महाराष्ट्र : मोदींच्या कामाला जनतेचा कौल

देवेंद्र फडणवीस 
रविवार, 26 मे 2019

सरकारच्या कल्याणकारी योजनांवर जनतेने विश्‍वास दाखवला आणि पुन्हा आम्हाला सत्तेवर आणले. विरोधकांच्या नकारात्मकतेला, अपप्रचाराला त्यांनी नाकारले आहे. आम्ही कल्याणकारी कार्य करतच राहू, कारण हाच खरा जनादेश आहे. 

- देवेंद्र फडणवीस 

आम्ही एकेकाळी दोन होतो, 1984 वर्ष होते ते. आज, 2019 च्या ऐतिहासिक निकालानंतर सलग दुसऱ्यांदा, 2014 नंतर आम्ही पुन्हा सत्तेत परतलो आहोत. भाजप म्हणून 300च्या वर आणि रालोआ म्हणून साडेतीनशेवर लोकसभा मतदारसंघांतून विजयी होऊन. 282 चे निर्विवाद बहुमत आम्हाला पाच वर्षांपूर्वी मिळाले होते. जनतेने दिलेल्या कौलाला शिरसावंद्य मानत गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनहिताची कामे करतो आहोत. सत्तेचा विचार आम्ही करतो ते जनहिताचे साधन म्हणून.

सत्ता हे साध्य नाही, तो आमच्यासाठी जनतेची कामे करण्याचा मार्ग. पाच वर्षांत मोदीजींनी गरिबांच्या अन्‌ समाजातल्या सर्व घटकांच्या कल्याणाची ज्या गतीने कामे केली त्याचे फळ म्हणजेच आमची वाढलेली मते. "अब की बार तीन सौ पार', हे आमचे ध्येय प्रत्यक्षात आले ते या कार्यामुळेच. सार्वजनिक आरोग्याचा मूलमंत्र प्रस्थापित करणारे स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, युवकांना स्वयंरोजगार देण्यासाठीची मुद्रा कर्ज योजना, घराघरांत प्रकाश आणणारी उजाला योजना, महिलांचे स्वयंपाकघरातील काम सुकर करणारी उज्ज्वला योजना देशाचे चित्र पालटवणाऱ्या होत्या. हे आपले सरकार असल्याची खात्री जनतेला या योजनांमुळे वाटू लागली. या योजनांची कल्पना आणि त्यांच्या अंमलबजावणीचा आग्रह हे केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांचेच श्रेय आहे. भारतात आणि अर्थातच महाराष्ट्रातही त्यामुळेच भाजपला यश मिळाले. 

प्रचारकाळात अत्यंत हीन पातळीवर टीका केली गेली. विरोधकांनी जातीपातीचे राजकारण केले. कसेही करून सरकार पाडायचेच या एकमेव हेतूने विरोधक काम करत होते. वर्षानुवर्षे भ्रष्टाचाराला साथ देणारे, जनतेची फसवणूक करणारे असत्य आरोप करत होते. देश या नकारात्मक प्रचारात अडकणे तर सोडाच, त्याचा विचारही करायला तयार नव्हता, याची जाणिवही विरोधकांना झाली नाही. विकासाच्या राजकारणावर सुज्ञ मतदारांनी शिक्‍कामोर्तब केले. भाजपच्या मुशीतून तयार झालेल्या कित्येक नेत्यांच्या आणि लाखो निरलस कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आम्ही आज या स्थानावर आलोय. कोट्यवधी भारतीयांच्या आशाआकांक्षांचा स्वर झालो आहोत. महाराष्ट्रात तर 50 टक्‍के मतदारांनी आम्हाला कौल दिलाय. शिवसेना आमच्या समवेत आहे, हे वैचारिक बंधन आहे. हा जनादेश भाजप-शिवसेना युतीवर, आमच्या नव्या कार्यसंस्कृतीवर दाखवलेला विश्‍वास आहे. 

महाराष्ट्र दुष्काळाला सामोरा जात होता. काहीशी घालमेल होत होती आमच्या कार्यकर्त्यांची. पण मतदार आमच्या कामांवर विश्‍वास ठेवतील, अशी खात्री होती. जनतेने जो विश्‍वास दाखवला तो आम्ही सार्थ करू. हा कौल निर्णायक आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या आक्षेपांवर बोलायचे तरी काय? त्यांचा असत्य, अयोग्य प्रचार जनता जनार्दनाने नाकारलाय. मोदींचे नेतृत्व, पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे काटेकोर नियोजन, माझ्या सहकाऱ्यांची साथ अन्‌ कार्यकर्त्याची मेहनत, माझ्या सरकारवर दाखवलेल्या विश्‍वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. 

"पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढते जाना', ही आम्हाला मिळालेली शिकवण. नवभारताच्या निर्मितीचा हा प्रवास आहे. या प्रवासात सामील प्रत्येकानेच राष्ट्रकार्यात योगदान द्यावे हीच अपेक्षा. पक्षाच्या वैचारिक भूमिका जपत असतानाच, ध्येय एक मानूया, नवभारत घडवूया! यात महाराष्ट्र सिंहाचा वाटा उचलेल. "परं वैभव नेतुमेतत स्वराष्ट्रं, 
समर्था भवत्वाशिषा ते भृशम. 

आम्ही केलेल्या कामाच्या जोरावरच जनतेत जाऊ! लोकसभेच्या निकालांचीच पुनरावृत्ती विधानसभेतही होईल, हा विश्‍वास आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voters Supported Modis Work Article by Devendra Fadnavis