नवा चित्रपट : बघतोस काय मुजरा कर 

Baghtos kay mujra kar
Baghtos kay mujra kar

हाराष्ट्राला गड-किल्ल्यांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कित्येक किल्ले बांधले तर कित्येक किल्ले जिंकलेले आहेत. परंतु आज याच गड-किल्ल्यांची आज दयनीय आहे. त्यांच्या स्वच्छतेकडे आणि डागडुजीकडे सरकारचे म्हणावे तसे लक्ष नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे कोट्यवधी रुपयांचे स्मारक बांधले जात असताना गड आणि किल्ले यांच्या सुरक्षेकडे; तसेच डागडुजीकडे दुर्लक्ष होत आहे. 'बघतोस काय मुजरा कर' हा चित्रपट याच गोष्टीवर भाष्य करणारा आहे. सातारा जिल्ह्यातील खरबुजेवाडीमध्ये राहणाऱ्या तीन शिवभक्तांची ही कथा आहे. नानासाहेब देशमुख (जितेंद्र जोशी), पांडुरंग शिंदे (अनिकेत विश्‍वासराव) आणि शिवराज वहाडणे (अक्षय टांकसाळे) अशी त्यांची नावे आहेत. या तिन्ही मित्रांना शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन व्हावे; तसेच आजूबाजूच्या गावांचा विकास व्हावा, असे वाटत असते.

परंतु सत्तेवर आल्याशिवाय ते होऊ शकत नाही, असा विचार त्यांच्या मनात येतो. मग काय...नानासाहेबांनी आमदारकीची निवडणूक लढवावी असे ठरते. नानासाहेबांना तिकीट मिळावे याकरिता पांडा शेठ फिल्डिंग लावतो. मंत्री महोदय मॅडम (अश्‍विनी काळसेकर) यांना ही मंडळी जाऊन भेटतात. त्या मॅडम नानासाहेब आणि मंडळींना काही तरी वेगळे कार्य करून दाखवा, असा सल्ला देतात आणि त्यातूनच एक भन्नाट कल्पना त्यांच्या डोक्‍यात येते. लंडनमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार भारतात आणण्याची. त्याप्रमाणे हे तिघेही लंडनला जातात आणि पुढे कोणत्या घडामोडी घडतात, हे या चित्रपटात दाखविलेले आहे. लेखक हेमंत ढोमेचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच प्रयत्न आहे. काही अंशी त्याचा प्रयत्न चांगला असला तरी कित्येक त्रुटी जाणवतात हे नक्की. अभिनेता जितेंद्र जोशी, अनिकेत विश्‍वासराव, अक्षय टांकसाळे, अश्‍विनी काळसेकर, हेमंत ढोमे आदी कलाकारांनी चोख कामगिरी बजावली आहे. जितेंद्र जोशी, अनिकेत विश्‍वासराव आणि अक्षय टाकसाळे यांची केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे. या तिघांनीच चित्रपट जणू काही आपल्या खांद्यावर घेतला आहे, असेच वाटते. त्या तिघांची मैत्री...त्यांचे आचारविचार आणि कोणत्याही एका निर्णयावर त्यांचे होणारे एकमत... दिग्दर्शकाने छान टिपले आहे. नानासाहेबांचे शिवाजी महाराजांवरील प्रेम, त्यांच्याशी नकळतपणे साधला जाणारा संवाद आणि हे सगळे करताना आपल्या कुटुंबावर असलेले तेवढेच प्रेम... छान टिपले आहे. 

अनिकेतने एक वेगळा प्रयोग केला आहे आणि तो आहे आवाजाचा. त्याचे ठसकेबाज आणि दमदार बोलणे निश्‍चितच वाखाणण्याजोगे आहे. विक्रम गोखले, अनंत जोग, नेहा जोशी, पर्ण पेठे यांचीही कामगिरी चांगली झाली आहे. अनंत जोग यांनी साकारलेली इतिहासतज्ज्ञ केळकर ही भूमिका कथानकाला कलाटणी देते. चित्रपटातील काही संवाद धमाकेदार आहेत. त्यामुळे चित्रपट निश्‍चितच खुसखुशीत झाल्यासारखा वाटतो. गड आणि किल्ले यांच्या संवर्धनाकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करू नये, असा विचार या चित्रपटात मांडण्यात आलेला आहे.

एकूणच हा चित्रपट आणि त्याची कथा उत्तम असली तरी पटकथा बांधताना काहीशी फसगत झाली आहे. कारण काही व्यक्तिरेखा दिग्दर्शकाने अर्ध्यावरच सोडून दिल्या आहेत. काही बाबी अतार्किक आहेत. त्या मनाला पटत नाहीत. विशेष म्हणजे लंडनमधील राणीच्या पॅलेसमध्ये घुसणे. पोलिसांनी अटक केल्यानंतर तेथून सुटणे. मुळात लंडनमध्ये कायदेकानून कडक आहेत. राणीच्या पॅलेसबाहेर फिरणाऱ्यांनाही कडक कारवाईला सामोरे जावे लागते. मग हे लगेच कसे काय सुटतात, हा प्रश्‍न मनात निर्माण होतो. चित्रपटातील संगीतही काही चांगले झाले आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग यांची कामगिरी उजवी झाली आहे. लंडनमधील दृश्‍ये त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात छान टिपली आहेत. एकूणच सांगायचे झाले तर हा चित्रपट हसतखेळत पुढे जातो आणि मनोरंजन करता करता एक चांगला सामाजिक संदेशही देतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com