शिवशाही धुवायची कुणी? 

ब्रह्मा चट्टे 
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मुंबई - शिवशाही कारभाराचा डंका पिटत एसटी महामंडळाने वातानुकूलित शिवशाही बस सेवा सुरू केली; पण त्यासाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या खासगी बसची रोजची साफसफाई कोणी करायची? हे करारात स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे धूळ खाऊन मळलेल्या, घाणीने भरलेल्या शिवशाही बस रस्तोरस्ती एसटीच्या अब्रूची लक्तरे काढत आहेत. 

एसटी महामंडळाने दोन हजार ३०० कोटींचा संचित तोटा कमी करण्यासाठी वातानुकूलित शिवशाही बस सुरू केल्या. एसटीच्या ताफ्यात अशा दोन हजार ‘शिवशाही’ टप्याटप्याने दाखल होत आहेत. आजपर्यंत ८३८ शिवशाही बस राज्यातील विविध मार्गांवर धावत आहेत. या बस चालवण्यासाठी भाड्याने घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी गाडीमालकाला बसचे भाडे एसटीकडून दिले जाते. चालकाचा खर्च बसमालक करीत असला तरी डिझेलचा खर्च व वाहकाचा पगार महामंडळालाच द्यावा लागतो. शिवशाही बस सरासरी किमान ३५ रुपये किलोमीटर दराने चालल्या तर परवडतात. सध्या शिवशाहीचे सरासरी उत्पन्न ४२ रुपये प्रति किलोमीटर आहे. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत भर पडत असली तरी या बस स्वच्छ कोणी करायच्या? असा वाद सुरू आहे. करारानुसार देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी बसमालकाची असल्याने बसची नियमित स्वच्छताही त्यानेच करावी, असे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे. 

राज्यातील एसटीच्या सर्व आगारांमध्ये बस स्वच्छतेसाठी यंत्रणा आहे. त्यामुळे गाड्यांची स्वच्छता एसटीने करावी, असा बसमालकांचा आग्रह आहे. या वादात प्रवाशांना जादा तिकिट भरूनही मळकट शिवशाहीतून प्रवास करावा लागत आहे.

ज्या शिवशाही बस एसटीच्या मालकीच्या आहेत, त्यांची स्वच्छता महामंडळच करते; पण ज्या शिवशाही बस खासगी मालकांच्या आहेत, त्या साफ करण्याची जबाबदारी त्या मालकांवर आहे.
- रणजीतसिंह देओल, उपाध्यक्ष, एसटी महामंडळ

Web Title: Who would clean the Shivshahi Bus