...या तर विनायक मेटे यांच्या बेडुकउड्या; जगताप यांची खोचक टीका!

कृष्ण जोशी
Sunday, 16 August 2020

मराठा आरक्षणावरून राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या मराठा नेत्यांवर टीका करणारे विनायक मेटे एका मराठ्याला दुसऱ्या मराठ्याविरुद्ध झुंजवण्याचे प्रकार करीत आहेत, असा टोला अखिल भारतीय मराठा महासंघाचे संयुक्त सरचिटणीस दिलीपदादा जगताप यांनी लगावला आहे. 

मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या मराठा नेत्यांवर टीका करणारे विनायक मेटे एका मराठ्याला दुसऱ्या मराठ्याविरुद्ध झुंजवण्याचे प्रकार करीत आहेत, असा टोला अखिल भारतीय मराठा महासंघाचे संयुक्त सरचिटणीस दिलीपदादा जगताप यांनी लगावला आहे. 

ही बातमी वाचली का? ...अन्यथा मंत्रालयावर मोर्चा; मराठा महासंघाचा राज्य सरकारचा इशारा

मेटे यांनी नुकतीच राज्य मंत्रीमंडळातील मराठा मंत्र्यांवर मराठा आरक्षणाचे निमित्त साधून टीका केली होती, त्याला जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गेली पंचवीस वर्षे आमदारकी भोगून निरनिराळ्या पक्षांमध्ये उड्या मारणाऱ्या मेटे यांनी मराठा समाजाच्या नावावर राजकारण सुरु केले आहे. आता ते बेडुक उड्यांसारख्या उड्या मारीत असून आरोपांची राळ उडविण्यासाठी आपले राजकीय कौशल्य पणाला लावत आहेत, असेही जगताप यांनी म्हटले आहे.

ही बातमी वाचली का? मुंबईत घरात घुसून विवाहित महिलेवर अत्याचार, तीन नराधमांना अटक

मराठा क्रांती मोर्चा आल्यावर पक्षासह स्वतः घरी बसणारे मेटे आता आरक्षण कृती समितीच्या नावाखाली पुन्हा राजकारण करीत आहेत. क्रांती मोर्चामध्ये स्थान न मिळाल्याने त्यांची अडचण झाली आहे. खरे पाहता मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात होता तेव्हा त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारची मदत केली नाही वा सहभाग घेतला नाही. तरीही आता ते मराठा आरक्षण आपणच मिळवून दिले, अशी शेखी मिरवत असल्याची टीकाही जगताप यांनी केली. 

ही बातमी वाचली का? पनवेल रेल्वेस्थानकात जन्मले बाळ; 10 महिन्यांतील दुसरी घटना

एक दिवसाआड मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांचा राजीनामा मागायचा व त्याचे भांडवल करायचे, हाच उद्योग त्यांनी सुरु ठेवला आहे. मराठा आरक्षणाचा विषय सुरु असताना त्यांनी न्यायालयात याचिका केली नाही किंवा वकिलांबरोबर बैठकांना हजर राहिले नाहीत. त्यामुळे आता नुसती मराठा समाजाच्या नावाने कृती समिती तयार करून काहीही फायदा नाही, असा टोलाही जगताप यांनी लगावला आहे. छत्रपती शिवरायांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक समितीचे मेटे हे पाच वर्षे अध्यक्ष होते. पण मागील पाच वर्षे ते एक वीटही रचू शकले नाहीत व पंतप्रधान मोदी यांनीही जलपूजनाच्या कार्यक्रमात त्यांना दूर ठेवले, असेही जगताप म्हणाले.
------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ...this is Vinayak Mete's frog jump; dilip Jagtap sharp criticis on mete