Winter Session : फडणवीसांची मागणी अजित पवारांनी केली मान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

अधिवेशन १ दिवसाचं असतं तर ठिक होतं, ५ दिवसांच्या अधिवेशनात एकाच दिवशी १२ बिलं मांडण्याची पद्धत कोणती असा प्रश्नही फडणवीस यांनी विचारला.

हिवाळी अधिवेशन : फडणवीसांची मागणी अजित पवारांनी केली मान्य

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) आजपासून सुरुवात होत आहे. अनेक मुद्द्यांवर विरोधक या अधिवेशनात राज्य सरकारला घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलेली एक मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मान्य केली. अधिवेशनाला सुरुवात होताच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, पेपर फुटीसंदर्भात आणि वीज कनेक्शनसंदर्भात दिलेली नोटीस याबद्दल म्हणणं मांडण्याची संधी आम्हाला मिळावी. तसंच दिवसभराच्या कामकाजात १२ बिलं आहेत, एकीकडे दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आहे त्यातच एकदम १२ बिलं मांडणं आणि त्यावर विचार घेणं योग्य नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.

फडणवीस म्हणाले की, सभागृहात प्रश्नोत्तरं होत नाहीत, ते व्हायला हवं. लक्षवेधी व्हायला हवं. पहिल्या दिवशी ते घ्यायला हवं असं आपण मान्यही केलं. पण आज १२ बिलं मांडायची आणि त्यावर मतं घेण्याचं आजच्या कामकाज पत्रिकेत दिसतंय. पण ही कोणती पद्धत आहे. बिलं सदस्यांनी वाचायची होती. त्याआधीच एकदम १२ बिलं मांडली जातायत आणि त्यावर विचारही घेतले जातायत. अधिवेशन १ दिवसाचं असतं तर ठिक होतं, ५ दिवसांच्या अधिवेशनात एकाच दिवशी १२ बिलं मांडण्याची पद्धत कोणती असा प्रश्नही फडणवीस यांनी विचारला.

हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज पत्रिकेनुसार १२ बिलं मांडण्यात येणार असून त्यावर मतही घेण्यात येणार होतं. मात्र फडणवीस यांनी त्यावर मत घेऊ नये, बिलं जरूर मांडावीत. आम्हाला बिलं वाचायची आहेत अशी मागणी केली होती. फडणवीसांची ही मागणी मान्य करताना उपमुख्यंमंत्री अजित पवार म्हणाले की,सरकारची हीच भूमिका आहे, कामकाज पत्रिकेत जे काही आहे ते सगळं कामकाज घ्यावं. फक्त त्यात शासकीय विधेयकं 'ब' पर्यंत घ्यावं, त्यानंतरचे घेऊ नये. पुढे शोक प्रस्ताव घ्यावा आणि सरकारला हे मान्य आहे. त्यापद्धतीने आपण संमती द्यावी अशी विनंती अजित पवार यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली.