
भरउन्हात रंगणार सावल्यांचा खेळ! राज्यात मंगळवारपासून ‘शून्य सावली’ दिवस
नंदोरी : प्रखर उन्हाने त्रासलेल्या महाराष्ट्रात सावल्यांचा खेळ सुरू झाला आहे. उद्या मंगळवार (ता. ३) पासून शून्य सावलीच्या दिवसाला सुरुवात होत आहे. खगोलशास्त्रीय भाषेत यास ‘झीरो शॅडो’ असे संबोधले जाते. हा सावल्यांचा खेळ संपूर्ण महिना म्हणजेच ३१ मेपर्यंत अनुभवता येणार आहे. तर, विदर्भात २० ते २७ मेपर्यंत शून्य सावली दिवस अनुभवला मिळणार आहे. सूर्य डोक्यावर असतो, तेव्हा उन्हातील व्यक्ती किंवा वस्तूची सावली खाली पायातच पडते. मात्र, ज्या वेळी काही क्षण ही सावली गायब होते, त्याला शून्य सावली असे म्हणतात. सध्या उत्तरायण असल्याने कडाक्याचे ऊन पडत आहे. राज्यातील विविध शहरे व ग्रामीण भागात हा अनुभव दरदिवशी घेता येईल, अशी माहिती चंद्रपूरचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
महाराष्ट्रात ३ ते ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस आहेत. तर, विदर्भात २० मे ते २७ मेपर्यंत दुपारी १२ ते १२:३० या कालावधीत ही वैज्ञानिक घटना अनुभवता येईल. भारतात मध्य प्रदेशातील भोपाळजवळून २३.५० अंशावरून कर्कवृत्त जाते. त्यामुळे हा प्रदेश शून्य सावलीचा शेवटचा भूभाग आहे. भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावलीचा दिवस नसतो. कारण, तेथे डोक्यावर लंबरूप सूर्यकिरणे पडू शकत नाहीत. महाराष्ट्रात मे महिन्यात उन्हाळा असल्यामुळे सावली गायब झाल्याचे पाहायला मिळते. मात्र, जुलैत ढगाळ वातावरणामुळे असे क्वचितच घडते.
शून्य सावली दिवस आणि ठिकाणे
३ मे : सावंतवाडी, शिरोडा मांगेली, खूषगेवाडी.
४ मे : मालवण, आंबोली.
५ मे : देवगड, राधानगरी, रायचूर.
६ मे : कोल्हापूर, इचलकरंजी.
७ मे : रत्नागिरी, सांगली, मिरज.
८ मे : कऱ्हाड, जयगड, अफजलपूर.
९ मे : चिपळूण, अक्कलकोट.
१० मे : सातारा, पंढरपूर, सोलापूर.
११ मे : महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाई.
१२ मे : बारामती, बार्शी, उस्मानाबाद :
१३ मे : पुणे, मुळशी, दौड, लातूर, लवासा, असरल्ली.
१४ मे : लोणावळा, अलिबाग, दाभाडे, पिंप्री-चिंचवड, देहू, जामखेड, आंबेजोगाई.
१५ मे : मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड, माथेरान, राळेगण सिद्दी, सिरोंचा.
१६ मे : बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, नारायण गाव, खोडद, अहमदनगर, परभणी, नांदेड, निर्मल.
१७ मे : नाला सोपारा, विरार, आसनगाव, अहेरी, आल्लापल्ली.
१८ मे : पालघर, कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा.
१९ मे : औरंगाबाद, डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, जालना, पुसद, बल्लारशा, चामोर्शी.
विदर्भातील शून्य सावली दिवस आणि ठिकाणे
चंद्रपूर, वाशीम : २० मे
गडचिरोली : २१ मे
बुलडाणा, यवतमाळ : २२ मे
अकोला : २३ मे
वर्धा : २४ मे
अमरावती : २५ मे
नागपूर, भंडारा : २६ मे
गोंदिया : २७ मे
Web Title: Weather Update Maharashtra Vidarbha Zero Shadow May 20 To 27 Nandori
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..