पुणे, मुंबई, ठाणे, कोकण किनारपट्टीसह विदर्भातील पाच जिल्ह्यांना इशारा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

अंदमानच्या समुद्रातून महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास करत आलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर अतितीव्र कमी दाबात झाले. त्यामुळे दोन दिवसांपासून पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळला.

पुणे - महाराष्ट्रावर घोंगावणारे अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता गुरुवारी कमी झाली आहे. तरीही अर्ध्या महाराष्ट्राला हवामान खात्याने शुक्रवारी (ता. 16) पावसाचा "यलो अलर्ट' दिला आहे. त्यात पुणे, मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीसह विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. त्या भागात 15.6 ते 64.4 मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. 

अंदमानच्या समुद्रातून महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास करत आलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर अतितीव्र कमी दाबात झाले. त्यामुळे दोन दिवसांपासून पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळला. या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता अरबी समुद्राच्या दिशेने सरकत आहे. त्याचवेळी त्याची तीव्रता कमी झाली. त्यामुळे दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांचा "ऑरेंज अलर्ट' हवामान खात्याने काढला. मात्र, पुण्या-मुंबईबरोबरच कोकण किनारपट्टीवरील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्यांमध्येही "यलो अलर्ट' दिला आहे. या भागातील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मध्य महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग 20 ते 30 प्रतितास किलोमीटर असेल, असेही स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

78 टक्के जास्त पाऊस 
राज्यात 1 ते 15 ऑक्‍टोबरदरम्यान सरासरी 45.5 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत सरासरीपेक्षा 78 टक्के जास्त म्हणजे, 86.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

मराठवाड्यात पुन्हा धुवाधार 
यंदाच्या पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर महिन्यांमध्ये मराठवाड्यात दमदार पाऊस पडला. तसेच, ऑक्‍टोबरमध्येही पावसाने धुवाधार हजेरी लावली. तेथे सरासरीपेक्षा 53 टक्के जास्त पावसाची नोंद झाली. कोकणात 20 तर, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा सात टक्के जास्त पाऊस पडला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

13 जिल्ह्यांत अतिवृष्टी 
अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुण्या-मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, गोंदिया येथे अतिवृष्टी झाली. तेथील सरासरीपेक्षा 60 टक्‍क्‍यांहून जास्त पाऊस तेथे नोंदला गेला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning to five districts of Vidarbha including Pune, Mumbai, Thane, Konkan coast