esakal | पुणे येथील साखर संकुल परिसरात उभारणार जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय !

बोलून बातमी शोधा

Sakhar Sankul}

देशातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या साखर उद्योगाची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी साखर संकुल परिसरात पाच एकर जागेत जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याबाबत साखर आयुक्तालयाकडून राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 

पुणे येथील साखर संकुल परिसरात उभारणार जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय !
sakal_logo
By
प्रदीप बोरावके

माळीनगर (सोलापूर) : देशातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या साखर उद्योगाची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी साखर संकुल परिसरात पाच एकर जागेत जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याबाबत साखर आयुक्तालयाकडून राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 

सद्य:स्थितीत जगामध्ये बर्लिन, मॉरिशस आणि ऑस्ट्रेलिया येथे साखर संग्रहालये आहेत. जगात ब्राझीलनंतर भारत देश साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या साखर उद्योगाची माहिती सर्वांना व्हावी, या उद्देशाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत सरकारला प्रस्ताव दिला आहे. पुणे येथील साखर संकुल परिसरात होणाऱ्या साखर संग्रहालयामध्ये ऊस उत्पादन, साखरेचे उत्पादन, गूळ, खांडसरी साखरेचे उत्पादन तसेच साखरेपासून बनणारे उपपदार्थ यांची प्रत्यक्ष माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी संग्रहालयात मिनी साखर कारखानाही उभारण्यात येणार आहे. कारखान्यांमधील आसवनी प्रकल्प, इथेनॉल, कंपोस्ट खत, सहवीज निर्मिती कशी होते याची माहिती नागरिकांना होणार आहे. 

पुणे जिल्ह्यातच संग्रहालय का? 
पुणे जिल्हा ऊस लागवडीमध्ये महाराष्ट्रात अग्रेसर आहे. पुणे जिल्ह्यात सहकारी आणि खासगी कारखाने कार्यरत आहेत. तसेच पाडेगाव येथे ऊस संशोधन केंद्रामध्ये नवीन उसाच्या वाणांची निर्मिती, अद्ययावत ऊस लागवड तंत्रज्ञानाबाबत संशोधन केले जाते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी येथे ऊस लागवड, उत्पादन व संशोधन होते. साखर आयुक्तालय पुण्यात असून साखर संकुल परिसरात साखर संग्रहालयासाठी पाच एकर जागा उपलब्ध आहे. 

साखर संग्रहालयात हे पाहायला मिळणार 

  • जागतिक स्तरावरील आणि देशांतर्गत साखरेसंबंधी माहिती 
  • गूळ, साखर निर्मितीच्या प्रात्यक्षिकांसह अद्ययावत मशिनरी 
  • गुऱ्हाळ, साखर कारखान्यांची सूक्ष्म प्रतिकृती 
  • साखर उद्योगाबाबत डिजिटल प्रदर्शनी 
  • साखर उद्योगामध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तूंचे विक्री केंद्र 
  • प्रेक्षागृह, कॅफे, सुसज्ज ग्रंथालय, कला दालन, सभागृह, पार्किंग सुविधा 

साखर संग्रहालयासाठी 40 कोटींचा खर्च 
साखर संग्रहालय उभारणीसाठी अंदाजे 40 कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. संग्रहालय उभारणीसाठी किमान पाच वर्षे कालावधी लागणार आहे. संग्रहालयाची देखभाल करण्यासाठी प्रवेश शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. तसेच साखर संकुल निधीमधून साखर संग्रहालयाची देखभाल व दुरुस्ती करता येईल. साखर संग्रहालयाच्या उभारणीसाठी राज्य स्तरावर नियामक समिती स्थापन करण्यात येणार आहे. 

देश आणि जागतिक स्तरावर साखर उद्योगात महाराष्ट्राचे योगदान पाहता साखर संग्रहालय उभारणे औचित्याचे ठरेल. याबाबत राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला आहे. हे साखर संग्रहालय शेतकरी, पर्यटक, विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरेल. 
- शेखर गायकवाड, 
साखर आयुक्त 

संपादन : श्रीनिवास दुध्याल