‘देशात फक्त महागाईची लाट’ - पवन खेरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wave of inflation in country Pawan Khera Modi govt unemployment mumbai

‘देशात फक्त महागाईची लाट’ - पवन खेरा

मुंबई : देशात आज सर्वांत मोठी समस्या महागाई आणि बेरोजगारी असून महागाई कमी करण्यात व तरुणांना नोकरी देण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, अशी टीका करत काँग्रेसने आज केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली. काँग्रेसने आज देशभर पत्रकार परिषदा घेऊन महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला धारेवर धरले. मुंबईतही काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी केंद्रावर टीका केली. ‘पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅससह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जनता महागाईने त्रस्त झाली असताना मोदी सरकार मात्र या मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी धार्मिक मुद्द्यांना पुढे रेटत आहे. देशात सध्या कोणाचीही लाट नसून केवळ महागाई, चिंता व निराशेची लाट आहे,’ अशी घणाघाती टीका पवन खेरा यांनी केली.

दिल्लीत रामलीला मैदानावर ४ सप्टेंबर काँग्रेसने महागाईच्या मुद्द्यावरच मोठ्या रॅलीचे आयोजन केले आहे, असेही पवन खेरा यांनी सांगितले. गांधी भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पवन खेरा म्हणाले की, महागाई आटोक्यात आणण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे व त्यावर सरकारकडे उत्तरही नाही, सरकार महागाईच्या मुद्द्यावर बोलण्यास घाबरत आहे. केंद्र सरकारचे महागाईसंदर्भात करत असलेले दावे धादांत खोटे असून काँग्रेसप्रणित युपीए आघाडी सरकार व भाजपच्या एनडीए सरकारच्या काळातील किमतीची तुलना केली तर महागाई किती प्रचंड वाढली आहे, हे लक्षात येते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात एसपीजी सिलिंडर ४१० रुपयाला मिळत होते. तो आज १,०५३ रुपयांना झाला आहे, म्हणजे तब्बल १५६ टक्के वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा १०७ डॉलरचा दर असताना मनमोहनसिंग सरकारने ७५ रुपयांच्या वर पेट्रोलचा दर जाऊ दिला नाही पण आज कच्च्या तेलाचा दर ९७ डॉलर असतानाही सध्या पेट्रोल १०६ रुपये लिटर तर डिझेल ९७ रुपये लिटर आहे.

कोरोनानंतर महागाई वाढली, हा भाजप सरकारचा दावा धादांत खोटा आहे. नोटाबंदी करून काय साध्य केले, हे भाजपलाच कळले नाही. जीएसटीची अंमलबजावणी करतानाही मध्यरात्री मोठा इव्हेंट केला. मोदी हे फक्त इव्हेंट मॅनेजमेंट करण्यात पटाईत आहेत.

-पवन खेरा, प्रवक्ते, काँग्रेस

सात सप्टेंबरपासून भारत जोडो

नवी दिल्ली : काँग्रेसची १५० दिवसांची बहुचर्चित ‘भारत जोडो’ यात्रा येत्या सात सप्टेंबरपासून सुरू होणार असून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तब्बल साडेतीन हजार किलोमीटरपर्यंत या यात्रेचा पल्ला असेल, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली. काँग्रेसचे नेते जयराम रमेश, के.सी. वेणुगोपाल आणि दिग्विजयसिंह यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिली. या यात्रेचा आराखडा निश्चित करण्यासाठी या नेत्यांनी सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद सावध साधला. या यात्रेमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी सहभागी होतील.

Web Title: Wave Of Inflation In Country Pawan Khera Modi Govt Unemployment Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..