दादांशिवाय विठ्ठलाची भक्ती अपुरी!

शिंदे घराण्याला खरी ओळख दिली ती प्रल्हाद शिंदे यांनी! त्यांच्या अजरामर भक्तिगीतांमुळे ते घराघरांत पोहोचले.
Pralhad Shinde
Pralhad ShindeSakal
Summary

शिंदे घराण्याला खरी ओळख दिली ती प्रल्हाद शिंदे यांनी! त्यांच्या अजरामर भक्तिगीतांमुळे ते घराघरांत पोहोचले.

शिंदे घराण्याला खरी ओळख दिली ती प्रल्हाद शिंदे यांनी! त्यांच्या अजरामर भक्तिगीतांमुळे ते घराघरांत पोहोचले. सुपर हिट गाण्यांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली असली, तरी त्यांनी आपला साधेपणा सोडला नाही. स्वतःच्या जीवापेक्षा त्यांनी संगीतावर अधिक प्रेम केलं. वेळप्रसंगी गरजू लोकांना मदत करणं, कलेची जाण असलेल्यांसाठी धावून जाणं असो, ते कायम एक पाऊल पुढे असायचे. दोन वेळा हृदयविकाराचा त्रास होऊनही त्यांनी गाणं सोडलं नाही. आज जरी ते आपल्यात नसले तरी भक्तिगीतांमधून ते कायम स्मरणात असतील...

कितीही सूर मिळवावा, तरी सूर हा लागत नाही,

कितीही ऐकलं, तरी भूक काही भागत नाही...

कथा सत्यनारायणाची, खोटं मी सांगत नाही,

पण त्या प्रल्हादाच्या आवाजाशिवाय, तो पंढरीचा विठ्ठल जागत नाही..!

स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या १८ व्या स्मृतिदिनी शिंदे घराण्याला ‘मोस्ट रेकॉर्डेड आर्टिस्ट इन फॅमिली’ हा पुरस्कार मिळाला. हा तसा आमच्यासाठी आनंदायी योगागोय होता. प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या कारकिर्दीत १५ हजारांवर गाणी गायली. अगदी तमिळ, उर्दू, भोजपुरीसह इतर सहा विविध भाषांमध्ये त्यांनी गाणी केली होती. विशेष म्हणजे प्रल्हाद शिंदे यांना संगीताचा तसा कुठलाही वारसा मिळाला नव्हता. केवळ आई-वडील दारोदारी हिंडून गाणी गात. त्यातून जमेल तसं शिकून प्रल्हाद शिंदे यांनी लोकसंगीतापासून ते सिनेमापर्यंतची अनेक गाणी गायली. केवळ गायलीच नाही, तर ती प्रचंड हिटसुद्धा झाली. वडिलांनी भक्तिगीत, भारूड, कोळीगीत, कव्वालीपासून, संत, दर्गा, मशीद, नबीपासून ते कामगार, शेतकऱ्यांच्या सुख-दुःखाची सर्व गाणी गायली. ती परंपरा आम्ही पुढे नेतोय याचा आनंद आहे.

वडिलांना मी दादा म्हणायचो. घरातल्या सर्वात मोठ्या माणसाला दादा असं म्हटलं जातं. प्रल्हाद शिंदे आमच्यासाठी घरातला बाप, सर्वकाही होते. ते एवढे मोठे होते, तरीही ते माझ्यासोबत, नातवंडांसोबत मित्र असल्यासारखे वागायचे. आम्हाला गाणी, त्यातील बारकावे शिकवायचे...

निबिड जंगले तुडवत आलो, फोडूनही या टाहो,

रथ समतेचा असा आणिला, सांभाळून न्या हो...

आदर्श शिंदे याने जेव्हा हे गाणं गायलं तेव्हा दादांनी स्टेजवर येऊन मनगटी घड्याळ नातवाला दिलं. ते कायम म्हणायचे की, गाणं गाणे म्हणजे लिहिलेल्या गोष्टी सुरात गाणे असं होत नाही, तर त्यात गाण्याच्या भावना आल्या पाहिजे. मातीतील गाणं हे मातीतीलच वाटलं पाहिजे. ते म्हणायचे, गाणं असं गायचं की प्रत्येक माणसाला ते त्याचं वाटलं पाहिजे. कव्वालीचा बाज, गाण्यातील लहेजा, त्यातील बारकावे त्यांनी मला, नातवंडांना शिकवले. लोकगीतातल्या त्याच गोष्टी आज मात्र मॉडर्न स्वरूपात सांगितल्या जातात.

दादांनी एक गोष्ट आमच्यात कायम ठसवून सांगितली, ती म्हणजे कुणाची तरी कॉपी करून तुम्ही तुमचा ठसा कधीच उमटवू शकणार नाही. त्यांची असंख्य भक्तिगीतं सुपर हिट झाली, म्हणून तुम्हीही भक्तिगीतच गायले पाहिजे, असे मुळीच होत नाही. तुमच्या नावात शिंदे असले तरी तुम्ही सर्वांनी आपापली वेगवेगळी स्टाईल निर्माण करा. एकमेकांची कॉपी अजिबात करू नका. सोनं जरी तेच असलं, तरी त्याची अंगठी करायची, हार करायचा की पाटल्या करायच्या, हे तुमचं तुम्ही ठरवा, असे ते नेहमी सांगायचे. त्यांच्या शिकवणुकीचा परिपाक म्हणजे आज शिंदे कुटुंबातल्या सर्वांच्या गाण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. मी, मिलिंद, आदर्श, उत्कर्ष, अगदी आल्हाद या सर्वांची गाण्याची स्टाईल वेगळी आहे. दादा आमच्यासाठी कल्पतरू होते, त्यांच्या फॅक्टरीतून आम्ही आज समोर आलो आहोत.

