
तरुण दरीत कोसळला! 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना..
Accident News in kolhapur: गेले काही दिवस 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची बरीच चर्चा होती. हा चित्रपट मध्यंतरी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता या चित्रपटावर नवे संकट ओढवले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरात पन्हाळा परिसरात सुरू असताना एक तरुण कलाकार दरीत कोसळला आहे.
(a young man fell from panhala fort during vedat marathe veer daudale saat shooting in kolhapur)
कोल्हापूरमधील पन्हाळगडावर एक दुर्घटना घडली आहे. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर फोटोग्राफी करताना किल्ले पन्हाळगडावरील सज्जा कोठीवरून एक तरुण दरीत पडला आहे. शनिवारी 18 मार्च रोजी रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. नागेश तरडे असे दरीत पडलेल्या तरुणाचे नाव असून, तो गंभीर जखमी आहे.
आगामी मराठी चित्रपट 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचे सध्या किल्ले पन्हाळगडावर शूटिंग सुरू आहे. शूटिंग संपल्यानंतर नागेश हा तरुण मावळ्याच्या वेशात होता. यावेळी तो फोटोग्राफीसाठी सज्जा कोठीच्या तटबंदीवर चढला. त्यावेळी पाय घसरून तो दरीत पडला. त्याची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. आधी या चित्रपटातील सात मावळ्यांचे पोशाख आणि त्यांना दिलेले रूप यावरून बोलले गेले. मग महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्य मांजरेकर मावळा वाटतो का, यावरूनही खूप टीका केली गेली. आता या घटनेमुळे पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आला आहे.