
Maharashtra Politics: CM शिंदे-फडणवीस-पवार यांच्या रात्रीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती आली समोर
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. अशातच शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली होती. दोन तास चाललेल्या या बैठकीची चर्चा राजकीय वर्तुळात काल (रविवारी) दिवसभर सुरु होती. मात्र मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती.
वर्षावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यामध्ये मंत्रीमंडळाच्या विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंबधीचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
राज्यात आताच्या परिस्थितीत नव्याने मंत्री झालेल्या मंत्र्यांकडे अद्याप कुठल्याही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवलेली नाही. तर चौथ्या मंत्रिमंडळाचा विस्तार करून पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न तिन्ही नेत्यांकडून सुरू असल्याची चर्चा आहे.
भाजप-शिवसेना (शिंदेगट) सरकारमधील अनेक मंत्र्यांवर दोन-दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. यामुळे अनेक मंत्र्यांना ही जबाबदारी संभाळताना तारेवरची करसरत करावी लागत असून या सर्व गोष्टींचीही चर्चा बैठकीत झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक झाली होती. ही बैठक दोन तास बैठक चालली. या बैठकीत कोणत्या मुद्द्यावरून झाली याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. राज्यातील सध्याच्या घडामोडी पाहता या बैठकीला विशेष महत्व आहे.