
तात्या लांडगे
सोलापूर : विनाअनुदानित शाळांना अंशत: अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि राज्यातील ६० हजारांहून अधिक शिक्षकांना आनंद झाला. २०१४ मध्ये टप्पा अनुदानाच्या नैसर्गिक वाढीचा शासन निर्णय निघाला आणि आता चार-पाच वर्षांत १०० टक्के अनुदान होऊन आपल्याला फुल्ल पगार मिळणार, असा विश्वास शिक्षकांना होता. मात्र, २५ वर्षे झाली तरीदेखील ३४२७ शाळा आणि १५ हजार ५७१ तुकड्या ४० ते ८० टक्के अनुदानावरच थांबल्या आहेत. त्यामुळे त्या शाळांवरील शिक्षकांनी ८ व ९ जुलैला शाळा बंद ठेवून रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील ७७१ शाळा व ३८३ तुकड्या सध्या २० टक्के अनुदानावर असून २२८ शाळा व २६५० तुकड्यांना ४० टक्के अनुदान मिळाले आहे. तसेच दोन हजार नऊ शाळा आणि चार हजार ११ तुकड्या ६० टक्के अनुदानावर आहेत. त्यांना दरवर्षी २० टक्के अनुदान (११६० कोटी रुपये) दिले जाईल, अशी ग्वाही तत्कालीन शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली होती. मात्र, मागील वर्षी आणि २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात त्यासंदर्भात कोणतीही तरतूद झाली नाही. त्यामुळे १९९८-९९ पासून अंशत: अनुदानावर नोकरी करणारे अनेक शिक्षक सध्या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, तरीदेखील त्यांना पूर्ण पगारीचा आनंद घेता आलेला नाही.
स्पर्धेच्या काळातही या शाळा व तुकड्यांनी पटसंख्या जपली आहे, तरीदेखील त्यांना ठरल्याप्रमाणे २० टक्क्यांचे टप्पा अनुदान का मिळत नाही, हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठीच आता राज्यभरातील ५० हजारांहून अधिक शिक्षक ८ व ९ जुलैला टप्पा अनुदान देण्याच्या मागणीसाठी शाळा बंद ठेवून आंदोलन करणार आहेत.
अनुदान मिळेल, कोणीही विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये
शासनाने टप्पा अनुदानावरील शाळांना वाढीव टप्पा अनुदान देण्याचे मान्य केले आहे, त्यामुळे ते निश्चितपणे मिळणारच आहे. तरीदेखील, विद्यार्थ्यांना वेठीस धरून शाळा बंद ठेवणे योग्य नाही. ८ व ९ जुलैला टप्पा अनुदानासाठी शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे निवेदन प्राप्त झाल्याने त्या दिवशी शाळा बंद राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे पत्र उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.
- डॉ. महेश पालकर, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
टप्पा अनुदानावरील शाळांची स्थिती
एकूण शाळा
३,४२७
एकूण तुकड्या
१५,५७१
दरवर्षीचा अपेक्षित निधी
११६० कोटी
टप्पा अनुदानावरील शिक्षक
५२,०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.