Andheri By Poll Election: अंधेरी पूर्व निवडणुकीत मतदार कमालीचे निरुत्साही; नेमकं कारण काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andheri By Poll Election

Andheri By Poll Election: अंधेरी पूर्व निवडणुकीत मतदार कमालीचे निरुत्साही; नेमकं कारण काय?

Mumbai: रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झाले. या निवडणुकीवरुन राज्यामध्ये भलतं घमासान झालेलं. शेवटी भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. परंतु आज झालेल्या मतदानप्रक्रियेत मतदारांनी निरुत्साह दाखवला.

आज सकाळी ७ वाजल्यापासून अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत फक्त २८.७७ टक्के मतदान झाले आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी माघारी घेतल्याने हा निरुत्साह दिसून आल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

हेही वाचा: राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

या निवडणुकीमध्ये शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून श्रीमती ऋतुजा रमेश लटके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यापुढे तूल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे त्यांचा विजय सोपा झालेला आहे. भाजपने सुरुवातीला मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्ट्राच्या परंपरेला अनुसरुन उमेदवार देऊ नये, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनीदेखील भाजपने उमेदवार देऊ नये, अशी भूमिका घेतली. शेवटी भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. त्यानंतर मात्र मुरजी पटेल यांचे समर्थक नाराज दिसून आले.

मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान झालं. त्यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान झालं. अशाच संथ गतीनं मतदान प्रक्रिया सुरु राहिली. ३ वाजता मतदानाची टक्केवारी २२.८५ इतकी होती. तर पाच वाजेपर्यंत केवळ २८.७७ टक्के मतदान झालं. सुट्टी जाहीर करुनदेखील मतदारांनी उत्साह दाखवलेला नव्हता.