
शिंदेशाही ब्रँड!
शिंदेशाहीला तीन पिढ्यांचा व्यावसायिक क्षेत्रातील विकसित झालेला दृष्टिकोन आहे. सुरुवातीला प्रल्हाद शिंदे, आनंद आणि आता आदर्श शिंदे यातून निर्माण झालेला हा ब्रँड आहे. आदर्श शिंदेने या क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा त्याला पहिले गाणे मिळाले ‘आता होऊन जाऊ द्या या’ रिॲलिटी शोमध्ये. यात आदर्शच्या बँडचे नाव शिंदेशाही होते. त्यावेळी पहिल्यांदा शिंदेशाही हा ब्रँड रजिस्टर झाला. तिथूनच या शिंदेशाहीला एक भव्यता मिळाली. गाणं भव्य होत गेले. संगीत भव्य होत गेले.
आमच्या घराण्यातील लोकगीते, भक्तिगीत गायकी, वारशाकडे वेगवेगळ्या वाहिन्यांचे लक्ष गेले. त्यांनी याला कमर्शियल टच दिला. आमच्याकडे असलेली अनेक मोठी गाणी लक्षात घेऊन वाहिन्यांनी ‘तुम्ही लाईव्ह कार्यक्रम का करत नाही’, अशी विचारणा केली. मग शिंदेशाहीची लोकप्रियता कॅश करण्यासाठी सुरुवातीला कलर्सवर ‘शिंदेशाही’ हा लाईव्ह कार्यक्रम सुरू झला. त्याने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडले. झी युवाने ‘शिंदेशाही बाणा’ सुरू केला, तर झी टॉकीजने ‘शिंदेशाही पर्व.’ त्यानंतर शिंदेशाहीचे महामानवाला वंदना कार्यक्रम झाला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आदी सर्वच महामानवांवर आधारित हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचा त्यानंतर पुढचा कॉन्सर्ट सुरू केला.
प्रल्हाद शिंदे यांनी अनेक भक्तिगीते गायली. ऐका सत्यनारायणाची कथा हे त्यांचे गाजलेले भक्तिगीत. त्यांचा हा वारसा पुढे कसा घेऊन जायचा, असा विषय होता. त्यातून प्रल्हाद ते आल्हाद अशी शिंदे कुटुंबातील पाचवी पिढी समोर आली. शिंदेशाहीपासून सुरू झालेला वारसा आता अनेक संकल्पनांना घेऊन पुढे सुरू झाला आहे.
सुरुवातीला आम्ही केवळ कार्यक्रम घ्यायचो. त्यावेळी शिंदेशाही आदी संकल्पना नव्हत्या; परंतु अशा संकल्पना घेऊन काम केल्यास प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो, हे माझ्या लक्षात आले. महाराष्ट्रात शिंदे घराण्याच्या गायकीला मानणारा एक मोठा वर्ग आहे. कार्यक्रमाचे डिजाईन करताना आम्ही खूप विचार करायचो. प्रत्येकाला आपले वाटणारे पोपटावरील गाणे, भक्तिगीते आणि ‘पाऊले चालती पंढरीची वाट’सारखे वारकऱ्यांनाही आपलेसे वाटणाऱ्या गाण्यांचा त्यात समावेश केला. ‘आवाज वाढव डीजे’सारखी थिरकायला लावणारी गाणी त्यामध्ये घेतली. सर्व वयोगटातील लोकांना आवडणाऱ्या गाण्यांचा समावेश केला. त्यामुळे या नवनव्या संकल्पना लोकांनी उचलून धरल्या.
प्रल्हाद शिंदेपासून ते आत्तापर्यंतचा सर्व कार्यक्रमांचा फ्लो बनवायला सुरुवात केली. सर्व वाहिन्यांना वेगवेगळे परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदेंसह उत्कर्ष, आल्हाद आदींचा परफॉर्मन्स होता. या कार्यक्रमात सेलिब्रटीज डान्सही ठेवला. कार्यक्रम लोकप्रिय झाले.
