'रोपवाटिकाचे गाव' म्हणून 'या' गावाची आहे खास ओळख...

सुस्मिता वडतिले 
Tuesday, 28 July 2020

शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. भरपूर लोकांचा शेती हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. जर आपल्या या शेतकरी बांधवाने त्यांच्या शेतात काही पिकवले नाही तर आपण काय खाणार? आपण कसे जगणार? बरोबर ना. तोच शेतकरी आज प्रगतशील शेतकरी बनला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा तालुक्यातील अठरा किलोमीटर अंतरावर वसलेले तमदलगे गाव हे 'प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव' आणि या गावात ७५ रोपवाटिका असल्यामुळे तमदलगे गावाची ओळख 'रोपवाटिकेचे गाव' म्हणून हि झाली आहे.

पुणे : शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. भरपूर लोकांचा शेती हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. जर आपल्या या शेतकरी बांधवाने त्यांच्या शेतात काही पिकवले नाही तर आपण काय खाणार? आपण कसे जगणार? बरोबर ना. तोच शेतकरी आज प्रगतशील शेतकरी बनला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा तालुक्यातील अठरा किलोमीटर अंतरावर वसलेले तमदलगे गाव हे 'प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव' आणि या गावात ७५ रोपवाटिका असल्यामुळे तमदलगे गावाची ओळख 'रोपवाटिकेचे गाव' म्हणून हि झाली आहे.

आपल्या आजुबाजूच्या खेडय़ाप्रमाणेच दोन हजार लोकसंख्या असेलेले हे तमदलगे गाव. या गावात पिढ्यानपिढी शेत व्यवसाय सुरु आहे. १२०० एकर डोंगर भाग आणि ८०० एकर पिकाऊ जमीन आहे, हिच गावाची खरी अमानत आहे. या गावात कोरडवाहू भाग जास्त असल्यामुळे रोपवाटिका मोठ्या प्रमाणावर आहे. गावात भाजीपाला, ऊस यांच्या ७५ छोटया-मोठ्या रोपवाटिका आहे. या गावात रोपवाटिकामुळे पुरुषांसोबतच अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. येथील शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यामुळे या गावात शेती संदर्भात अनेक पुरस्कार मिळाले आहे. त्यात या गावाला देशातील पहिला कृषीपंडित पुरस्कार मिळाला, ही त्या गावाची प्रेरणा आहे. 

या गावातील शेतकऱ्यांच्या जिद्दीतून मेहनतीचे पाणी वाहत राहिले. येथील शेतकरी हे कठोर परिश्रम घेणारे, व्यवस्थित नियोजन करून काम करणारे, नवतंत्रज्ञानाची जोड देणारे, याचा पुरेपूर वापर करत शेती फुलवली आहे. शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यायचा हे या गावाने पुरेपूर समजून घेतले आहे. शेतीत प्रयोग करायचे आणि मेहनत घेऊन ते यशस्वी करायचा ध्यास या गावकरी मंडळींजवळ आहे. पूर्वी या गावात सर्वत्र एक पीक पद्धत होती. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवठ्याची समस्या गंभीर होती. त्यासाठी कृषी क्षेत्रात वेगळे काम करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कृषी पंडित पुरस्काराची योजना जाहीर केली. त्या योजनेत तमदलगे येथील एका शेतकऱ्यांने भाग घेतला. त्यांनी विक्रमी ज्वारीचे उत्पादन घेऊन देशाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला. त्यांचा ट्रॅक्टर भेट देऊन नवी दिल्लीत पंतप्रधानाच्या हस्ते गौरव करण्यात आला.असे एक ना अनेक पुरस्कार या गावातील शेतकऱ्यांनी मिळवले आहेत. 

पूर्वी या गावात पाण्याची टंचाई खूप होती. त्यामुळे शेती पिकत नव्हती. पाण्याची सोय नसल्यामुळे अडचण येत होती. त्यानंतर २०१४-१५ ला महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याकडून कोरडवाहू शेती अभियानातंर्गत सिमेंटचे बंधारे, विदयुत पंप, शेततळे, ग्रीन हाऊस आणि ठिबक सिंचन हे ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना मिळाले आहे. आणि २०१५-१६ ला जलयुक्त शिवार अभियानातंर्गत या गावात पाण्याची सोय झाली. गावात मोठा पाझर तलाव बांधला गेला. एक वर्ष तलाव काठोकाठ भरला गेला की दोन वर्षे गावांतील पाण्याची शाश्वत सोय होऊन जाते. आणि रोपवाटिकेला पुरेपूर पाणी उपलब्ध होते. 

तमदलगे गावातील सरपंच सपना कांबळे म्हणाल्या, तमदलगे गाव हे लहान असले तरी या गावातील प्रत्येक शेतकरी प्रयोगशील आहे. येथील शेतकरी कष्टाळू आहेत. या गावात मोठ्या प्रमाणात रोपवाटिका आहे. त्यामुळे या गावातील लोकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. तसेच रोपवाटिकेवर आधारित इतर व्यवसाय निर्माण झाले आहेत. या गावात शासनाच्या सर्व योजना परिपूर्ण राबवल्या आहेत. गावातील शेतकऱ्यांने चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे शासनाने दखल घेऊन शेतीसंदर्भातील पुरस्कार दिले आहेत. दर्जेदार रोप देण्यामध्ये या गावाची ओळख आहे. आमच्या गावातील शेतकऱ्यांनी कमी पाण्यांमध्ये रोपवाटिकांची निर्मिती केली आहे.

तमदलगेमधील कृषी सहायक शशिकांत कांबळे म्हणाले की, तमदलगे या गावात महाराष्ट्र शासन कृषी विभागाने केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे पाण्याची उपलबद्धता झाल्याने गावातील शेती चांगली पिकू लागली आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचा विकास झालेला आहे. या गावातील शेतकऱ्यांनी कष्टाचे चीज केलेलं आहे. कृषी पर्यटनासाठी हे गाव योग्य ठिकाण आहे. या गावात कृषी पर्यटनाकरिता भविष्यासाठी चांगला वाव आहे. तसेच ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे.  

रोपवाटिका जातात या भागात ... 

या गावातील रोपवाटिका हे पूर्ण महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या ठिकाणी जातात. 

गावात मिळाले हे पुरस्कार... 

कृषिपंडित पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, कृषिभूषण पुरस्कार,  जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषी मित्र पुरस्कार. 

या गावात... 

ऊसाच्या रोपवाटिका          ७२
भाजीपाल्याचे रोपवाटिका   ०३
केळी रायपनिंग चेंबर्स         ०१

शेतात केले जातात हे प्रयोग ...

या गावातील शेतकऱ्यांनी केळीच्या रायपनिंग चेंबर्स(कच्चे केळी पिकवणे), विक्रमी लांबीची काकडी पिकवली, ऊस, केळी, चिकू, दुधाळ जनावरांचा गोठा असे उपक्रम यशस्वी केले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The village is known as a nursery village as there are many types of nurseries in Tamdalge village