शिक्षक, पदवीधरसाठी उद्या मतदान, भाजप-शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला

Voting for teachers, graduation voting tomorrow, BJP-Shiv Sena's reputation
Voting for teachers, graduation voting tomorrow, BJP-Shiv Sena's reputation

मुंबई : सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर, तसेच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 25) मतदान होणार आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक, अशा चारही मतदारसंघांतील निवडणूक प्रचार शनिवारी संपला. विधान परिषदेतील संख्याबळ वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत जोर लावला आहे. 

विधान परिषदेच्या चार जागांपैकी मुंबई आणि कोकण पदवीधर मतदासंघातील निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी आहे. मुंबईमध्ये शिवसेनेने सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याऐवजी विलास पोतनीस यांना मैदानात उतरवले आहे. भाजपने शिवसेनेच्या विरोधात अमितकुमार मेहतांना उमेदवारी दिली आहे. पोतनीस यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठका घेतल्या आहेत. मेहतांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी नगरसेवक, तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. शिवसेना आणि भाजप उमेदवाराच्या व्यतिरिक्त कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तसेच डाव्या पक्षांचा पाठिंबा असलेले शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र कोरडे हे रिंगणात उतरले आहेत. याशिवाय मराठी भाषा केंद्राचे डॉ. दीपक पवार यांनीही जोर लावला आहे. 

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे. भाजपने "राष्ट्रवादी'तून आलेल्या निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे; तर डावखरेंना रोखण्यासाठी "राष्ट्रवादी'ने ठाण्यातील नगरसेवक नजीब मुल्लांना उमेदवारी दिली आहे. मुल्लांसाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. शिवसेनेने येथून ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी दिली आहे. मोरे यांना निवडून आणण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. 
मुंबई शिक्षक हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. 

मात्र, 12 वर्षांपासून कपिल पाटील यांनी या मतदारसंघात जम बसवला आहे. हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने या मतदारसंघातून अनिल देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर असेल. शिवसेनेने येथून शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी दिली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपचे अनिकेत पाटील, शिवसेनेचे किशोर दराडे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, "टीडीएफ'चे भाऊसाहेब नारायण कचरे आणि कॉंग्रेस-"राष्ट्रवादी'चा पाठिंबा असलेले संदीप बेडसे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. 

विधान परिषद लढतीचे चित्र 
मतदारसंघ मतदार संख्या 

मुंबई पदवीधर 70 हजार 636 
कोकण पदवीधर 1 लाख 4 हजार 264 
मुंबई शिक्षक 10 हजार 141 
नाशिक शिक्षक 53 हजार 892 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com