‘भीमराव एकच राजा’ या गाण्यात व्यापक बदल केला. मोठे कलावंत, मोठा स्टेज होता. महत्त्वाचे म्हणजे या गाण्यांची पार्श्वभूमी प्रेक्षकांना सांगायलाही आम्ही सुरुवात केली. त्यात एक वेगळीच मजा होती. ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ हे प्रल्हाद शिंदे यांनी गायले; मात्र या गाण्याचा संगीतकार कोण, ते कुणी लिहिले, ते कसे गायले हे कुणाला माहिती नव्हते. त्याची माहिती सांगण्यास सुरुवात केली.
आजही कोल्हापूरमध्ये शो झाल्यास ‘उदो उदो अंबाबाई’ हेच गाणे लागते. जेजुरीला गेलो तर खंडोबारायाचे. प्रत्येक शोमध्ये बदल करतो, म्हणजे एका शोमध्ये बाप्पा मोरीया रे, तर दुसऱ्या कार्यक्रमात ताशाचा आवाज तर्रर्रर्र झाला, गणपती माझा नाचत आला, अशी गाणी गातो. संपूर्ण महाराष्ट्राचे दर्शन या गाण्याच्या माध्यमातून आम्ही देतो.
आदर्श आणि उत्कर्ष यांना घेऊन लोकांना काय हवे याचा आम्ही विचार केला. काहींना भक्तिगीतेच पाहिजे, कोणाला इतर गाणी पाहिजे. त्याच पद्धतीची गाणी आम्ही द्यायला सुरुवात केली. उदाहरणार्थ झी टॉकीजला महामानवाची गाणी पाहिजे होती. त्यामुळे जितके महामानव होते, त्यांची गाणी या कार्यक्रमाला दिली. त्याचे डिझाईन काय असले पाहिजे याचा विचार केला. शिंदेशाहीकडे १५ हजार गाणी आहेत. त्यातली कुठली गायची, कार्यक्रमाचा फॉरमॅट कसा बदलायचा. आत्ताच्या पिढीला ही गाणी कशी अपील होतील, यासाठी आम्ही त्याचे प्रेझेंटेशन बदलले. आता सोनीवर आम्ही ‘बोला जय भीम’ हा शो केला. त्यात उत्कर्ष गाणी गायला, सोबत डान्सही केला.
पहिला लाईव्ह कन्सर्ट ठाण्यात झाला. आदर्शने विविध सादरीकरणाची तयारी केली होती. शूट होण्यापूर्वी मुलांनी मला रथात बसवले. त्यावेळी आम्हाला कोणती गाणी हवी ते ठरवले. तीन तास गाणी सुरू होती. त्यावेळी लोकही थांबूनच होते. हा कार्यक्रम लाईव्ह झाला आणि त्याला दुप्पट टीआरपी मिळाला.
या सर्व प्रयोगानंतर आम्ही विजया आनंद म्युझीक नावाने प्रोडक्शन हाऊस काढले. आता शिंदेशाही आणि आदर्श शिंदे प्रोडक्शन हाऊस सुरू झाले आहे. या हाऊसमधून नंदू नटवरे आणि चाकोरी या दोन फिल्मचे काम सुरू आहे.
वर्षभरात शिंदेशाहीचे सात ते आठ कार्यक्रम होतात. प्रत्येक कार्यक्रमात नावीन्य आणण्याचा प्रयत्न आमचा आहे. प्रल्हाद शिंदे यांची गाणी सिंफणीमध्ये आली तर कशी होतील, ती संकल्पना आणि सादरीकरण आम्ही यावेळी करतोय. त्यामुळे आता पुढे नवीन शिंदेशाही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
याशिवाय शिंदेशाहीच्या माध्यमातून आम्ही रिॲलीटी शो, सीरियल करणार आहोत. रिॲलिटी शोच्या माध्यमातून आम्ही नवीन कलावंतांना पडद्यासमोर आणणार आहोत. वाड्यावर, वस्तीवरही जाऊन टँलेट हंट करण्याचे आमचे नियोजन आहे. आम्हाला लोकांनी भरभरून दिले आहे. ते समाजाला परत करण्याचे कर्तव्य या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आमच्यासोबत आम्हाला अनेक शिंदेशाहीसारखे परिवार तयार करायचे आहेत. मी शिकलो नाही, मात्र तरीही लोकांनी एवढे भरभरून प्रेम केले. त्यामुळे इतर लोकांना तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.
vijayaanandmusicpvtltd@gmail.com
Web Title: Aanand Shinde Writes Shindeshahi Brand Entertainment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..