

सकाळ सोशल फाउंडेशन" च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी "सोशल फॉर अॅक्शन" हा ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला आहे. या वेबसाईटला उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्थां व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी "सोशल फॉर अॅक्शन" क्राउड फंडींगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाईल. ४ एप्रिल २०२१ रोजी, प्रसिद्ध झालेल्या पहिल्या भागात आपण पुणे - सातारा रोडवरील वाई येथील अनाथ व मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या "यशोधन ट्रस्ट" या स्वयंसेवी संस्थेबद्दल आपण माहिती घेतली होती. तसेच ११ एप्रिल २०२१ रोजी , " यशोधन ट्रस्ट " कडून एका मनोरुग्णांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना त्याला त्याच्या कुटुंबीयांपर्यंत कसे पोहोचविले याविषयी आपण माहिती घेतली. दोन्ही लेखांमुळे महाराष्ट्रातून " यशोधन ट्रस्ट " साठी आर्थिक मदतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पण संस्थेला इतर खर्च सोडून केवळ अनाथ - बेघर व मनोरुग्णांच्या आरोग्य तपासणी व औषध - उपचारांचा वार्षिक खर्च पाच लाख रुपये आहे. त्यामुळे " यशोधन ट्रस्ट " ला अजून ही मदतीची आवश्यकता आहे. त्याकरीता समाजातील दानशूर व्यक्ती व खाजगी कंपन्यांनी मदतीसाठी पुढे यावे असे या लेखाद्वारे आवाहन करण्यात येत आहे.
पुण्यावरून साताऱ्याकडे जाताना खंबाटकी घाटा जवळ वेळे गावाच्या हद्दीत समाजातील अनाथ, बेघर वयोवृद्ध, मनोरुग्ण लोकांचे यशोधन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेद्वारे संचलीत गजानंत निवारा केंद्र आहे. वाई तालुक्यातील रवी बोडके या तरुणाने समाजाने नाकारलेल्या लोकांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी " यशोधन ट्रस्ट " या स्वयंसेवी संस्थेचे स्थापना केली. रस्त्यावरून या अनाथांना व मनोरुग्णांना उचलून आणायचे , स्वच्छ करायचे , डॉक्टरांकडे उपचारांसाठी न्यायचे असा दिनक्रम सुरु झाला. काही दिवस अशा लोकांना निवारा केंद्रात ठेवून त्यांची योग्य सर्वप्रकारची काळजी घेऊन , काही दिवसांनी संस्थेमार्फ़त अशा अनाथ , बेघर लोकांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना आप-आपल्या कुटुंबात सुरक्षित पोहोचविले जाते. तसेच मानसिक रुग्णांना पुढील उपचारांसाठी मनोरुग्णालयात दाखल केले जाते. अशा मनोरुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन, कुटुंबाच्या ताब्यात दिले जातात. सध्या ५५ अनाथ - बेघर व मनोरुग्ण आहेत.
पण हे काम करताना यातील खूप मोठं आव्हान म्हणजे महिलांना सांभाळणे. पुरुषांना कसेही सांभाळता येऊ शकते पण महिलांच्या समस्या खूप वेगळ्या असतात. मानसिक आजाराने ग्रस्त महिलांची काळजी घेताना त्यांची सुरक्षीतता आणि त्यांच्या अडचणी याबाबतीत विषेश काळजी घ्यावी लागते. अशा महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रवी बोडके यांना त्यांची पत्नी सोनाली यांची खूप मदत होते.
