
Tatya Tope Jayanti : स्वातंत्र्याची लढाई जीवंत ठेवणारे तात्या टोपे नेमके कोण होते?
Tatya Tope Birth Anniversary : थोर सेनानी तात्या टोपे यांचा जन्म १६ फेब्रुवारी १८१४ मध्ये महाराष्ट्रातील पाटोदा जिल्ह्यातील येवला गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग येवलकर होते. त्यांचे वडिल पांडुरंग हे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या दरबारी कार्यरत होते तर आईचे नाव रुक्मिणीबाई होते. यानंतर त्यांना ‘टोपे’ असे टोपणनाव मिळाले.

लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे यांच्यासोबत गेले बालपण
तात्यांचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी पुण्यात येऊन राहिले. तात्या चार वर्षांचे असताना त्यांचे वडील दुसरे बाजीराव पेशवे यांच्यासोबत बिठूर येथे स्थायिक झाले. पर्यायाने तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर गेले.
अन् येवलकर ‘टोपे’ झाले
रामचंद्र पांडुरंग यांना तात्या म्हणून संबोधले जायचे, ते शूर आणि बौद्धिकदृष्ट्याही खूप बलवान होते. तात्या कोणतेही काम मोठ्या कष्टाने आणि चिकाटीने पूर्ण करायचे. दुसरे बाजीराव पेशवे त्यांच्या या समर्पणावर खूप आनंदी होते म्हणूनच त्यांना बिठूर किल्ल्याचा कारकून करण्यात आले. हे कामही त्यांनी चोख बजावले. यावर आनंदी होऊन पेशव्यांनी त्यांना एक रत्नजडित टोपी बक्षीस म्हणून दिली. यानंतर रामचंद्र पांडुरंग यांना तात्या टोपे म्हटले जाऊ लागले.
नाना साहेबांनी केले सेनापती
पेशवा बाजीरावांच्या मृत्यूनंतर नानासाहेबांनी तात्या टोपे यांची सेनापती म्हणून नियुक्ती केली. हा तो काळ होता जेव्हा इंग्रजांनी नानारावांना पेशवे पद देण्यास नकार दिला आणि दुसरे बाजीराव पेशवे यांना दिलेली पेन्शनही नाकारली. त्यामुळे नानासाहेब संतापले आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्षाची तयारी केली. रणनीती तयार करण्याची जबाबदारी तात्या टोपे यांच्यावर होती.
शिवपुरीच्या पाडळ जंगलात झोपलेले तात्या टोपेंनी अटक केली
ग्वाल्हेरमध्ये राणी लक्ष्मीबाईच्या मृत्यूनंतरही तात्या टोपे यांनी आपला संघर्ष सुरुच ठेवला अनेक छोटे-छोटे हल्ले करुन तात्यांंनी इंग्रजांचे मोठे नुकसान केले. त्यांना जेरबंद करण्यासाठी इंग्रजांनी खूप प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. अखेर नरवारच्या राजाने तात्या टोपे यांचा विश्वासघात केला आणि शिवपुरीच्या पाडळ जंगलात झोपलेले असताना त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालवला गेला आणि १५ एप्रिल १८५९ रोजी त्यांना फाशी देण्यात आली.