
Lala Lajpat Rai Birth Anniversary: भारतीय स्वातंत्र्यासाठी लालाजींनी चक्क अमेरिकेत उभारलेला मोठा लढा
Lala Lajpat Rai Slogan: आपल्या देशासाठी प्राणही देयची तयारी असलेल्या लाला लाजपत राय यांची आज जयंती. त्यांचा जन्म २८ जानेवारी १८६५ रोजी झाला. त्यांचा जन्म पंजाबमधील जगरांवजवळील धुधिके गावातल्या राधाकृष्णजींच्या घरी आई गुलाब देवी यांच्या पोटी झाला.
लालाजींचे वडील शिक्षक होते. ते शुद्ध विचार आणि धार्मिक प्रवृत्ती असलेले अतिशय विद्वान व्यक्ती होते, याचं पूर्ण प्रभाव लाला लजपतराय यांच्यावर होता. त्यांचे उच्च शिक्षण लाहोर येथे झाले. वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वडिलांची बदली हिस्सारला झाल्यावर त्यांनी तेथे प्रॅक्टिससोबतच सामाजिक कार्यातही सहभाग घ्यायला सुरुवात केली.
लोकांशी सुसंवाद आणि सामाजिक कार्यामुळे अनेक वर्षे तेथील म्युनिसिपल बोर्डाचे अध्यक्ष राहून त्यांनी जनतेची सेवा केली. लहानपणापासूनच निर्भीड आणि धाडसी असलेल्या लजपतराय यांनी देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी क्रांतिकारी कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली, त्यावरून ब्रिटिशांनी त्यांना अटक करून ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात कैद केले होते.
त्यांच्या सुटकेनंतर, १९१४ मध्ये, कॉंग्रेसच्या प्रतिनियुक्तीवर, ते प्रथम इंग्लंड आणि नंतर जपानला गेले अन् त्याच दरम्यान पहिले महायुद्ध सुरू झाले आणि ब्रिटिश सरकारने त्यांना भारतात येण्यास मनाई केली. नंतर पुन्हा जपानमधून अमेरिकेत गेले आणि तिथेच राहून त्यांनी देश मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
त्यांनी पश्चिम समुद्र किनारी शीख समुदायांना भेट दिली, अलाबामा येथील तुस्केगी विद्यापीठाला भेट दिली आणि फिलीपिन्समधील कामगारांशी भेट घेतली. युनायटेड स्टेट्समध्ये असताना त्यांनी न्यूयॉर्क शहरात इंडियन होम रूल लीग आणि यंग इंडिया आणि हिंदुस्थान इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस असोसिएशन या मासिक नियतकालिकांची स्थापना केली होती.
राय यांनी युनायटेड स्टेट्स हाऊस कमिटी ऑन फॉरेन अफेअर्सकडे याचिका केली, ज्यामध्ये भारतातील ब्रिटीश राजाच्या कुप्रशासनाचे ज्वलंत चित्र रेखाटले, भारतीय जनतेच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षा यासह इतर अनेक मुद्द्यांमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या समर्थनाची जोरदार मागणी केली. ३२ पृष्ठांची याचिका, जी रातोरात तयार करण्यात आली होती, त्यावर ऑक्टोबर १९१७ मध्ये यू.एस. सिनेटमध्ये चर्चा झाली.
महायुद्ध संपल्यावर मायदेशी परतल्यानंतर ते देशाला स्वतंत्र करण्यासाठी पुन्हा सक्रिय झाले आणि असहकार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला, त्यामुळे काँग्रेस पक्षातील त्यांचा दर्जा वाढू लागला आणि ते ज्येष्ठ नेते म्हणून उदयास आले. पुढे त्यांच्या ज्येष्ठतेमुळे १९२० मध्ये कलकत्तामध्ये झालेल्या काँग्रेसच्या विशेष अधिवेशनात त्यांची अध्यक्षपदी निवड झाली.
त्यांनी क्रांतिकारी कार्यात अधिक सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि त्यासोबतच त्यांनी तरुणांना शिक्षित करण्यासाठी आणि त्यांना देशभक्तीची प्रेरणा देण्यासाठी आपल्या खिशातून ४०,००० रुपये मित्राला देऊन लाहोरमध्येच 'दयानंद अँग्लो विद्यालय' सुरू केले.
लालाजींनी इंग्रजांच्या जाचक धोरणांना नेहमीच विरोध केला आणि त्यामुळेच १९२८ मध्ये जेव्हा इंग्रजांनी देशवासीयांच्या भावना चिरडणारा काळा कायदा लादण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संपूर्ण देशात तीव्र विरोध झाला तेव्हा ६३ वर्षीय-वृद्ध लजपत राय यांनी लाहोरमध्ये निषेध केला.
३० ऑक्टोबर रोजी लालाजींच्या नेतृत्वाखाली 'सायमन कमिशन' लाहोरला पोहोचल्यावर हजारो देशवासीयांनी मोठी मिरवणूक काढून स्टेशनवर 'सायमन गो बॅक'च्या घोषणा देत सायमन कमिशनला आव्हान दिले, त्यामुळे पोलिस कॅप्टन संतप्त झाले. लाठीचार्ज करण्याचे आदेश स्कॉट यांनी दिले.
त्यांनी स्वतः लालाजींवर लाठ्यांचा वर्षाव केला, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. असे असतानाही जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी ‘माझ्या अंगावर पडलेली प्रत्येक काठी ही ब्रिटीश राजवटीचा शेवटचा खिळा ठरेल’, अशी घोषणा केली.
लालाजींना रुग्णालयात नेण्यात आले पण ते बरे होऊ शकले नाही आणि १७ नोव्हेंबर १९२८ रोजी स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती दिली.