रियाजाची शिदोरी!

रियाजाचं कुठलंही शास्त्र माझ्याकडे नाही. माझ्याकडे आहे ती फक्त दादांनी अर्थात माझे वडील प्रल्हाद शिंदे यांनी त्यांच्या अनुभवातून मला दिलेली त्यांच्या मार्गदर्शनाची आणि प्रेमाची शिदोरी.
Pralhad Shinde and Anand Shinde
Pralhad Shinde and Anand ShindeSakal
Updated on

रियाजाचं कुठलंही शास्त्र माझ्याकडे नाही. माझ्याकडे आहे ती फक्त दादांनी अर्थात माझे वडील प्रल्हाद शिंदे यांनी त्यांच्या अनुभवातून मला दिलेली त्यांच्या मार्गदर्शनाची आणि प्रेमाची शिदोरी. दादांच्या सान्निध्यात आणि धाकात शिकलो, म्हणूनच आजदेखील मी गातोय. रियाज अखंड सुरू आहे आणि पुढच्या पिढीतही तो रुजला आहे. अर्थातच याचं सर्व श्रेय दादांच्या त्या कुडाच्या घरात केलेल्या मडक्यातील रियाजाचं आहे!

रेकॉर्डिंग करतोय. स्टेजवर गातोय. परिस्थिती कशीही असो गळा बसला, सूर लागला नाही, गाता गाता गळ्यात खराश आली असं कधीच झालं नाही. इतकंच नाही तर साधं बोलतानासुद्धा माझा आवाज कधी थरथरत नाही.

शाळेत सुरुवातीला मला प्रल्हाद शिंदेंचा मुलगा म्हणून ओळख नव्हती. पण दादा एकदा मला शाळेत सोडायला आले आणि मी प्रल्हाद शिंदे यांचा मुलगा असल्याचं शिक्षकांना कळलं. दुसरी-तिसरीला असताना शिक्षकांच्या आग्रहास्तव मी दादांचं (प्रल्हाद शिंदे) पहिल्यांदा गाणं गायलं, ‘उड जायेगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली’ हे ते गाणं... ते गाणं गाणे माझ्या गळ्याची ओळख करून द्यायला कारणीभूत ठरलं.

खरंतर दादांचा आवाज जितका खडा, जितका भेदक, खणखणीत तसाच त्यांचा स्वभावदेखील होता. अगदी सरळ, स्वच्छ, पण तितकाच कडकदेखील. दादा हे त्या काळात फारच व्यग्र असत. कधी कार्यक्रमांच्या दौऱ्यांमध्ये, कधी ध्वनिमुद्रणामध्ये तर कधी त्यांच्या सांगीतिक मित्रांच्या कळपात. दादांचं संगीत, लोकसंगीताच्या पलीकडे फारशा आवडीनिवडी नव्हत्या. मात्र त्यांचं आपल्या मुलांच्या गाण्यावर पूर्ण लक्ष होतं. दादांनी माझ्यातील गाण्याची आवड हेरली आणि मला तालीम द्यायला सुरुवात केली.

दादा वेळ मिळाला की आम्हाला रियाज करण्यासाठी घेऊन बसत असत. त्यांच्या रियाजाची पद्धतदेखील त्यांच्यासारखीच बिनधास्त आणि खणखणीत. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. शेजाऱ्यांच्या तक्रारी सुरू झाल्या. त्या चुकीच्याही नव्हत्या. त्यावेळी आम्ही कल्याणला कोळसेवाडीत राहायचो. आमची घरंही काही पक्की नव्हती. कुडाची होती. म्हणजे लाकडाच्या बांबूनी बनवलेल्या भिंती. त्यामुळे आमचा रियाज सुरू झाला, सूर लावला की त्यांचा तक्रारींचा पाढा आम्हाला ऐकायला मिळायचा. दादांना हे समजल्यावर त्यांनी त्यावरही नामी शक्कल लढवत रियाजचा नवा मार्ग शोधला.

एके दिवशी दादा तडक घरामध्ये भलं मोठं मडकं घेऊन आले. मला म्हणाले, ‘‘यात कर रियाज. तुझा आवाज बाहेर जाणार नाही, इतरांना त्रासदेखील होणार नाही. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मडक्यात जेव्हा रियाज करशील तेव्हा तुझा तुलाच आवाज येईल. तुझे सूर तुला ऐकायला येतील आणि कळतीलही. ध्वनिमुद्रणाप्रमाणे तुला तुझ्या गाण्यातील बारकावे समजतील. यामुळे रियाजासह तुझं गाणं आणखी प्रगल्भ होईल.’’ हे दादांचे बोल, तंतोतंत खरे ठरले.

आमच्या घरात खेळणी कमी आणि पेटी म्हणजे हार्मोनियम, तबला ही सांगीतिक वाद्येच जास्त असायची. मी आणि मिलिंद बाहेरून फिरून, खेळून आलो की अनेकदा आमचा हात पेटीवर फिरायचा. कधी आमची कोवळी बोटं तबल्यावर थिरकायची. दादा हे सर्व टिपत होते. मी आणि मिलिंदने तबला शिकावा, असं दादांना वाटत होतं. एके दिवशी दादा मला म्हणाले, ‘‘आनंदा तू तबला शिक. मी शिकवेन तुला. तबला शिकावसं मलाही वाटत होतं; पण दादांच्या कडक स्वभावाची आम्हाला माहिती होती. गाणं किंवा संगीतवाद्य शिकवताना दादा कोणताही समझोता करायचे नाहीत. त्यामुळे तबल्यासोबत दादांची थाप आमच्यावरही पडेल, याची जाणीव आम्हाला होतीच. मी दादांकडून तबला शिकायला तयार झालो; पण मिलिंदची हिंमत काही होत नव्हती. तो दुरूनच आमचं तबलावादन बघत होता. मी दादांचा ओरडा, मार खात तबला शिकत होतो आणि मिलिंद दूर बसून माझं आणि दादांचं अनुकरण करत होता. परिणाम हा झाला की मिलिंदला आम्ही उलटे दिसत असल्याने तो उलट्या हाताने तबला वाजवायला शिकला. हार्मोनियमदेखील मिलिंद उलट्या हातानेच वाजवतो.

