बळीराजाला प्रतीक्षा वरूणराजाची! जिल्ह्यात खरीपाचे २.८९ लाख हेक्टर क्षेत्र, पण पेरणी पाच हजार हेक्टरवरच

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने केवळ पाच हजार हेक्टरवरच पेरणी झाली आहे. बार्शीत अजूनही पेरणीला सुरवात झालेली नाही. माढा, मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढ्यात एकूण क्षेत्राच्या पाच टक्केसुद्धा पेरणी नाही. पावसाअभावी पेरणी लांबणीवर पडल्याने बळिराजा चिंतेत आहे.
farmer
farmersakal

सोलापूर : जिल्ह्यात खरीप हंगामाचे दोन लाख ८९ हजार ५७० हेक्टर क्षेत्र आहे. १५ जून ते १० जुलै या काळात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने केवळ पाच हजार हेक्टरवरच खरीप पिकांची पेरणी झाली आहे. बार्शी तालुक्यात अजूनही पेरणीला सुरवात झालेली नाही. माढा, मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढ्यात एकूण क्षेत्राच्या पाच टक्केसुद्धा पेरणी झाली नाही. पावसाअभावी पेरणी लांबणीवर पडल्याने बळिराजा चिंतेत पडला आहे.

सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस अशी पिके घेतली जातात. सद्य:स्थितीत नगर जिल्ह्यातील ८९ हजार हेक्टरवर तर पुणे जिल्ह्यातील १३ हजार हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात अवघ्या पाच हजार १९३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

पाच हजारांपैकी साडेतीन हजार हेक्टरवर मका व बाजरीचीच पेरणी झाली आहे. ज्वारी, उडीद, सोयाबीन, कारळे, मूग या पिकांची अजून अपेक्षित पेरणी झालेली नाही. सध्या सोयाबीनची ३३४ हेक्टरवर, उडदाची सतराशे हेक्टरवर व तुरीची ९३० हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणीला विलंब झाल्यास ऐन पावसात पीक सापडून नुकसान होऊ शकते, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवून घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

सरासरीपेक्षा १३० मिलिमीटर पाऊस कमी

जिल्ह्यात १० जुलैपर्यंत सरासरी १९८ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. गतवर्षी १० जुलैपर्यंत २२४ मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे गतवर्षी जिल्ह्यात जवळपास सव्वालाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा १० जुलैपर्यंत अवघा ६८.४ मिलिमीटर एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत पावणेतीन लाख हेक्टरपैकी केवळ पाच हजार १९३ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. २५ दिवस झाले, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षाच आहे.

जिल्ह्यातील खरीप पेरणीची सद्य:स्थिती

  • एकूण क्षेत्र

  • २,८९,५७० हेक्टर

  • आतापर्यंत पेरणी

  • ५,१९३ हेक्टर

  • सरासरी अपेक्षित पाऊस

  • १९८.६ मिलिमीटर

  • आतापर्यंतचा सरासरी पाऊस

  • ६८.४ मिलिमीटर

शेतकऱ्यांनी जमिनीतील ओल पाहूनच पेरणी किंवा लागवड करावी

शेतकऱ्यांनी बियाणांची पेरणी किंवा लागवड करण्यापूर्वी जमिनीत अपेक्षित ओल असल्याची खात्री करावी. पेरणी करताना गडबड न करता पावसाची प्रतीक्षा केल्यास बियाणांची उगवण क्षमता निश्चितपणे वाढेल. आता पेरणी करायची झाल्यास अधिक बियाणांचा वापर करणे योग्य राहील.

- दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com