठपका ठेवलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, आदिवासी विभाग राज्यमंत्री राजे अंबरीश अत्राम, सामाजिक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा समावेश आहे. 

चार महिन्यांची संधी 
विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली असून, राज्य विधिमंडळाच्या उद्या (ता. 17)पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी हा मंत्रिमंडळाचा शपथविधी घाईघाईत उरकण्यात आला. चार वर्षांत ज्यांना संधी मिळाली नाही अशांना शेवटच्या चार महिन्यांत संधी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. यामध्ये विभाग, जातीचा समतोल साधण्याबरोबरच पक्षविस्तारासाठी मेहनत केलेल्यांचादेखील सन्मान करण्यात आला आहे. 

अखेर शेलारांची वर्णी 
मुख्यमंत्र्यांनी गेल्या साडेचार वर्षांत मंत्रिपदापासून सातत्याने दूर ठेवलेले आशिष शेलार यांना शेवटच्या चार महिन्यांसाठी का होईना मंत्रिमंडळात स्थान द्यावे लागले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत जवळपास शिवसेनेच्या तोडीस तोड कामगिरी करत नगरसेवक निवडून आणणे, लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मुंबईतल्या तिन्ही जागा कायम ठेवण्याची कामगिरी केल्याने त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. 

विदर्भाला पाच मंत्रिपदे 
मंत्रिमंडळ फेरबदल करताना विदर्भाला झुकते माप देत मुंबईवरदेखील मंत्रिपदांची बरसात करण्यात आली आहे. भाजपने त्यांच्या अकार्यक्षम मंत्र्यांना वगळण्याची हिंमत दाखवली असली, तरी शिवसेनेने मात्र त्यांच्या सर्व मंत्र्यांना कायम ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांनी विदर्भातल्या तीन मंत्र्यांना वगळले असले, तरी त्याबदल्यात पाच मंत्रिपदे विदर्भाच्या वाट्याला आली आहेत. प्रकाश महेतांचे मुंबईतले कॅबिनेटपद गेले असले, तरी मुंबईच्या आशिष शेलार यांना कॅबिनेट आणि योगेश सागर, तसेच भाजपच्या हिश्‍शातील "आरपीआय'चे अविनाश महातेकर यांना राज्यमंत्रिपद गेल्याने मुंबईला नव्याने एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदे मिळाली आहेत. 

विखेंना मान 
विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग केल्यानंतर आताही भाजपचे सदस्यत्व न घेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. माजी मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळ फेरबदलात प्रथम शपथ घेण्याचा मान मिळाला. या वेळी त्यांचे पुत्र आणि खासदार सुजय विखे पाटील कुटुंबासह उपस्थित होते. 
शेगावचे डॉ. संजय कुटे हे शपथ घेत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांमधून "गजानन महाराज की जय'चा जयघोष करण्यात आला. यवतमाळचे विधान परिषदेचे आ. तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी राजभवनाच्या बाहेर मलबार हिल परिसरातच ढोल- ताशा वाजवत गुलालाची उधळण केली. 

मंत्रिमंडळ खातेवाटप पुढीलप्रमाणे :
कॅबिनेट मंत्री 

राधाकृष्ण विखे पाटील - गृहनिर्माण
जयदत्त क्षीरसागर - रोजगार हमी व फलोत्पादन
आशिष शेलार - शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
संजय कुटे - कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण
सुरेश खाडे - सामाजिक न्याय
अनिल बोंडे - कृषी
अशोक उईके - आदिवासी विकास
तानाजी सावंत - जलसंधारण
राम शिंदे - पणन व वस्त्रोद्योग
संभाजी पाटील निलंगेकर - अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण
जयकुमार रावल - अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार
सुभाष देशमुख - सहकार, मदत व पुनर्वसन

राज्यमंत्री
योगेश सागर - नगरविकास
अविनाश महातेकर - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
संजय (बाळा) भेगडे - कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
परिणय फुके - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), वने, आदिवासी विकास
अतुल सावे - उद्योग आणि खणिकर्म, अल्पसंख्याक विकास व वक्फ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com