अशीच एक ६५ वर्षीय वयोवृद्ध मनोरुग्ण महिला पोलिसांच्या मदतीने कोरोना काळात " यशोधन ट्रस्ट " मध्ये दाखल झाली. ही महिला तिच्या गावी आपल्या कुटुंबियांसोबत आनंदाने राहत होती. आयुष्यभर काबाडकष्ट करून प्रपंच केला होता. दोन मुले आणि नवरा असे तिचे कुटुंब सर्व ठीक चालले होते. पण अचानक या महिलेच्या डोक्यावर परिणाम होऊन , महिला मनोरुग्णांसारखी वागू लागली. नवऱ्याने दवाखान्यात नेण्याऐवजी अंधश्रद्धेपोटी देवऋषी कडे दाखविले , देवऋषीने भूतबाधा झाली म्हणून अंगारा व धुपारा दिला. पण दिवसेंदिवस महिलेची अवस्था बिकट होत गेली. कुटुंबातील लोक अखेर कंटाळले नवरा व मुले तिच्याकडे लक्ष देत नव्हते , तिला जेवायला देत नव्हते. अशातच एके दिवशी ही महिला घरातून निघून गेली , रस्त्यावर राहू लागली आणि एक दिवस रात्री ती रस्त्याच्या कडेला झोपली असताना एका नराधमाने तिच्या वयोवृद्ध शरीराचा व वयाचा विचार न करता तिच्यावर पाशवी बलात्कार केला. पोलिसांनी सर्व सोपस्कार करून , रवी बोडके यांच्याशी संपर्क करून त्या महिलेला "यशोधन ट्रस्ट " मध्ये भरती केले. या महिलेवर झालेल्या शारीरिक अत्याचारापेक्षा तिच्या मनावर झालेला मानसिक आघात खूप मोठा होता. जेवताना सुद्धा ही महिला सतत रडत असे. या महिलेला बोलतं करून , तिच्याशी संवाद साधून तिचे आयुष्य पूर्ववत करण्यासाठी रवी बोडके व " यशोधन ट्रस्ट " कडून प्रयत्न केले जात आहेत. "यशोधन ट्रस्ट" कडून महिलांसाठी वेगळा कक्ष सुद्धा बांधण्यात येत असून , त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
आजपर्यंत "यशोधन ट्रस्ट" च्या माध्यमातून हजारो लोकांना मदत झाली आहे , अनेक अनाथ - बेघर व मनोरुग्णांना हक्काचा निवारा मिळाला आहे. आज "यशोधन ट्रस्ट" च्या मालकीच्या जागेत गजानंत निवारा केंद्र सुरु आहे. काही वयोवृद्धांना आपल्याच पोटच्या मुलांनी वाऱ्यावर सोडलेले असते , अशा वयोवृद्धांना ही यशोधन ट्रस्ट च्या माध्यमातून निवारा दिला जातो. तसेच कालांतराने त्यांच्या मुलांना किंवा नातेवाईकांना भेटून त्यांचे समुपदेशन करून अशा वयोवृद्धांना परत त्यांच्या कुटुंबाबत पाठविले जाते. काही नातेवाईक परत नेण्यासाठी तयार होतात तर काही तयार होत नाहीत. अशा वेळी असे वयोवृद्ध लोक यशोधन ट्रस्ट संचालित निवारा केंद्रात शेवट पर्यंत सांभाळले जाते. निवारा केंद्रातील एखाद्या वयोवृद्धांचे निधन झाले तर , संस्थेकडून संबंधित मुलांना व नातेवाईकांना कळविले जाते. परंतु काही मुले अंत्यसंस्काराला सुद्धा येत नाहीत अशा वेळी संस्थेकडूनच अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे "यशोधन ट्रस्ट" द्वारे माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम केले जात आहे. संस्थेचा दिवसाला होणारा खर्च खूप मोठा आहे. संस्थेला सामूहिक आर्थिक मदतीची खूप गरज आहे. आपण ही या कार्याला देणगीरूपाने हातभार लावू शकतो.
"यशोधन ट्रस्ट" या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. संस्थेचा दिवसाला होणारा खर्च खूप मोठा आहे. सकाळ माध्यम समूहाच्या "सोशल फॉर अॅक्शन" या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर यशोधन ट्रस्ट च्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती , माहिती -तंत्रज्ञान कंपन्या , सीएसआर कंपन्या व परदेशी -भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन यशोधन ट्रस्ट च्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.