दादांच्या तालमीत रियाज आणि गाणं सुरू होतं... पण दादांची पोचपावती, कौतुकाची थाप मला मिळायची बाकी होती. त्यासाठी माझी धडपड सुरू होती. ही धडपड केवळ माझीच नाही तर प्रसिद्ध गायक गोविंद म्हशीलकर आणि श्रावण यशवंत यांच्या मुलांचीदेखील होती. आम्ही सर्व समवयस्क होतो. सर्वांचाच स्ट्रगल त्यावेळी सुरू होता. आता आम्हाला एका कार्यक्रमात दादांसह इतर मोठ्या पाहुण्यांसमोर गाणं गायची संधी मिळली. संधी तर मिळाली; पण फक्त पाच मिनिटांची. आता कसं करणार, हा मोठा प्रश्न होता; पण संधीचं सोनं करायचंच असा मी ठाम निर्धार केला. माझा नंबर येताच मी स्टेजच्या खालूनच सूर लावण्यास, माईक सेट करण्यास सुरुवात केली. त्यामुळे माझा बराच वेळ वाचला. वाचलेली ती पाच मिनिटे मी स्टेजवर वापरली. त्यावेळी माझंच गाणं पूर्ण दहा मिनिटे सुरू होतं. मी गाणं पूर्ण गायलं, ते सर्वांनी ऐकलं. दादांना माझं गाणं खूप आवडलं. दादा खूश झाले. म्हणाले, ‘‘मला मरण आले तरी चालेल, कारण माझा वारसा चालवायला आता आनंद तयार झाला आहे.’’ दादांचे कौतुकाचे बोल ऐकायला मीही कित्येक वर्षें आसुसलो होतो. ती माझी इच्छा पूर्ण झाली होती. दादांचे ते बोल आठवले की, आजही माझ्या डोळ्यांच्या कडा आपसूकच ओल्या होतात.

रियाज कसा करता, कधी करता असा सवाल मला अनेकदा विचारला जातो; पण रियाजाचं शास्त्र काही माझ्याकडे नाही. माझ्याकडे आहे ती फक्त दादांनी त्यांच्या अनुभवातून मला दिलेली त्यांच्या मार्गदर्शनाची आणि प्रेमाची शिदोरी. मी कधी ठरवून रियाज केलेला मला आठवत नाही. तसा वेळही मला कधी मिळाला नाही. जिथे वेळ मिळेल तिथे आपलं गाणं सुरू होतं. हाच माझा रियाज. कधी प्रवासात, कधी कार्यक्रमाची तयारी करताना, कधी स्टेजच्या मागे, कधी प्रत्यक्ष स्टेजवर गाणं गातानाच माझा रियाज होतो...

व्हीनसने माझ्या गाण्याची पहिली कॅसेट काढली. त्यापूर्वी दादांच्या दोन गाण्यांमध्ये मला कोरस करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर मला कधीही वळून मागे बघावं लागलं नाही. नवीन पोपटाने तर त्यावेळी ‘रेकॉर्ड ब्रेक’ केला. कामाचा ओघ सुरू होता. रात्रंदिवस रेकॉर्डिंग सुरू असायचं. जेवायलाही फुरसत नसायची. जलसा, कव्वाली, गीतांचे कार्यक्रम करायला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावं लागायचं. २४ तास फक्त गाणं, गाणं आणि गाणंच होतं. हाच माझा रियाजदेखील होता. दादांच्या सान्निध्यात आणि धाकात मी जे काही शिकलो, ते मी जगातील कोणत्याही स्टुडिओत शिकलो नाही. म्हणूनच आजदेखील मी गातोय. रेकॉर्डिंग करतोय. स्टेजवर गातोय. परिस्थिती कशीही असो गळा बसला, सूर लागला नाही, गाता गाता गळ्यात खराश आली असं कधीच झालं नाही. इतकंच नाही तर साधं बोलतानासुद्धा माझा आवाज कधी थरथरत नाही. मी आणि मिलिंद रियाझ करताना कोण वरच्या पट्टीत गातोय याची आमच्या दोन भावंडात स्पर्धा सुरू असायची आणि हाच आमचा रियाज असायचा. एकदा का सूर लावला की तो शेवटच्या रसिकांपर्यंत त्याच्या हृदयाला जाऊन भिडणार, याची मला खात्री असते.. शो आणि रेकॉर्डिंग करण्यापूर्वी रिहर्सल आणि शो परफॉर्म करण्याचा रियाज आजही अखंड सुरू आहे आणि पुढच्या पिढीतही तो रूजला आहे. अर्थातच याचं सर्व श्रेय दादांच्या त्या कुडाच्या घरात केलेल्या मडक्यातील रियाजाचं आहे!

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com