Ajit Pawar : पार्थ पवार राजकारणात कधी सक्रीय होणार? अजित पवार म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar : पार्थ पवार राजकारणात कधी सक्रीय होणार? अजित पवार म्हणाले...

Ajit Pawar : पार्थ पवार राजकारणात कधी सक्रीय होणार? अजित पवार म्हणाले...

राज्याच्या राजकारणात काही कुटुंबाचा सक्रिय सहभाग आहे. त्यापैकीच एक म्हणजे पवार कुटुंबीय. पवार कुटुंबाचं राजकारणात एक वेगळंच स्थान आहे. शरद पवारांनंतर अजित पवार, सुप्रिया सुळे, यांनी राजकीय वारसा कायम ठेवला आता त्यांच्यासोबतच रोहित पवार राज्याच्या राजकारणात सक्रिय असून महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. दरम्यान रोहित पवार यांच्यासह दोन तीन वर्षापूर्वी पवार कुटुंबातील आणखी एका व्यक्तीने राजकारणात प्रवेश केला होता. ते म्हणजे अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार परंतु निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पार्थ पवार राजकारणापासून आता लांब असल्याचे दिसून येतात.

दरम्यान अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार राजकारणात पुन्हा सक्रीय होणार की नाही यावर अजित पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी पार्थ पवारचा राजकारणातील सहभाग यावर भाष्य केलं आहे. राजकारणात बळजबरीने कोणाला आणू शकत नाही असं अजित पवार म्हणाले आहेत.

पार्थ पवार सक्रीय राजकारणात पुन्हा कधी येणार? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, "शरद पवार साहेबांच्या कुटुंबामध्ये 12 भावंडं होती. त्यापैकी राजकारणात फक्त शरद पवारच आले. त्यांचे ज्येष्ठ बंधू वसंतदादा पवार आले पण ते जास्त काळ राजकारणात राहिले नाहीत. दुर्दैवाने त्याचं दु:खद निधन झालं.

इतर भावंडांनी आपापलं वेगळं क्षेत्र निवडलं. त्यानंतरच्या भावंडांमध्ये आम्ही सहा जण आहोत. त्यातील मुलांमध्ये फक्त मीच राजकारण क्षेत्र निवडलं. राजकारणात असं कोणाला आणू शकत नाही. तुम्हाला ती आवड असली पाहिजे. आपण कोणाला तिथं बळजबरीने आणू शकत नाही" असं अजित पवार म्हणाले आहेत.