

solapur zp school teacher poem
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या तोगराळी (ता. दक्षिण सोलापूर) शाळेतील उपशिक्षक मधुकर माळी यांनी ‘गुढीपाडवा पट वाढवा’ अभियानाचे गीत तयार केले आहे. ते गाणे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्यासाठी लागू केले आहे. आता ते गाणे राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये वाजणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, पोषण आहार दिला जातो. विविध खेळ व क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. स्मार्ट टीव्हीद्वारे ऑनलाइन शिक्षण दिले जाते. मुलींना उपस्थिती भत्ता दिला जातो. या बाबींचा समावेश त्या गाण्यात आहे. इंग्रजी शाळांशी स्पर्धा करणाऱ्या मराठी शाळा, विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि सामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने त्यांनी हे गीत तयार केले.
प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना ते गाणे पाठविण्यात आले. त्यांनी ते राज्याच्या संचालक व उपसंचालकांना पाठविले. त्यात राष्ट्रपती, राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री तसेच विविध उपक्रमशील शाळांतील विद्यार्थ्यांसमवेतचे फोटो समाविष्ट केले होते. ते गीत शिक्षणमंत्र्यांनी ऐकले आणि राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘पट वाढवा’ अभियानावेळी ते गाणे गावागावांतील विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना ऐकवण्याचे निर्देश दिले.
पट वाढविण्यासाठी हे गाणे फायद्याचे ठरेल
शालेय योजना, पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार, ई-लर्निंगसह सर्व शासकीय योजनांचा त्यात समावेश आहे. ‘एआय’कडून गायन करून घेतले आहे. ते गीत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना खूप आवडले. आता ते गाणे सर्व गावांमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ऐकवले जात आहे. ई-लर्निंगमुळे विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळांची गोडी निर्माण होऊन पट वाढत आहे.
- मधुकर माळी, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, तोगराळी, ता. दक्षिण सोलापूर
मुलांनी चंद्रगुप्त मौर्यांची कथा पाहिली अन्...
२०१३-१४ साली टीव्हीवर चंद्रगुप्त मौर्य यांची मालिका सुरू होती. आलेगावातील जिल्हा परिषद शाळेतील सहावीच्या वर्गाला शिकवत असताना मुले अभ्यासात खूपच मागे होती. त्यावेळी त्यांना टीव्हीवरील मालिका पाहून यायला सांगितले. मी त्या रात्री मालिका पाहिली. तिसऱ्या दिवशी त्यावर आधारित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी प्रत्येक क्षण अचूक सांगितला. विद्यार्थी चित्ररूपातील गोष्टी लगेच लक्षात ठेवतात, ही बाब लक्षात आली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे कविता म्हणताना, तर काहींचे वाचन करतानाचे व्हिडिओ तयार केले. त्यानंतर इतर मुलेही ‘आमचे व्हिडिओ काढा’ असे म्हणत पाठांतर करू लागली. त्या वेळी एलईडी, एलसीडीची किंमत खूप असल्याने घरातील साधा टीव्ही टेबलावर ठेवून ऑनलाइन शिक्षण दिले. त्याला ‘टेबल टीव्ही’ असे नाव दिल्याचेही श्री. माळी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.