दादांचा साधेपणा आम्ही लहानपणापासून अनुभवला. एकदा ते रेल्वेने प्रवास करत होते. दोन अंध मुले त्यांचेच ‘आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हनत्यात ते दावशील का’ हे गाणं गात होते. एका ठिकाणी गाण्यात त्या मुलांची चूक झाली. दादांनी त्या मुलांना जवळ बोलावलं आणि म्हणाले, ‘बेटा, ही लाईन अशी नाही, अशी आहे. त्यांनी स्वतःच ते गाणं त्यांना गाऊन दाखवलं. ती अंध मुले म्हणाली, ‘काका, तुम्ही हुबेहूब प्रल्हाद शिंदे यांच्यासारखंच गाता. मुले अंध असल्यामुळे त्यांना कळलं नाही; मात्र त्या डब्यातील इतर प्रवाशांना प्रत्यक्ष प्रल्हाद शिंदे गात असल्याचे लक्षात आले. गाणं गायल्यानंतर सर्व प्रवाशांनी पैसे दिले. जमलेले सर्व पैसे दादांनी त्या अंध मुलांना दिले.

दादा वारीत दरवर्षी गाणं गायचे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो की पँथरची चळवळ, त्यांनी अनेक चळवळीतील स्टेज आपल्या गाण्याने गाजवल्या. सामाजिक चळवळीप्रतीचे कर्तव्य त्यांनी आयुष्यभर निभावले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही सर्वजण मार्गक्रम करतो आहे. दादा सांगायचे, आपल्या यशामागे अनेक कलावंतांचे हात आहेत. त्यामुळे त्यांना कधीच विसरू नका. त्यामुळे कुठल्याही कलावंतांचे निधन झाले की ते त्यांच्या अंत्ययात्रेला जात असत. ते ओळखीचे असो अथवा नसो. वडिलांनी घालून दिलेला हा नियम आजही आम्ही पाळतो.

दादांची एक महत्त्वाची शिकवण होती. ते म्हणायचे, तुम्हाला जेवढं लागतं, तेवढंच घ्या. आवश्यकतेपेक्षा अधिक मिळालं तर ते तुम्ही समाजाला परत द्या. दादा तळेगावच्या अंध आश्रमात नियमित जायचे. मुलांसाठी गाणं गायचे. आश्रमात ते पंखे, इतर वस्तू नियमित द्यायचे. शेवटच्या काळात दादांचे गायकाचे समर्पण काय असते, त्याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका येऊन गेला. डॉक्टरांनी त्यांना गाणं न गाण्याचा सल्ला दिला; मात्र ते कल्याणमध्ये एका कार्यक्रमात गायले. त्यांना तिसरा हृदयविकाराचा धक्का आला. ते स्वतःच्या जीवापेक्षा प्रेक्षकांसाठी जास्त जगले. लोक मला ऐकण्यासाठी येतात. मला गावंच लागेल, असाच त्यांचा आग्रह असायचा. ‘तुमचं गाणं, तुमचा काम’, हाच खरा पुरस्कार आहे. तुम्ही मेल्यानंतर तुम्ही तुमच्या गाण्यातून जिवंत राहता. त्यामुळे प्रत्येक गाणं नवं गाणं आहे आणि अखेरचं गाणं आहे, असे गा. ते लोकांच्या स्मरणात राहाव असं गा’, असे ते नेहमी सांगायचे.

वडिलांनी कायम थोर पुरुषांची शिकवण आठवण ठेवली. ते म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी भूमिका घेतली नसती तर आपलं काय झालं असतं. बाबासाहेब नसते तर आपण झाडूच मारत बसलो असतो. त्यांनी आपल्यासाठी कवाडं उघडून दिली म्हणून आपण आकाशात विहार करतो. त्यामुळे आपण आपलं मूळ विसरता कामा नये. मूळं सोडली तर तुमची गत तुटलेल्या पतंगासाखी होईल. विश्वविक्रम झाला तेव्हा मला विचारलं की तुमच्या यशाचा वाटा कुणाचा आहे. मी म्हटलं, ‘यामागे केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे महापुरुष नसते तर आम्ही इथे नसतो.’

प्रल्हाद शिंदे आज आपल्यात नाहीत; मात्र त्यांच्या गाण्याच्या रूपात ते अजरामर आहेत. कल्याणमध्ये त्यांचा पुतळा उभारला आहे. दरवर्षी स्मृतिदिनाला न चुकता राज्यातून असंख्य लोकगायक इथे जमतात आणि प्रल्हाद शिंदे यांची गाणी गातात आणि त्यांच्या आठवणी जागवतात.

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com