रोहित पवारची अवस्था पार्थपेक्षाही वाईट करू ः डाॅ. विखे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जून 2019

बारामतीकरांना ताकद दाखवून दिली

- हा सत्कार शेवटचाच

कर्जत (जि. नगर) : पालकमंत्रीसाहेब, तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा. ती जबाबदारी माझी आहे. तुमच्या विकासाच्या झंझावाताची पाहिजे तेवढी प्रसिद्धी झाली नाही. मात्र, इतिहास घडवू, सर्वच कामे बोलून होत नाहीत. आजोबा बाळासाहेब विखे पाटलांसारखा गप्प बसून काम दाखवू, असे सांगून डाॅ. सुजय विखे यांनी कर्जत-जामखेडमधून लढू इच्छिणाऱ्या रोहित पवारांची अवस्था पार्थ पवारपेक्षाही वाईट करू, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसला दिले.

कर्जत येथील सत्कार समारंभात डाॅ. विखे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. पालकमंत्र्यांना अभय देत त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीच विखे यांनी स्वीकारल्याने आगामी विधानसभेच्या दृष्टीने ही लढत काट्याचीच होईल, असेच संकेत आहेत.

बारामतीकरांना ताकद दाखवून दिली

महायुतीतील सर्वांनीच प्रामाणिकपणे काम केल्याने मी उच्चांकी मतांनी निवडून आलो, असे सांगून डाॅ. विखे यांनी आता सर्वच ठिकाणी भाजपचे कमळ फुलविण्याचे आश्वासन दिले. आपल्यावर आलेली जबाबदारी अहोरात्र कष्ट करून पूर्ण करू. माझ्या पराजयासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या शेजाऱ्यांना (बारामती) ताकद दाखवून दिलीच आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांना शेजाऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही, असे डाॅ. विखे यांनी सांगितले.

हा सत्कार शेवटचाच

येथील सत्कार हा माझा शेवटचा आहे. चांगला पाऊस पडून शेतकरी सुखी झाल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही. ज्यांना सत्कार करायचा असेल, त्यांनी दुष्काळाच्या कामांसाठी लागणाऱ्या निधीत रक्कम द्यावी. मुख्यमंत्री निधीसाठी ही रक्कम देऊन या कार्याला हातभार लावावा, असे आवाहन डाॅ. विखे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we will defeat to Rohit Pawar says MP Sujay Vikhe Patil