पंढरपुरातील वारकऱ्यांचे १००० खाटांचे हॉस्पिटल कागदावरच! कृषी विभागाने ४० एकर जागा द्यायला दिला नकार; शासन दरबारी प्रश्न प्रलंबित

पंढरपूरमधील कृषी विभागाच्या १०० एकर जागेपैकी ४० एकर जागेत वारकऱ्यांवरील मोफत उपचारांसाठी एक हजार खाटांचे रूग्णालय सुरू करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये केली होती. मात्र, कृषी विभागाने जागा देण्यास नकार कळविल्याने मागील १० महिन्यांत रूग्णालय उभारणीसंदर्भात काहीही हालचाली झाल्या नसल्याची बाब समोर आली आहे.
Private hospital
hospitalESakal
Updated on

सोलापूर : पंढरपूरमधील कृषी विभागाच्या १०० एकर जागेपैकी ४० एकर जागेत वारकऱ्यांवरील मोफत उपचारांसाठी एक हजार खाटांचे रूग्णालय सुरू करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये केली होती. मात्र, कृषी विभागाने जागा देण्यास नकार कळविल्याने मागील १० महिन्यांत रूग्णालय उभारणीसंदर्भात काहीही हालचाली झाल्या नसल्याची बाब समोर आली आहे.

गतवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरीत महापूजेसाठी आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी भव्य रूग्णालय उभारणीचे आश्वासन दिले होते. जागा देखील निश्चित झाल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यासंदर्भातील अंदाजपत्रक सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी वारकऱ्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंद देखील साजरा केला होता. मात्र, २०१० मध्ये निश्चित झालेल्या धोरणानुसार कृषी विभागाकडील जागा त्याच कामांसाठी वापरल्या जाव्यात, असे निश्चित झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाने पंढरपूरमधील ४० एकर जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे आता तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेले नवीन रूग्णालयाचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी पंढरपूरमध्ये नवीन जागा शोधावी लागणार आहे, पण जागेचा शोध अजूनही सुरू झालेला नाही, अशी वस्तुस्थिती आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या नकारानंतर तो विषय आता मुख्य सचिवांपर्यंत गेला असून तेथून काहीतरी मार्ग निघेल, असे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. एक हजार खाटांच्या नवीन रूग्णालयासाठी शासन स्तरावरूनच निर्णय अपेक्षित आहे.

रूग्णालयात अशी बेड्सची सुविधा

पंढरपुरात होणाऱ्या नवनिर्मित एक हजार खाटांच्या या रुग्णालयात सामान्य रुग्णालयासाठी ३०० बेड्स, महिला व शिशू रुग्णालय ३०० खाटा, ऑर्थोपेडिक व ट्रामा केअर रुग्णालय १५० खाटा, सर्जरी रुग्णालय १०० खाटा, मेडिसीन अतिदक्षताचे १०० खाटा व मनोरुग्णालयासाठी ५० खाटा, अशी रचना असणार आहे.

उपसंचालकांना पत्र पाठवून कळविले आहे

पंढरपुरात नवीन एक हजार खाटांचे रूग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, पण त्यासाठी कृषी विभागाने जागा देण्यास नकार कळविला आहे. त्यासंदर्भात उपसंचालकांना पत्र पाठवून कळविण्यात आले असून आता पुढील कार्यवाही वरिष्ठ स्तरावरून अपेक्षित आहे.

- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com