विलासराव देशमुखांचा 'तो' व्हिडीओ टाकत अशोक चव्हाणांची ममतांवर बोचरी टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banerjee

विलासराव देशमुखांचा व्हिडीओ ट्विट करत चव्हाणांची ममतांवर टीका

नांदेड: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार होत्या. मात्र, त्यांच्या तब्येतीच्या प्रश्नामुळे त्यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. काल त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली आहे. आता त्यांच्या या टीकेवर काँग्रेसकडूनही (Congress) प्रत्युत्तर येत आहेत. आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील ममतांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केलीय आणि विशेष म्हणजे ही टीका करताना त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्याच जुन्या व्हिडीओचा आसरा घेतला आहे.

हेही वाचा: ''महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाश्यांना 'हे' नियम पाळावेच लागतील''

काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी?

ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, आज ज्या प्रकारे देशात फॅसिझम सुरु आहे, त्याविरोधात सक्षम पर्याय निर्माण झाला पाहिजे. मात्र, हे कोणा एकट्याचं काम नाहीये. जो जो सक्षम आहे त्याला घेऊन हे करावं लागेल. भाजपविरोधात लढणारा सक्षम पर्याय असायला हवा, मात्र कोणी लढायला तयार नाही त्याला आम्ही काय करणार? अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे. शरद पवार युपीएमधील सर्वात वरिष्ठ नेते आहेत त्यामुळं शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करायला हवं का? या प्रश्नावर ममता म्हणाल्या की, "अरे.. तुम्ही युपीएची काय भाषा करता? आता युपीए राहिलेली नाहीये. आता फक्त ते जाहीर करायचं राहिलंय" असं त्यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए आता राहिली नसल्याचंच त्यांनी एकप्रकारे म्हटलंय आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

अशोक चव्हाण यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये विलासराव देशमुख यांच्या भाषणातील एक जुना व्हिडीओ आहे. त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलंय की, "काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही." अलीकडे काँग्रेसबाबत काही मंडळी़ंना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमिवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली.

हेही वाचा: 'या' महिलेचं कसलं हे लग्नाचं व्यसन! स्वत:साठी शोधत आहे बारावा वर

या व्हिडीओमध्ये विलासराव देशमुख काँग्रेस पक्षाचा स्वभाव सांगताना दिसून येतात. मला वाटतं काँग्रेसची धडक ही थेट आहे. आपली चाल हत्तीसारखी आहे. त्या मार्गाने जे येतील त्यांना बरोबर घेऊन आणि जे येणार नाहीत, त्यांना बाजूला सारुन जाणारी आपली चाल आहे. आपण उंटासारखं तिरकं आणि घोड्यासारखं अडीच घरं जात नाही. आपला विचार गरीबांसोबत जाणारा, सर्व जातीधर्मीयांना सोबत घेऊन जाणारा विचार आहे, असं म्हणताना यामध्ये विलासराव देशमुख आढळून येतात.

काँग्रेसकडून आली रोखठोख प्रतिक्रिया

ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जवळच्या मानल्या जातात. मात्र, परवा दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी सोनिया गांधींची भेट का घेतली नाही, या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, दरवेळी दिल्लीला आल्यावर मी त्यांची भेट घेणं संविधानानुसार अनिवार्य आहे का? त्यांच्या या उत्तराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली आजची टीका बोचरी मानली जातेय. त्याचं उत्तर आता काँग्रेसने दिलंय. "सगळ्यांना भारतीय राजकारणाचं वास्तव चांगलंच माहितीय. जर कुणी काँग्रेसला वगळून भाजपचा पराभव करण्याची स्वप्ने पाहत असेल तर ते फक्त एक दिवास्वप्नच असेल", अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी केसी वेणुगोपाल यांनी दिली आहे.

Web Title: Vilasrao Deshmukh Video Tweeting Ashok Chavan Harsh Criticism On Mamata Banerjee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..