गावगुंड होणार तडीपार! झेडपी, महापालिका निवडणुकीपूर्वी सोलापूर पोलिसांनी तयार केली रेकॉर्डवरील ६७०० गुन्हेगारांची यादी; अनेकांवर ‘एमपीडीए’चीही कारवाई

जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीचा नोव्हेंबरमध्ये बिगुल वाजणार आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.
separate police station

police action

ESakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीचा नोव्हेंबरमध्ये बिगुल वाजणार आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील सराईत गुन्हेगारांच्या याद्या पोलिसांनी तयार करून ठेवल्या आहेत.

सोलापूर शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील सुमारे १२०० तर ग्रामीण पोलिसांनी जवळपास ५५०० सराईत गुन्हेगारांची कुंडली काढून ठेवली आहे. आता स्थानिक निवडणुकीचा पहिला टप्पा १० नोव्हेंबरपर्यंत जाहीर होईल. तत्पूर्वी, पोलिस त्यांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहेत. त्यासाठी संबंधितांना बीट अंमलदारांच्या माध्यमातून पोलिस ठाण्यात बोलावून घेतले जात आहे.

निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी त्या सराईत गुन्हेगारांना निवडणूक जाहीर झाल्यापासून मतमोजणी होईपर्यंत शांत बसावेच लागणार आहे. तसेच काहींना निवडणूक होईपर्यंत गावात देखील येता येणार नाही. प्रतिबंधात्मक कारवाईनंतर सर्व सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे.

निवडणुकीपूर्वी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीपूर्वी पोलिस रेकॉर्डवरील सर्व तालुक्यातील सराईत गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर निवडणूक काळात प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. तडीपार, चांगल्या वर्तनाचे बंधपत्र आणि स्थानबद्धता (एमपीडीए), असे कारवाईचे स्वरूप असणार आहे.

- अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

कलमे अन्‌‌ कारवाईचे स्वरूप असे...

  • कलम १२६ व १२९ (पूर्वीचे कलम १०७ व ११०) : या कलमांनुसार गंभीर गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या संशयित आरोपीला किंवा शांततेचा, कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. निवडणूक, सण-उत्सवावेळी अशा गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तनाचे बंधपत्र (बॉण्ड) घेतले जाते. त्यानुसार त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा असते. या काळात गुन्हा केल्यास त्याच्यावर पुढे तडीपारीची कारवाई होऊ शकते.

  • -------------------------------------------------------------------------------------------

  • कलम ५५, ५६ व ५७ : यानुसार महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ अंतर्गत कोणतेही वॉरंट न बजावता अटक केली जाते. शरीराविषयक व मालाविषयक दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर या कलमांतर्गत कारवाई होते. निवडणूक किंवा सण-उत्सवात आवश्यकतेनुसार पोलिस संबंधितांना १५ ते ३० दिवस त्या गावातून, तालुक्यातून तडीपार देखील करू शकतात. गंभीर गुन्हे सतत करत वर्तनात सुधारणा न झाल्यास संबंधितांवर ‘एमपीडीए’अंतर्गत स्थानबद्धतेची देखील कारवाई केली जाते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com