esakal | पंजाब, हरियानात कुस्तीसाठी इनाम; 'महाराष्ट्रातील मल्लांनी धरली उत्तर भारताची वाट'
sakal

बोलून बातमी शोधा

'महाराष्ट्रातील मल्लांनी धरली उत्तर भारताची वाट'

'महाराष्ट्रातील मल्लांनी धरली उत्तर भारताची वाट'

sakal_logo
By
मतीन शेख

कोल्हापूर : कोरोना महामारीने महाराष्ट्राची कुस्ती (Maharashtra Wrestlers) गेली दीड वर्षे टाळेबंद केली. यात्रा, जत्रा, उरुसातील मैदाने रद्द झाल्याने मल्लांमध्ये अस्वस्थता आहे. परिणामी मल्लांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे राज्यात कुस्ती स्पर्धा बंद आहे; परंतु पंजाब, हरियानामधील (Panjab ,Hariyana)आयोजकांकडून मोठ्या इनामाची खुली कुस्ती मैदान भरविण्याचा धडाका महिनाभरापासून सुरू आहे. हिच संधी साधत कोल्हापूरसह महाराष्ट्रातील मल्लांनी उत्तर भारताची वाट धरल्याचे सध्या चित्र आहे. कुस्तीची पंढरी म्हणून कोल्हापूरची ओळख आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी जगभरातील मल्लांना राजश्रय दिला; परंतु याच पंढरीतील कुस्ती सध्या थांबली आहे. कुस्तीच्या सरावासाठी, स्पर्धेसाठी उत्तर भारतातील मल्लांचा कोल्हापुरात राबता असायचा; पण सध्या हा ओघ थांबला आहे. उलट कोल्हापूरसह सांगली, सोलापूर, पुण्याच्या मल्लांना पंजाब, हरियानाची आस लागली आहे. उत्तर भारतात सध्या महाराष्ट्राच्या मल्लांना कुस्तीच्या लढतीसाठी विशेष बोलावले जात आहे. लाखोंची बक्षिसे या मैदानांसाठी जाहीर करण्यात येत असल्याने महाराष्ट्राचे मल्ल सहभागी होत तेथील तगड्या जोडीतील मल्लांशी दोन हात करायला तयार होत आहेत.

शेजारील कर्नाटकातही कुस्ती सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मल्लांनी तेथे सहभागी होत नव्या दमाने शड्डू ठोकला आहे. मल्लांना चांगले इनाम मिळत असल्याने त्यांच्या खुराकाची व्यवस्था होणार आहे. सर्वच मल्लांना बाहेर राज्यात स्पर्धेसाठी जाणे शक्य होत नाही, तरी महाराष्ट्रातील कुस्तीचे फड सुरू होणे गरजेचे आहे, तरच इथल्या सर्व मल्लांना उभारी मिळणार आहे.

हेही वाचा: वाहरे पठ्ठ्या म्हणून शाबासकी द्याल का!

राज्य सरकाराने पुढाकार घ्यावा

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षतेमुळे अनेक आखाड्यांना निधी नाही. परिणामी तालमींची दुरवस्था झाली आहे. कोल्हापूरसह राज्यातील अनेक मानाच्या स्पर्धा भरवणे बंद झाले आहे. पैलवान, वस्ताद मंडळींकडून कुस्ती स्पर्धा सुरु करण्याची मागणी होत आहे. त्याचा राज्य सरकारने विचार केला पाहिजे, अशी शौकिनांची मागणी आहे.

सिकंदर व माऊलीचा धूमधडाका...

गेल्या आठवड्यापासून सिकंदर शेख व माऊली जमदाडे या मल्लांनी उत्तर भारतात आपला दबदबा निर्माण केला आहे. सिंकदरने पंजाबी मल्ल जस्सा पट्टी, प्रीतपाल सिंग, धर्मेंदर कोहली यांना तगडी लढत देऊन महाराष्ट्राचा झेंडा फडकावला आहे. त्याला मोठ्या रकमेची रोख बक्षिसे, एक दुभती म्हैस, तसेच मोटारही इनामात मिळाली आहे. माऊलीने प्रतिस्पर्धी उमेश मथुराला चितपट करत वर्चस्व राखले आहे. दोन्ही मल्ल तेथील शौकिनांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

loading image
go to top