जिल्हा परिषदेचा ‘LKG-UKG’साठी शिक्षण आयुक्तांना प्रस्ताव! गावातील सुशिक्षित तरूण-तरूणी होणार शिक्षक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

schools
जिल्हा परिषदेचा ‘LKG-UKG’साठी शिक्षण आयुक्तांना प्रस्ताव! गावातील सुशिक्षित तरूण-तरूणी होणार शिक्षक

जिल्हा परिषदेचा ‘LKG-UKG’साठी शिक्षण आयुक्तांना प्रस्ताव! गावातील सुशिक्षित तरूण-तरूणी होणार शिक्षक

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ११० गावांमध्ये आता चिमुरड्यांच्या इंग्रजी शिक्षणासाठी एलकेजी-युकेजीचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाकडून उद्या (सोमवारी) शिक्षण आयुक्तांना अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे. मान्यतेनंतर आगामी शैक्षणिक वर्षापासून संबंधित गावांमध्ये एलकेजी-युकेजीचे वर्ग सुरु होणार आहेत.

स्पर्धेच्या काळात गावोगावी अमर्याद इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु झाल्या आहेत. शहरांमध्ये तर त्याचे फॅड ग्रामीणच्या तुलनेत अधिकच आहे. अशावेळी शासकीय शाळांमधील पटसंख्या टिकविण्याचे मोठे आव्हान तेथील शिक्षकांवर आहे.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याकडे पालकांचा वाढलेला कल मराठी विशेषत: जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. अतिरिक्त होण्याची वेळ आपल्यावर येवू नये म्हणून शाळांना सुटी लागल्यापासून अनेक शिक्षक पटसंख्या टिकविण्यासाठी घरोघरी तथा गावोगावी फिरत आहेत. तरीपण, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. स्वामी यांच्या विविध उपक्रमांमुळे गतवर्षी जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या साडेनऊ हजाराने वाढली होती.

आता यंदाही पटसंख्या वाढावी म्हणून गुणवत्तेला प्राधान्य दिले जात आहे. एलकेजी-युकेजीचे वर्ग सुरु केल्यानंतर झेडपी शाळांची पटसंख्या कमी होणार नाही आणि बालवयापासूनच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल, या हेतूने तो निर्णय श्री.स्वामी यांनी घेतला आहे.

‘एलकेजी-युकेजी’च्या अध्यापनासाठी ३ पर्याय

  • १) लोकसहभागातून त्या वर्गांवरील नियुक्त शिक्षकांचे मानधन भागविले जाईल.

  • २) ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून, झेडपीच्या सेस फंडातून कंत्राटी शिक्षकांचे देता येईल मानधन

  • ३) जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना दोन तासांचे अतिरिक्त अध्यापन करायला सांगता येईल

महापालिका शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे शिक्षण?

सोलापूर शहरात महापालिकेच्या ५८ शाळा असून त्याअंतर्गत जवळपास पाच हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. मागील कित्येक वर्षांपासून या शाळांचा पट वाढलेला नाही. शहरात इंग्रजी व खासगी अनुदानित शाळांशी स्पर्धा करताना अनेक शाळांना कुलूप लावावे लागले. तर काही शाळांची पटसंख्या खूपच कमी झाली आहे.

अशी परिस्थिती असतानाही महापालिका प्रशासनाने स्वत:च्या शाळांमध्ये काहीच बदल केलेला नाही, हे विशेष. केवळ एकाच शाळेत सध्या सेमी इंग्रजीचे शिक्षण दिले जाते. या पार्श्वभूमीवर, पर्यवेक्षकांकडून प्रस्ताव मागवून उर्वरित ५७ शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन आहे. त्याची कार्यवाही २०२४-२५ पासून करता येईल, असे प्रशासनाधिकारी हनुमंत जाधवर यांनी स्पष्ट केले.