esakal | महाराष्ट्रात झिका विषाणूचा शिरकाव; पुण्यात आढळला पहिला रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Zika virus

महाराष्ट्रात झिका विषाणूचा शिरकाव; पुण्यात आढळला पहिला रुग्ण

sakal_logo
By
अमित उजागरे

पुणे : कोरोनाच्या संकटात केरळनंतर महाराष्ट्रात आता झिका विषाणूचा शिरकाव झाला आहे. पुणे जिल्ह्यात या विषाणूचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळून आला आहे. महाराष्ट्रातील ही पहिलीच केस आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या या रुग्णाची तब्येत स्थिर असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव यांनी दिली. (Zika virus infected patient found in Pune first case in maharashtra aau85)

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर इथं हा बाधित रुग्ण आढळला आहे. बेलसर गावात जुलै महिन्याच्या सुरुवातीला लोक तापानं आजारी पडत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली. यांपैकी पाच जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी १६ जुलै २०२१ रोजी राष्ट्रीय विज्ञान संस्था पुणे अर्थात एनआयव्हीमध्ये पाठवण्यात आले होते. यांपैकी तीन जणांना चिकनगुन्या झाल्याचं समोर आलं. यानंतर एनआयव्हीचे डॉ. योगेश गुरव यांच्या टीमनं बेलसर आणि परिंचे गावाला भेट देऊन ४१ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने संकलित केले. यांपैकी २५ जणांना चिकनगुन्या, ३ जणांना डेंग्यु तर एका पन्नास वर्षांच्या महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. हा महाराष्ट्रात आढळलेला पहिलाच रुग्ण आहे. तसेच या रुग्णाला चिकनगुन्या आजारही झाल्याचं एनआयव्हीनं आपल्या आहवालात म्हटलंय.

रुग्ण आढळलेला परिसर कंटेन्मेट झोन घोषीत

सध्या हा रुग्ण ज्या परिसरामध्ये आढळला आहे, तिथल्या ५०० मीटर परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी वेगवेगळ्या पथकांच्या नेमणुकाही करण्यात आल्या आहेत, अशी माहिती बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर डांगे यांनी दिली.

डॉ. डांगे यांच्याशी चर्चा केली असता या रुग्णाला तीन दिवसापासून ताप, अंगावरती रॅशेश अशी लक्षण दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं. हा आजार हवेतून पसरत नाही. मात्र, ज्या नागरिकाला हा आजार झाला आहे, त्याला चावलेला मच्छर दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्याच्यापासून हा आजार पसरू शकतो. त्यामुळं ज्या नागरिकांना ताप, डोकेदुखी, अंगावर रॅश येणे अशी लक्षणे आहेत, अशा सर्व नागरिकांनी तात्काळ बेलसर आरोग्य केंद्राशी संपर्क करावा असं आवाहनही त्यांनी केलं. तर नागरिकांनी साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, कोरडा दिवस पाळावा, पाण्याची साठवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

loading image
go to top