महानायकाच्या धडाक्‍यामुळंच प्रेक्षणीय (सरकार 3)

महेश बर्दापूरकर 
मंगळवार, 16 मे 2017

श्रेणी :3 
निर्मिती : वेव्ह सिनेमाज 
दिग्दर्शक :रामगोपाल वर्मा 
भूमिका : अमिताभ बच्चन, मनोज वाजपेयी, अमित सध, यामी गौतम, जॅकी श्रॉफ आदी. 
 

रामगोपाल वर्मांच्या "सरकार 3'च्या बाबतीत दोन गोष्टी घडल्या आहेत. अमिताभ बच्चन या महानायकला तोड नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि दुसरं म्हणजे वर्मांकडं सांगण्यासारखं कमी उरलं असलं, तरी त्यांचा गेलेला फॉर्म येण्याची चिन्हं दिसताहेत. पहिल्या दोन भागांतील तुफान ऍक्‍शन आणि ड्रामानंतर या भागात वर्मांनी "सरकार'ला थोडं सौम्य आणि सामाजिक केलं आहे. पूर्णपणे या पात्रावर फोकस ठेवल्यानं इतर गोष्टी खूपच दुय्यम ठरल्या. केवळ अमिताभ बच्चन यांचा अभिनय आणि वर्मांच्या दिग्दर्शनाची छोटी झलक यांमुळं चित्रपट सुसह्य झाला आहे. 
"सरकार'च्या या भागात सुभाष नागरे ऊर्फ सरकारची (अमिताभ बच्चन) दोन्ही मुलं मारली गेल्यानं ते एकटे पडले आहेत. आपल्या विश्‍वासातल्या लोकांच्या जिवावर त्यांचं राजकारण सुरू असतानाच त्यांचा नातू, म्हणजे विष्णूचा मुलगा चिकू (अमित सध) घरी परततो. सरकारचा उजवा हात गोकुळला (रोनित रॉय) ही गोष्ट खटकते. गांधी नावाचा एक बिल्डर झोपडपट्टीच्या जागी इमारत उभी करण्यासाठी सरकारला गळ घालतो, मात्र सरकार ऑफर नाकारताच दोघांत बिनसतं. सरकारला आव्हान देऊ पाहणारा राजकारणी देशपांडे (मनोज वाजपेयी), सर (जॅकी श्रॉफ), एक युनियन लिडर (भारत दाभोलकर), सरकारकडून मारल्या गेलेल्या नेत्याची मुलगी अनू (यामी गौतम) एकत्र येऊन सरकारविरुद्ध कट रचतात. यात चिकूची भूमिका काय असते, सरकार या सर्वांना कसे पुरून उरतात याबद्दल चित्रपटाची कथा सांगते. 

सरकारचे आधीचे भाग अमिताभ बच्चन यांच्याभोवती फिरत होते, मात्र इथं पूर्ण लक्ष त्यांच्यावरच केंद्रित आहे. याचा तोटा म्हणजे चित्रपटात ऍक्‍शन खूपच कमी आणि संवाद जास्त आहेत. मध्यंतरापर्यंत आपलं घर सावरण्याच्या प्रयत्नातील सरकार पाहायला मिळतात. या भागात कॅमेरा अपवादानंच घराबाहेर जातो. देशपांडेनं आव्हान दिल्यानंतर सिनेमा वेग पकडतो, मात्र हे "उपकथानक' सुरू होण्याआधीच संपतं. सर हे पात्रही नक्की काय करतं आहे, याचा थांगपत्ता लागत नाही. अनूच्या कथानकातील भूमिकेबद्दलही असंच म्हणता येईल. रोहिणी हट्टंगडी व सुप्रिया पाठक यांचाही चांगला उपयोग करून घेता आलेला नाही. या सर्वच पात्रांचं लिखाण खूपच तकलादू झालं आहे. चिकूच्या पात्राला उत्तरार्धात महत्त्व येतं आणि सरकारविरुद्ध इतर सर्व हा सामना छान रंगतो. चिकू घरात आल्यानंतर वातावरणात आलेला तणाव, गणपती विसर्जन मिरवणुकीत सरकारवर झालेला हल्ला आदी प्रसंगांत वर्मा दिग्दर्शक म्हणून आपला जोरदार ठसा उमटवतात. इथंही ते आपला कॅमेराचा खेळ सुरूच ठेवतात. अंधाऱ्या खोलीत डोळ्यांची भेदकता टिपत, पात्राची मानसिकता दाखविण्यासाठी घरातील मूर्तींचा उपयोग करत, तर कधी चहाच्या कानातून पात्राचा चेहरा दाखवत ते प्रेक्षकांना एकाच अँगलमध्ये बसू देत नाहीत. "चुहा', "बिल्ली', "शेर' या शब्दांचा उपयोग करीत केलेली संवादांची पेरणी काही ठिकाणी अतिरेकी वाटते. "गोविंदा गोविंदा'च्या तालावरील पार्श्‍वसंगीत या वेळीही जमून आलं आहे. 

अमिताभ बच्चन यांनी हा चित्रपट एकहाती पेलला आहे. त्यांची स्वगतं, नुसत्या डोळ्यांतून दिलेले आदेश, भावुक प्रसंग आणि भारदस्त आवाजातून खलनायकांना दिलेलं आव्हान सगळंच अनुभवण्यासारखं. रुद्राक्षाच्या माळा बाळगण्याची पद्धत, बशीतून फुरकी मारत चहा पिण्याची लकब, हातात बंदूक फिरविण्याची स्टाइल सगळंच केवळ या महानायकाला शोभणारं. वयाच्या पंच्याहत्तरीत पोचल्यानंतरही आवाज आणि देहबोलीवरची त्यांची पकड अचंबित करते आणि त्यांच्या चाहत्यांना मनसोक्त आनंद देते. मनोज वाजपेयीनं साकारलेला गमत्या राजकारणी प्रभाव पडतो, मात्र पात्राचं लिखाण खूपच वरवरचं असल्यानं लक्षात राहत नाही. रोनित रॉयचा चांगला प्रभाव पडतो. जॅकी श्रॉफ, अमित सध, यामी गौतम आदींना फारशी संधी नाही. 
एकूणच रामगोपाल वर्माचा हा चित्रपट महानायक अमिताभ बच्चन यांच्या धडाकेबाज अभिनयामुळंच पाहण्यासारखा झाला आहे... 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahesh bardapurkar write about sarkar3 movie review