सायबर गुन्हेगारांवर भारी ठरेल पंचसूत्री! पैशांच्या अमिषातून वाढली सायबर गुन्हेगारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime
तरुणांना नाही नोकरी, झटपट पैसे कमावण्याच्या आमिषेतून वाढली सायबर गुन्हेगारी

सायबर गुन्हेगारांवर भारी ठरेल पंचसूत्री! पैशांच्या अमिषातून वाढली सायबर गुन्हेगारी

सोलापूर : राज्यातच नव्हे तर देशभरात बेरोजगारी वाढली असून, उच्च शिक्षणानंतरही नोकरी, रोजगार मिळत नाही. तर शासकीय व खासगी नोकरदारांच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढतच आहेत. सेवानिवृत्त व्यक्ती निवांत घरी बसून असतानाही अनेकांना बंगला, चारचाकी गाडी, पैसे कमावण्याची इच्छा आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड सुरू असते. अशा वेगवेगळ्या घटकांमधील लोकांची मानसिकता ओळखून सायबर गुन्हेगार नेहमी फसवणुकीचे वेगवेगळे डाव टाकत आहेत. मेसेज, कॉल, लिंक पाठवून त्या लोकांना कमी दिवसांत जादा पैसे देण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले जात आहे. ऑनलाइनचा वापर वाढल्याने सायबर गुन्हेगार फसवणुकीचे दररोज वेगवेगळे फंडे शोधू लागले आहेत.

सायबर फसवणुकीचे फंडे...

 • १) पेटीएम केवायसी किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून बँक खाते क्रमांक व त्यांच्या मोबाईलवरील ओटीपी मिळवून अथवा पेटीएम, फोन पे यांसारख्या मोबाईल वॉलेट कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून कॅशबॅकच्या आमिषेतून क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगून, तसेच यूपीआय पिनची मागणी करून बँक खात्यातून परस्पर रक्कम काढली जाते.

 • २) खरेदी, विवाह, खाद्यपदार्थांची माहिती देणाऱ्या संकेतस्थळांवर बनावट कस्टमर केअर क्रमांक टाकूनही फसवणूक केली जात आहे. लग्न जुळविणाऱ्या साइट्सवरून अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन मैत्री करून आधी प्रेमाचे जाळे आणि नंतर महागड्या गिफ्टच्या मोहात पाडून विशेषत: एकाकी, घटस्फोटित अशा महिलांना प्रामुख्याने लक्ष्य करून त्यांची फसवणूक केली जाते.

 • ३) सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅपवरून एनी डेस्क, क्विक सपोर्ट, टीम व्ह्यूवर अशा अॅपची लिंक पाठवून ते डाउनलोड करण्यास सांगून समोरच्या व्यक्तीच्या मोबाईलवर ताबा मिळवतात व समोरील व्यक्तीच्या खात्यातील सर्व रक्कम काढून घेतात.

 • ४) वीजबिल तत्काळ भरा, अन्यथा लाइट तोडली जाईल, म्हणून मेसेज पाठविला जातो. हॉटेल्स, ट्रॅव्हल्स बुकिंगच्या स्कीम सांगून सवलतीचे आमिष दाखविले जाते. कंपनीत मुले हवी आहेत, वर्क फ्रॉम होमद्वारे दरमहा कमवा हजारो रुपये, असेही मेसेज, लिंक पाठविले जातात. त्यातून आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत.

 • ५) हॉस्पिटलचा नंबर मिळवून, तुमच्याकडे आमचे २५-५० लोक तपासणीसाठी आणायचे आहेत. त्यांची फी भरायची असून, बॅंक डिटेल्स मागवून घेतले जातात. सुरवातीला थोडी रक्कम संबंधित डॉक्टरला पाठवायला सांगून त्यांच्या खात्यातील सगळे पैसे लंपास केले जातात.

 • ६) काहीवेळा तरुण-तरुणी किंवा घरातील एकटे असलेले ज्येष्ठ नागरिक, महिलांना आधार हवा असतो. त्यांची मानसिकता ओळखून त्यांना लिंक पाठवून व्हिडिओ कॉल केले जातात. काही दिवस आधार वाटणारी समोरील व्यक्ती ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळतात.

