भीमगीत आणि आंबेडकरी चळवळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhimgite

लोकगीतं, कव्वाली, सामने यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभरात नाव कमावलं होतं. त्याच वेळेस आम्ही लोकगीतांशिवाय इतर काय गाऊ शकतो, याची चर्चा होऊ लागली.

भीमगीत आणि आंबेडकरी चळवळ

लोकगीतं, कव्वाली, सामने यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभरात नाव कमावलं होतं. त्याच वेळेस आम्ही लोकगीतांशिवाय इतर काय गाऊ शकतो, याची चर्चा होऊ लागली. हे आमच्यासाठी आव्हान होतं. ते आम्ही स्वीकारलं आणि बुद्धगीते आणि भीमगीतांचे प्रचंड मेहनतीने अल्‍बम तयार करून, आमची वेगळी ओळख कमावली. ती फक्त गीतं नाहीत तर बाबासाहेबांच्या विचारांनी गतिशील असणाऱ्या चळवळीचा एक भाग आहेत. आंबेडकरी गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार आम्ही घराघरांत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

लोकसंगीतामध्ये ‘नवीन पोपट’ हिट झाला होता. आम्ही धमाल उडवून दिली होती. लोकांनाही आमचं काम, आमची गाणी, आमची गायकी प्रचंड भावली होती. लोकगीतं, कव्वाली, सामने यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभरात नाव कमावलं होतं. सर्व काही व्यवस्थित सुरू झालं होतं, मात्र काही लोकांकडून आम्हाला वेगळ्या प्रकारच्या गाण्यांची अपेक्षा होती. काही लोकांचं म्हणणं होतं की, लोकगायक प्रल्हाद शिंदे यांची मुलं लोकगीताशिवाय काय गाऊ शकतात, हे आम्हाला एक चॅलेंजच होतं. त्यामुळे आम्हीही रिस्क घेऊन वेगळ्या प्रकारची गाणी करण्याचं ठरवलं. काहीही झालं तरी वेगळा प्रयोग करायचा, हा ‘पण’ आम्ही केला आणि त्यासाठी आम्ही विषय निवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भीमगीते आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील बुद्धगीते.

सुरुवातीला आम्ही दोन कॅसेट काढण्याचे ठरवले. बुद्धगीते किंवा भीमगीते यांच्यावरचा हा पहिला व्यावसायिक अल्बम होता. त्यासाठी आम्हाला कलाकारांची जमवाजमव करायला लागली. दादा प्रल्हाद शिंदे गाण्यांना चाली द्यायला तयार होते. गीतकार शोधायचे होते. मानवेल गायकवाड, प्रतापसिंग बोदडे अशा काही गीतकारांची टीम आम्ही तयार केली. आंबेडकरी चळवळीतली कलाकार मंडळी होती, त्यांच्याशी संपर्क करून आम्ही हा अल्बम बेस्ट कसा होईल यासाठी प्रयत्न केले. ‘सोनियाची उगवली सकाळ’ हा अल्बम सर्वप्रथम रेकॉर्डिंग करण्याचे ठरले. बऱ्याच महिन्यांपासून कॅसेटवर काम सुरू होतं. शेवटी कॅसेट रेकॉर्डिंग पूर्ण झालं. मी आणि मिलिंदने जीव ओतून गाणी गायली. आत्तापर्यंत आम्हाला लोकगीत, कव्वाली, सामने अशा प्रकारची वरच्या स्वरातली आणि विशिष्ट प्रकारची उडती गाणी गायचा सराव होता. ‘सोनियाची उगवली सकाळ’ या गाण्यासाठी मात्र आम्हाला विशेष सराव आणि मेहनत करावी लागली. कारण या कॅसेटमधील गाण्यांचा विषय, गाण्यांचा मूड, पट्टी वेगवेगळी होती. त्यामुळे गायक म्हणून आमचा कस लागणार होता. आम्ही दादा प्रल्हाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गाण्यांचा सराव करून घेतला. दादांचा अनुभव आणि मार्गदर्शन याची या वेळी आम्हाला खूप मदत झाली. या गाण्यांचे संगीत स्वतः दादा प्रल्हाद शिंदे यांनीच बांधलं होतं. त्यामुळे गाणे समजून घेणं, ती रेकॉर्डिंग करणं आम्हाला शक्य झालं.

‘सोनियाची उगवली सकाळ’ आणि ‘बुद्ध आले जन्मास’ या दोन्ही कॅसेट एकामागून एक रिलीज झाल्या. गाण्यांनी एकच धमाल उडवून दिली. आंबेडकरी समाजाने ही गाणी डोक्यावर घेतली. घराघरांमध्ये ही गाणी वाजू लागली. आमचं भरभरून कौतुक होत होतं. एकही बुद्ध पौर्णिमा किंवा आंबेडकर जयंती अशी नव्हती की ज्या कार्यक्रमात या दोन्ही कॅसेटमधील गाणी वाजत नव्हती. इतकंच नाही तर इतर महापुरुषांच्या जयंतीनिमित्तानेदेखील ही गाणी वाजवली जात होती. गाणी लोकांना आवडली याचा तर आनंद होताच; पण त्याहून जास्त आनंद हा आमची वेगळ्या धाटणीची गाणी, गायकी लोकांना पसंत पडली याचा अधिक होता. आमची वेगवेगळ्या प्रकारची गाणी रेकॉर्ड करण्याची इच्छा अर्थपूर्ण झाली होतीच, शिवाय मोठ्या जिद्दीने केलेला प्रयोगदेखील यशस्वी ठरला होता. आणखी सर्वात मोठा आनंद म्हणजे या गाण्यांच्या चाली दादा प्रल्हाद शिंदे यांनी बांधल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही गाणी रेकॉर्ड केली होती. त्यामुळे आमची गाणी लोकांना आवडली आणि आमची गायकी या अल्बममध्ये खुलून आली. या अल्बमच्या माध्यमातून आम्हाला भगवान बुद्धांना वंदन करता आले, तर बाबासाहेबांच्या विचारांना आदरांजली वाहता आली.

