कथेमध्ये फसलेला जानू  (नवा चित्रपट - ओके जानू )

संतोष भिंगार्डे
शनिवार, 14 जानेवारी 2017

आदित्य रॉय-कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी "आशिकी-2'साठी एकत्र आली होती. हा चित्रपट यशस्वी ठरला होता. या जोडीचे प्रेक्षकांनी चांगलेच स्वागत केले होते. आता याच जोडीला घेऊन दिग्दर्शक शाद अलीने "ओके जानू' हा चित्रपट बनविला. लिव्ह इन रिलेशनशिपवर बेतलेला हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत खिळवून ठेवील, असा प्रश्‍न पडतो. आदी (आदित्य रॉय कपूर) कानपूरहून मुंबईत कामासाठी येतो. रेल्वे स्टेशनवर उभा असताना त्याला एक मुलगी आत्महत्या करीत असल्याचे दिसते. त्या मुलीला तो वाचविण्यासाठी जातो खरा, पण तोपर्यंत ती तेथून गायब झालेली असते. त्यानंतर त्याला तीच मुलगी त्याच्या मित्राच्या लग्नामध्ये भेटते.

आदित्य रॉय-कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी "आशिकी-2'साठी एकत्र आली होती. हा चित्रपट यशस्वी ठरला होता. या जोडीचे प्रेक्षकांनी चांगलेच स्वागत केले होते. आता याच जोडीला घेऊन दिग्दर्शक शाद अलीने "ओके जानू' हा चित्रपट बनविला. लिव्ह इन रिलेशनशिपवर बेतलेला हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत खिळवून ठेवील, असा प्रश्‍न पडतो. आदी (आदित्य रॉय कपूर) कानपूरहून मुंबईत कामासाठी येतो. रेल्वे स्टेशनवर उभा असताना त्याला एक मुलगी आत्महत्या करीत असल्याचे दिसते. त्या मुलीला तो वाचविण्यासाठी जातो खरा, पण तोपर्यंत ती तेथून गायब झालेली असते. त्यानंतर त्याला तीच मुलगी त्याच्या मित्राच्या लग्नामध्ये भेटते. तिचे नाव तारा (श्रद्धा कपूर) असे असते. मग काय... आदी आणि तारामध्ये चांगलीच मैत्री होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. ताराच्या आई-वडिलांचा डिवोर्स झालेला असतो. त्यामुळे ताराचा लग्न वगैरे गोष्टीवर विश्‍वास नसतो. आदी, गोपी काका (नसिरुद्धीन शाह) आणि चारू काकू (लीला सॅमसन) यांच्याकडे राहत असतो. आदीला अमेरिकेला जाऊन खूप पैसे कमवायचे असतात; तर ताराला पॅरिसला जाऊन आर्किटेक्‍ट व्हायचे असते. दोघांचीही स्वप्ने निरनिराळी असतात. दोघेही प्रेमामध्ये आकंठ बुडालेले असतात. मग दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. साहजिकच आदी ताराला गोपी काकांच्या घरी घेऊन येतो आणि तेथे ते राहत असतात. एकीकडे दोघांचे एकमेकांवर असलेले अपार प्रेम आणि दुसरीकडे करिअर... अशा द्विधा अवस्थेत ते सापडतात. मग काय होते ते पडद्यावर पाहिलेले बरे. हा चित्रपट "ओके कधाल कन्मणि' या तमीळ चित्रपटाचा रिमेक आहे. अगदी फ्रेम टू फ्रेम हा चित्रपट घेण्यात आला आहे. शाद अलीचे दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय आणि गुलजार यांच्या शब्दांना रेहमानने दिलेली चाल हीच या चित्रपटाची जमेची बाजू आहे. आदित्य रॉय-कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी सहजसुंदर अभिनय केला आहे. त्यांची पडद्यावर जुळलेली केमिस्ट्री निश्‍चितच चांगली आहे. दोघांनीही आपापल्या भूमिकेतील बारकावे छान टिपले आहेत. करिअर की प्रेम याबाबत जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा त्यांची झालेली द्विधा अवस्था दिग्दर्शकाने छान टिपली आहे. नसिरुद्दीन शाह ही एक अभिनयाची संस्था आहे. गोपी काकांच्या भूमिकेत त्यांनी ते पुन्हा सिद्ध केले आहे. "हम्मा हम्मा' या लोकप्रिय गाण्याचा रिमेक या चित्रपटात घेण्यात आला आहे. ते आदित्य आणि श्रद्धावर छान चित्रित झाले आहे. अन्य गाणीही सुमधुर आहेत. गुलजार यांची गीते आणि रेहमान यांचे संगीत अगोदरच लोकप्रिय ठरले आहे. या गाण्यांनीच चित्रपटाची कथा काहीशी पुढे नेली आहे. मात्र चित्रपट म्हणावा तसा मनाला भिडत नाही. कारण काही गोष्टी निश्‍चितच खटकतात किंवा काही उणिवा जाणवतात. ते दोघेही जेव्हा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात तेव्हा त्यांच्यातील रुसवे-फुगवे, हेवेदावे प्रखरपणे दाखविणे आवश्‍यक होते; परंतु केवळ प्रेम आणि प्रेमाच्या मिठ्या सारख्या दिसत राहतात. अलीकडे काही चित्रपट पाहिले की असे जाणवते की प्रेम प्रसंगांमध्ये जणू काही ओढाताण सुरू आहे. कोण किती लव्ह आणि किसिंग सीन दाखवितो याची जणू काही स्पर्धा लागलेली आहे आणि या स्पर्धेत पटकथा भरकटत चाललेली आहे. त्यामुळे एखादी कथा पडद्यावर मांडताना त्याला तितक्‍याच भक्कम पटकथेचा आधार असणे आवश्‍यक आहे हे विसरले जाते. या चित्रपटाच्या बाबतीत बोलायचे झाले तर जणू काही प्रेम आणि प्रेमाचे प्रसंग यांची स्पर्धा लागलेली आहे की काय, असे वाटते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ok jaanu movie review