 • ७) बऱ्याचदा शिक्षणाच्या नादात मुला-मुलींचे विवाहाचे वय निघून जाते. ते वधू-वराच्या शोधात असतात. विवाह नोंदणी साइटवर जाऊन मुला-मुलींचा शोध घेतला जातो. त्यावेळी सायबर गुन्हेगार त्या तरुण-तरुणीला आमिष दाखवून जाळ्यात ओढून फसवतात.

 • ८) ३५-४० हजारांपासून दीड-दोन लाख रुपये गुंतवा आणि आकर्षक कॅशबॅक मिळवा, अशी आमिषे दाखवून सायबर गुन्हेगारांनी अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे. अनेकांनी त्यात पैसा गुंतवला, काही दिवस त्यांना पैसेही मिळाले, पण आमिषेतून आणखी पैसे गुंतवले जातात आणि संबंधित गुन्हेगार सगळे पैसे घेऊन पसार होतात.

पाच वर्षांतील राज्यातील ‘सायबर’ची स्थिती

 • तक्रारींची संख्या

 • १,१९,७००

 • लंपास झालेली अंदाजित रक्कम

 • ५५० ते ७०० कोटी

 • परत न मिळालेली अंदाजे रक्कम

 • ३०० कोटी

 • तक्रारदार पुढे न येणाऱ्यांची संख्या

 • ३९ टक्के

सोशल मीडिया वापरताना अशी घ्या काळजी...

 • पर्सनल मोबाईल नंबर व पब्लिक मोबाईल नंबर वेगळा ठेवा

 • कोणत्याही लिंक किंवा ॲपवर क्लिक करू नका

 • टोपणनावाचा वापर करा, ऑनलाइन प्रोफाईलमध्ये वैयक्तिक माहिती देऊ नका

 • प्रोफाइल सेट करताना मजबूत प्रायव्हसी सेटिंग करा

 • सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय तथा इंटरनेट वापरू नका

फसवणूक टाळण्याची पंचसूत्री

 • अर्जंट किंवा तत्काळ अशा स्वरूपात मेसेज किंवा लिंक आल्यास ओळखा, की फसवणूक होणारच

 • ‘केवायसी’ मोबाईलवर कोणाच्या सांगण्यावरून करू नका

 • ओटीपी कोणालाही देऊ नका, बॅंक किंवा एटीएमचा पिन वारंवार बदला

 • सवलत, कमी दिवसांत जास्त पैसे मिळतील, ॲवॉर्ड भेटलाय, नोकरी लागलीय अशा गोष्टींना बळी पडू नका

 • जुन्या गाड्या किंवा वस्तू स्वस्तात भेटतील, यावर फारसा विश्वास नकोच

फसवणूक झाल्यास लगेच करा तक्रार

ऑनलाइन फसवणूक झाल्यावर लगेचच cybercrime.gove.in यावर तक्रार करावी, जेणेकरून बॅंक खाते गोठवता येईल. घाबरू नका, शांत राहा, चॅट थांबवा, लॉगऑफ करा, संवादाचा स्क्रीनशॉट घ्या, पोलिसांना त्याची माहिती द्या; जेणेकरून संबंधितावर कारवाई करणे सोयीचे होईल, अशी माहिती सायबर क्राईमचे महाराष्ट्राचे पोलिस अधीक्षक सुनील शिंथ्रे यांनी दिली.

तुका म्हणे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे...

झटपट पैसा कमवून श्रीमंत होण्याची तृष्णा वाढू लागली आहे. पण, त्या लोभापायी अनेकांची वाताहत झाली असून, काहींनी जीव दिला आहे. वाईट विचारातून, मार्गातून कमावलेला पैसा आयुष्याची बरबादी करतो. लोक पैसे, धनासाठी जीव द्यायला तयार होतात किंवा घेतातही. त्यांच्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।। उत्तमची गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ।।’ तसेच ‘लाभाचिया सोसे पुढे चाले मन । धनाचा कृपण लोभ जैसा ।। तुका म्हणे धन । धनासाठी देते प्राण ।।.