या कॅसेट आल्यानंतर आंबेडकर जयंती, बुद्ध पौर्णिमा आणि आनंद शिंदे-मिलिंद शिंदे हे समीकरण झालं. जयंतीनिमित्त कार्यक्रमांसाठी आम्हाला बोलावणं येऊ लागलं. अवघ्या महाराष्ट्रामध्ये भीमगीतांचे कार्यक्रम होऊ लागले. वेगवेगळे अनुभव आले. दौऱ्यानिमित्त अख्खा महाराष्ट्र पिंजून काढावा लागत होता. आमच्या व्यग्र कार्यक्रमांमुळे आम्हाला कुटुंबाला फार वेळ देता येत नव्हता. कधी संधी मिळेल तेव्हा आदर्शला मी कार्यक्रमासाठी सोबत घेऊन जात होतो. त्यामुळे त्याने आमचे बरेच कार्यक्रम एन्जॉय केले आहेत.

कॅसेटसह कार्यक्रमांना मिळालेल्या यशानंतर आंबेडकरी भीमगीतांचे अनेक कार्यक्रम, अल्बम कॅसेट आम्ही तयार केल्या. वामन दादा कर्डक, विठ्ठल उमप, मधुकर पाठक यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत या निमित्ताने मला काम करता आलं. याच दरम्यान वामनदादाचं गाणं गायची संधी मला मिळाली. अनेक गीतांना मधुकर पाठक, प्रल्हाद शिंदे यांच्या चाली लाभल्या होत्या. विठ्ठल उमप यांनी लिहिलेलं बाबासाहेबांवरील गाणी गायचीदेखील मला संधी मिळाली. काही गाणी मी स्वतः बांधली होती, तीही लोकांना फार आवडली.

आम्ही गायलेली गाणी ही आजही घराघरांमध्ये ऐकली जातात. जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमांत तुम्ही आजही ही गाणी ऐकू शकता. लोकांच्या प्रेमामुळे एकापेक्षा एक सरस गीतं जन्माला आली. त्या काळातील अल्बमवर केलेलं काम पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल की, त्या काळी बाबासाहेबांवर, त्यांच्या विचारांवर असीम श्रद्धा असणारी एकापेक्षा एक सरस कलाकार मंडळी होती. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता केवळ बाबासाहेबांच्या नावावर ही सर्व मंडळी एकत्र येऊन काम करायची. ‘सोनियाची उगवली सकाळ’ असेल किंवा ‘चला निळ्या निशाना खाली’, ‘सर्वांनी एक व्हा रे’, ‘अरे सागरा, भीम माझा येथे निजला शांत हो जरा’, अशा प्रकारची अप्रतिम गाणी तयार झाली. ही गाणी केवळ जयंतीपुरती किंवा रेकॉर्डिंगसाठी तयार झालेली नाहीत तर अनेक गाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून आणि सामन्यांतून तयार झालेली आहेत. महाराष्ट्रभर आमचे कार्यक्रम आणि सामने होत असताना, त्यासाठीदेखील अनेक आंबेडकरी गीतं लिहिली जायची आणि त्यातूनच पुढे आंबेडकरी गीतांचा खजाना तयार झाला.

मला आठवतं माझा पहिला सामना हा अविस्मरणीय झाला होता. त्या सामन्याची संधी मला सुषमा देवी यांनी दिली होती. शिरडोनला तो कार्यक्रम झाला होता. त्यासाठी आम्ही खास वेगळ्या प्रकारची गाणी तयार केली होती आणि अशाच प्रकारच्या कार्यक्रमांतून बुद्धगीतं आणि भीमगीतं तयार झाली आहेत. भीमगीतं असोत किंवा इतर महापुरुषांवरील गीतं, ही गाणी बनवताना आम्हाला वेगळेच आत्मिक समाधान मिळते. मला वाटतं ही फक्त गीतं नाहीत तर बाबासाहेबांच्या विचारांनी गतिशील असणाऱ्या चळवळीचा एक भाग आहेत. आंबेडकरी गीतं ही एक चळवळ असून, या भीमगीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार आम्ही घराघरांत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. केवळ आम्हीच नाही तर दादा प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, वामनदादा कर्डक यांनीदेखील या चळवळीला गती दिली. त्यांचाच हा आंबेडकरी वारसा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. या माध्यमातून आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी विचार गतिमान होतोय, याचा मला विशेष आनंद आहे.

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

Web Title: Aanand Shinde Writes Bhim Song And Ambedkar Movement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..