esakal | राज्यात टँकर सुरू, पण गेल्या वर्षीपेक्षा निम्मे
sakal

बोलून बातमी शोधा

Water tanker

राज्यातील ४९७ गावे आणि ८३७ वाड्यांसाठी ३८८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण वरुणराजाच्या मेहेरबानीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मे टँकर धावताहेत. गेल्या वर्षी मेअखेरीस ७५६ गावे आणि एक हजार ४१४ वाड्यांची ७२४ टँकरद्वारे तहान भागविण्यात येत होती.

राज्यात टँकर सुरू, पण गेल्या वर्षीपेक्षा निम्मे

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : राज्यातील ४९७ गावे आणि ८३७ वाड्यांसाठी ३८८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण वरुणराजाच्या मेहेरबानीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मे टँकर धावताहेत. गेल्या वर्षी मेअखेरीस ७५६ गावे आणि एक हजार ४१४ वाड्यांची ७२४ टँकरद्वारे तहान भागविण्यात येत होती. (Water is being supplied to 397 villages and 837 small settlements in the state by 388 tankers)


टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या एका आठवड्यात ९५ गावे आणि १०३ वाड्यांची वाढ झाली आहे. टँकरची संख्या ६९ ने वाढली आहे. राज्यात गेल्या आठवड्यात ३१९ टँकरद्वारे ४०२ गावे आणि ७३४ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. अमरावती विभागातील पिण्याच्या पाण्याची कमतरता दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षी मेअखेरीस अमरावती जिल्ह्यातील १७ गावांसाठी १८, बुलडाणा जिल्ह्यातील नऊ गावांसाठी आठ, यवतमाळ जिल्ह्यातील १४ गावांसाठी १४ टँकर अशा एकूण ४१ गावांसाठी ४१ टँकर पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी धावत होते. यंदा मात्र आता अमरावतीच्या १३ गावांसाठी १३, वाशीममधील तीन गावांसाठी तीन, बुलडाण्यातील १९ गावांसाठी १९, यवतमाळमधील ३८ गावांसाठी ३८ टँकर अशा एकूण ७३ गावांसाठी ७३ टँकर धावताहेत. अकोला जिल्ह्यातील एकाही गावात अथवा वाडीसाठी टँकर सुरू झालेला नाही.


तुलनेत मराठवाड्यातील स्थिती बरी

भीषण पाणीटंचाईच्या झळांनी हैराण होणाऱ्या मराठवाड्यातील टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची स्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत बरी आहे. बीड आणि परभणी, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यासाठी सद्यःस्थितीत एकही टँकर सुरू नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील चार गावांसाठी तीन, जालन्यातील १६ गावे आणि सहा वाड्यांसाठी २३, हिंगोलीमधील नऊ गावे आणि तीन वाड्यांसाठी १५, नांदेडमधील ३८ गावे आणि १५ वाड्यांसाठी १७ अशी एकूण ६७ गावे आणि २४ वाड्यांसाठी ५८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मागील आठवड्यात मराठवाड्यातील ४२ गावे आणि १४ वाड्यांसाठी ३७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. गेल्या वर्षी मेअखेरीस मराठवाड्यातील २५१ गावे आणि ९२ वाड्यांसाठी ३२१ टँकर धावत होते. नागपूर जिल्ह्याचा अपवाद वगळता वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात एकही टँकर सुरू करण्यात आलेला नाही. नागपूर जिल्ह्यातील १७ गावांसाठी १५ टँकर सुरू करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात १२ गावांसाठी १० टँकर सुरू होते. मे २०२० अखेरीस पाच गावांसाठी ११ टँकर सुरू करण्यात आले होते. ही गावे नागपूर जिल्ह्यातील होती.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील ननाशी परिसरात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का


सांगली, सोलापूर, कोल्हापूरमध्ये नाही टँकर

दुष्काळाने जर्जर होणाऱ्या सोलापूर जिल्ह्याप्रमाणेच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकही टँकर सुरू नाही. गेल्या वर्षी पश्‍चिम महाराष्ट्रातील ७६ गावे आणि २६३ वाड्या तहानलेल्या होत्या. त्यांच्यासाठी ८२ टँकर सुरू होते. गेल्या आठवड्यात ५२ गावे आणि १९४ वाड्यांना ५१ टँकर पाणीपुरवठा करत होते. आता पुणे जिल्ह्यातील ३५ गावे आणि १७१ वाड्यांसाठी ३९, सातारा जिल्ह्यातील २० गावे आणि २७ वाड्यांसाठी १७ अशी एकूण ५५ गावे आणि १९८ वाड्यांसाठी ५६ टँकर सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबारसाठी एकही टँकर सुरू करण्यात आलेला नाही. नाशिक जिल्ह्यातील ७१ गावे आणि ४५ वाड्यांसाठी ५२, तर नगर जिल्ह्यातील २० गावे आणि ६३ वाड्यांसाठी १८ अशी एकूण ९१ गावे आणि १०८ वाड्यांची तहान ७० टँकर भागवताहेत. गेल्या आठवड्यात नाशिक आणि नगर जिल्ह्यातील ६४ गावे आणि ७४ वाड्यांसाठी ५९ टँकर, तर गेल्या वर्षी मेअखेरीस नाशिक व नगर जिल्ह्यातील १४१ गावांसह ३८४ वाड्यांसाठी १३७ टँकर सुरू होते.

हेही वाचा: नाशिकमधील पंचवटी विभागात ४ महिन्यांपासून मृत्यूदर वाढताच


सिंधुदुर्गमध्ये दोन गावे अन्‌ १७ वाड्या तहानल्या

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात या आठवड्यात दोन गावे आणि १७ वाड्या तहानल्या आहेत. त्यांच्यासाठी चार टँकर सुरू करण्यात आले आहेत. कोकणातील पिण्याच्या पाणीटंचाईचा प्रश्‍न मिटण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता ठाण्यातील ३८ गावे व १०५ गावांसाठी ३७, रायगडमधील ६६ गावे आणि १८८ गावांसाठी २७, रत्नागिरीमधील ६४ गावे आणि १०६ वाड्यांसाठी १३, पालघरमधील २४ गावे आणि ९१ वाड्यांसाठी ३५ अशा एकूण १९४ गावे आणि ५०७ वाड्यांसाठी ११६ टँकर सुरू आहेत. गेल्या आठवड्यात १७५ गावे आणि ४५२ वाड्यांसाठी १०४ टँकर सुरू होते. गेल्या वर्षी मेअखेरीस २४२ गावे आणि ६७५ गावांची तहान १३२ टँकरद्वारे भागविण्यात येत होती.


खासगी टँकरचा वापर मोठ्या प्रमाणात

जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आता ३८८ पैकी ३२३ खासगी टँकरचा वापर करण्यात येत आहे. मागील आठवड्यात ३१९ पैकी २६५ खासगी टँकर होते. खासगी टँकरची विभागनिहाय स्थिती अशी :

विभागाचे नाव आताचे एकूण टँकर आताचे खासगी टँकर
कोकण ११६ १०९
उत्तर महाराष्ट्र ७० ४५
पश्‍चिम महाराष्ट्र ५६ ३८
मराठवाडा ५८ ४३
अमरावती ७३ ७३
नागपूर १५ १५

(Water is being supplied to 397 villages and 837 small settlements in the state by 388 tankers)