एक अधिवेशन नागपुरात घ्यायचे, हा करार पाळायचाच; काय सांगतात  विधानसभा अध्यक्ष

अभिजित घोरमारे
Thursday, 8 October 2020

अधिवेशन कुठे, केव्हा आणि किती दिवसांचे घ्यायचे, याचा निर्णय सर्वस्वी विधिमंडळाच्या अधिकारात असतो. कोरोनाच्या काळात पावसाळी अधिवेशन घेण्याचा मुद्दा जेव्हा समोर आला, तेव्हा ते दोन दिवसांचे घ्यायचे, असे सर्वानुमते ठरवण्यात आले होते. त्यावेळी कोरोनाची स्थिती सध्यापेक्षा भयावह होती.

भंडारा : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत येत्या डिसेंबर महिन्यात नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन घेऊ नये आणि अधिवेशनावर होणारा खर्च कोरोनाच्या उपाययोजनांवर आणि विदर्भाच्या विकासावर खर्च करावा, अशी मागणी काही आमदार आणि जनतेतूनही होत आहे. पण पावसाळी अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे सात डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशन होईल, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. 

नाना पटोले म्हणाले, अधिवेशन कुठे, केव्हा आणि किती दिवसांचे घ्यायचे, याचा निर्णय सर्वस्वी विधिमंडळाच्या अधिकारात असतो. कोरोनाच्या काळात पावसाळी अधिवेशन घेण्याचा मुद्दा जेव्हा समोर आला, तेव्हा ते दोन दिवसांचे घ्यायचे, असे सर्वानुमते ठरवण्यात आले होते. त्यावेळी कोरोनाची स्थिती सध्यापेक्षा भयावह होती. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी होतेय आणि मृत्यूदरही कमी कमी होत चालला आहे. ही सुखावह बाब आहे. 

ठळक बातमी - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला
 

हिवाळी अधिवेशनाला अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे त्यावेळी परिस्थिती कशी राहील, ते बघून तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आज हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही.  अधिवेशन काळात विधानभवनातील अनेक गाळे रिकामे करण्यात येतात. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राहायचे कुठे, असा प्रश्‍न उद्भवतो आणि कोरोनाच्या काळात भाड्याने खोल्या मिळत नाहीत. 

अशा लहान मोठ्या अडचणी येऊ शकतात. अधिवेशन घ्यायचे झाल्यास त्याची व्यवस्था नक्कीच केली जाईल. दरवर्षी अधिवेशन होते, तसे ते यावर्षीदेखील होईल. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर नागपुरात एक अधिवेशन घ्यायचे, असा करार झालेला आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना कराराचासुद्धा विचार केला जाईल. सरकार किती बिल आणते, त्यावर अधिवेशन किती दिवस चालवायचे, याचा निर्णय होईल. त्यामुळे आजच त्याबद्दल भाष्य करणे योग्य होणार नाही, असे नाना पटोले म्हणाले. 

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Winter session to be held in Nagpur : Nana Patole