जिल्हा परिषदेचा शिक्षक बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या रॅकेटचा सूत्रधार! ‘डीन’कडून ओटीपी घेतले अन्‌ वैद्यकीय तपासणी न करताच ३ लाखांत दिले प्रमाणपत्र; अहिल्यानगर, सोलापूर, नाशिकचे ८ जण अटकेत

सोलापूर शहर क्राईम ब्रॅंचने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणारी आठ जणांची टोळीच जेरबंद केली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघे, नाशिकमधील एक, सोलापूर शहरातील तिघे आहेत. सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वातील पथकाने हा तपास केला. अधिष्ठातांचा विश्वासघात करणारा ‘सिव्हिल’मधील तत्कालीन निवासी वैद्यकीय अधिकारी सतीश कनाके याला न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
solapur civil hospital

solapur civil hospital

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहर क्राईम ब्रॅंचने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणारी आठ जणांची टोळीच जेरबंद केली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघे, नाशिकमधील एक, सोलापूर शहरातील तिघे आहेत. सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वातील पथकाने हा तपास केला. अधिष्ठातांचा विश्वासघात करणारा ‘सिव्हिल’मधील तत्कालीन निवासी वैद्यकीय अधिकारी सतीश कनाके याला न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. बाकीचे सात संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

अहिल्यानगरातील पाटबंधारे विभागातील लिपिक राजेश भाऊसाहेब जाधव (वय ३८) याने २०१२ मध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळविले होते. आता त्याला नोकरीत कायम होण्यासाठी ऑनलाइन ‘युडीआयडी’ हवा होता. अहिल्यानगरमध्ये त्याचा ऑनलाइन अर्ज नामंजूर झाल्याने त्याने एजंटांमार्फत सोलापुरातील पत्ता असलेले बनावट आधारकार्ड काढले. त्याद्वारे सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाकडून एजंटांमार्फत ऑनलाइन प्रमाणपत्र मिळविले. त्यानंतर ‘सावली’ संस्थेच्या तक्रारीनंतर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी त्रिस्तरीय समिती नेमली.

बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्यांमध्ये आपल्याच रुग्णालयातील तिघे असल्याचे समोर आले. त्यानंतर डॉ. जयकरांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. शहर गुन्हे शाखेने सखोल तपास केला आणि राजेशला ३ लाखांत बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दापाश केला. पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक आयुक्त दिलीप पवार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक खेडकर यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कामगिरी पार पाडली.

३ लाख रूपयांत बनावट प्रमाणपत्र; अशी होती लिंक...

राजेशने ओळखीच्या महेश दिनकर बारगजेकडे ‘युडीआयडी’ काढून देण्यासंदर्भात विचारणा केली. त्यासाठी बारगजेने ३ लाख रूपये घेतले. पुढे बारगजेने अहिल्यानगरच्या ‘सिव्हिल’मधील सेवानिवृत्त राजेश रमाकांत ढवण याच्याशी संपर्क साधून त्याला २५ हजार दिले. ढवणने अहिल्यानगरमधील (पाथर्डी) महात्मा फुले नगरातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विजय बाबासाहेब गर्जे याच्याशी संपर्क साधून त्याला ४५ हजार रूपये दिले. पुढे गर्जेने नाशिकमधील खासगी कंपनीतील सेवानिवृत्त अरूण रामदास शिंपी या ई-सेवा केंद्र चालकाशी संपर्क केला. शिंपीने ५५ हजार घेतले आणि सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक वसीम शौकत खानला कॉल केला. सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील वसीम, दुसरा लिपिक सागर गोविंद रजपूत व तत्कालीन निवासी वैद्यकीय अधिकारी सतीश भाऊराव कनाके यांना एका प्रमाणपत्रासाठी प्रत्येकी २५ हजार रूपये दिले होते, अशीही बाब समोर आली. दीड वर्षांत सर्वोपचार रुग्णालयातून ३७१४ जणांना दिव्यांग प्रमाणपत्रे वितरी झाली, त्यातील संशयितांची पडताळणी सुरू आहे.

झेडपी शाळेवरील शिक्षक मुख्य सूत्रधार

दिव्यांग विभागाची जबाबदारी तुकाराम मुंढेंकडे असताना त्यांनी दिव्यांगांसाठी ऑनलाइन युनिक डिसॅबिलिटी आयडी (युडीआयडी) बंधनकारक केला. त्यासाठी ऑफलाइन प्रमाणपत्र घेतलेल्यांना पुन्हा वैद्यकीय तपासणी, कागदपत्रांची पडताळणी करावी लागते. संशयित आरोपी राजेश जाधवने एजंटांच्या माध्यमातून बनावट प्रमाणपत्र मिळविले. यात अहिल्यानगरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक विजय गर्जे मुख्य सूत्रधार आहे. त्याने अनेकांना बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवून दिली असून आता त्यादृष्टीने तपास करीत आहे. २०२२ ते जून २०२६ या काळातील सर्व दिव्यांग प्रमाणपत्रांची सध्या तपासणी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur ZP
NMC MBBS Admission
Fake Degree
Insurance Fraud
Marathi News Esakal
www.esakal.com