esakal | राज्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे कधी भरणार? पात्र उमेदवारांचा उपोषणाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor

राज्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे कधी भरणार? पात्र उमेदवारांचा उपोषणाचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्याच्या आरोग्य विभागातील (Health Department) रिक्त पदांसाठी घेतलेल्या परीक्षेतील पात्र उमेदवारांपैकी निम्म्या उमेदवारांची नियुक्ती राज्य सरकारने (State Government) यापूर्वी केलेली आहे. मात्र, उर्वरित ५० टक्के उमेदवारांची भरती (Candidate Recruitment) कधी करणार, असा प्रश्न विचारत तातडीने या उमेदवारांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी आरोग्य विभाग मेरिट विद्यार्थी कृती समितीने राज्य सरकारकडे केली आहे. परंतु सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने येत्या ९ ऑगस्टपासून आरोग्य संचालनालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीने दिला आहे. (When Vacancies State Health Department Filled Eligible Candidates on Hunger Strike)

फेब्रुवारी २०१९ मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातील पद भरतीसाठी जाहिरात आली होती. दरम्यान, निवडणुका आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या पदांसाठी होणारी परीक्षा लांबणीवर पडली. सप्टेंबर २०२० मध्ये मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. त्यामुळे मराठा समाजावर अन्याय होऊ नये, म्हणून आरक्षणाच्या अंतिम निर्णयापर्यंत मूळ जाहिरातीच्या ५० टक्के जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा तब्बल दोन वर्षांनंतर म्हणजे २८ फेब्रुवारी २०२१ रोजी झाली. त्याचा निकाल १९ एप्रिल २०२१ रोजी जाहीर केला. त्यानंतर एप्रिलमध्येच मूळ जाहिरातीमधील ५० टक्के म्हणजेच तब्बल तीन हजार २७७ पदांवर पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.

हेही वाचा: पुणे : कोव्हीशील्डच्या दुसऱ्या डोससाठी मंगळवारी ६० टक्के लस

सार्वजनिक आरोग्य विभागातील गृहवस्त्रपाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहायक, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आहारतज्ज्ञ, ई. जी. सी तंत्रज्ञ, दंत यांत्रिकी, डायलिसिस तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, दंत आरोग्यक अशा जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मूळ जाहिरातीनुसार उर्वरित ५० टक्के पात्र विद्यार्थ्यांना अद्याप नियुक्ती देण्यासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारे हालचाल करण्यात येत नाही, अशी नाराजी मेरिटनुसार पात्र असणारे सुमीत पतंगे यांनी व्यक्त केली.

'आरोग्य विभागातील एकूण पाच हजार ९९७ जागांसाठी ही पद भरती करण्यात येत होती. परंतु त्यातील तीन हजार २७७ जागांवर एप्रिल २०२१मध्ये नियुक्ती करण्यात आली. उर्वरित मेरिटनुसार पात्र विद्यार्थ्यांची अद्याप नियुक्ती केलेली नाही. याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतील. परंतु त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही."

- किशोर खेडकर, आरोग्य विभाग मेरिट विद्यार्थी कृती समिती.

loading image
go to top