esakal | पश्चिम रेल्वेचा मालवाहतूकीमध्ये विक्रम; 5 हजार कोटींचे लक्ष्य केले पूर्ण | Railway
sakal

बोलून बातमी शोधा

Western Railway
पश्चिम रेल्वेचा मालवाहतूकीमध्ये विक्रम; 5 हजार कोटींचे लक्ष्य केले पूर्ण

पश्चिम रेल्वेचा मालवाहतूकीमध्ये विक्रम; 5 हजार कोटींचे लक्ष्य केले पूर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - देशभरात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पश्चिम रेल्वेवरून वेगाने मालवाहतूक सुरू आहे. 'हंगरी फॉर कार्गो' या संकल्पनेच्या आधारे पश्चिम रेल्वेद्वारे मालवाहतूकीसाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात फक्त सहा महिन्यात मालवाहतूक करून 5 हजार कोटींचा महसूल जमा करून यंदाचे लक्ष्य पूर्ण करण्यात पश्चिम रेल्वेला यश मिळाले आहे.

पश्चिम रेल्वेने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत एकूण 5 हजार 40 कोटी रुपयांचा महसूल मालवाहतूकीतून मिळविला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 20 टक्क्यांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. मीठ, सिमेंट, कोळसा, कंटेनर आणि ऑटोमोबाइल याची प्रामुख्याने लोडिंग करण्यात आली. यासह यंदा जिप्सम, बॉक्साइट, सोडा अशा वस्तूची लोडिंग करण्यात आली. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा अधिक तुलनेत महसूल पश्चिम रेल्वेला मिळाला. स्थानिक आणि विभागीय स्तरावर रेल्वेने स्थापन केलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिट (बीडीयू) चा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेने उद्योगांना अखंड आणि परवडणारी कनेक्टिव्हिटी प्रदान करून मालवाहतूक आणि पार्सल लोडिंगला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे डोळ्यांच्या रेटिनाला धोका, राज्यासह मुंबईत डोळ्यांच्या समस्या वाढल्या

बीडीयू विविध मालवाहक, नवीन ग्राहक, व्यापार संस्था आणि लॉजिस्टिक कंपन्यांनी सादर केलेले नवीन प्रस्ताव, योजना आणि सूचना यांचा विचार करून अभ्यास करते. या उपक्रमांमुळे रेल्वेकडे अनेक नवीन मालवाहतूक आकर्षित झाले असून व्यापार आणि उद्योगाशी संबंध वाढला. त्यामुळे यंदा 332.86 कोटी रुपये जादा महसूल मिळाला आहे. यासह चालू आर्थिक वर्षात महसूल वाढविण्यासाठी रो-रो सेवा, स्थानक ते स्थानक मालवाहतूक सुविधा देण्याची योजना तयार करण्यात आली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.

एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात पश्चिम रेल्वेवरून 360 पार्सल विशेष ट्रेनच्या माध्यमातून 1.41 लाख टनांहून अधिक वजनी वस्तुची वाहतूक करण्यात आली. यामध्ये कृषि उत्पादने,औषधे, ऑपरेशनसाठी लागणारी साधने, मासे, दूध या प्रमुख वस्तुचा समावेश होता. याद्वारे पश्चिम रेल्वेला 49.61 कोटी रुपये महसूल मिळाला. पश्चिम रेल्वेद्वारे 63 हजार टनाहून अधिक वजनी 90 दूध विशेष ट्रेन चालविण्यात आल्या. तर, 106 कोविड-19 विशेष पार्सल ट्रेनमधून 20 हजार 382 टन अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक केली. 75 इंडेंटेड रेक चालवून 35 हजार टन सामग्रीची वाहतूक करण्यात आली. 89 किसान रेल्वे चालवून 22 हजार 500 टनांहून अधिक शेतीविषयक सामग्री, फळे, फूले, भाज्या यासारख्या नाशवंत वस्तूंची वाहतूक करण्यात आली. 18 हजार 803 मालगाडीचे रेक चालविण्यात आले. यातून 4 कोटींहून अधिक अत्यावश्यक साम्रग्रीची वाहतूक केली, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

loading image
go to top