विक्रम गोखलेंवर टीका करणाऱ्यांवर आरोह वेलणकरचा टोला, म्हणाला...| Aroh Welankar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikram Gokhale and Aroh Welankar
विक्रम गोखलेंवर टीका करणाऱ्यांवर आरोह वेलणकरचा टोला, म्हणाला...

विक्रम गोखलेंवर टीका करणाऱ्यांवर आरोह वेलणकरचा टोला, म्हणाला...

ब़ॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या स्वातंत्र्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज (१९ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत 'मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. कंगनाला मी ओळखत नाही. पण भारतीय स्वातंत्र्याबद्दल तिने केलेल्या वक्तव्याला तिची स्वत:ची काही कारणं असू शकतात. तसचं मी तिच्या वक्तव्याला पाठींबा दिला. यामागेही माझी स्वत:ची काही कारणं असू शकतात. असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले. आता यावर अभिनेता आरोह वेलणकरने विक्रम गोखलेंची बाजू घेत त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना जोरदार टोला दिला आहे.

आरोहने ट्विट करत लिहिले, 'क्रांती रेडकरच्या वेळेस गप्प बसलेले सो-कॉल्ड कलाकार सगळे विक्रम गोखलेंवर टिका करायला आले. त्या वेळेस घाबरले होते बहुतेक,’ क्रांती रेडकरचे पती समीर वानखेडेवर अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले होते. त्यावेळी क्रांती रेडकरला पाठिंबा देण्यासाठी कोणताही मराठी कलाकार पुढे आला नव्हता. आता तेच कलाकार विक्रम गोखलेंवर टीका करत आहेत, यावरून आरोहने खोचकपणे ट्विट केलं आहे.

समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप झाल्यानंतर क्रांतीने त्यावर भाष्य केलं होत. त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतून फक्त आरोहने क्रांतीला पाठींबा दर्शवला होता.‘क्रांती मला खरंच आश्चर्य वाटतंय की आपल्या मराठी इंडस्ट्रीमधील एकही मित्र तुझ्या पाठींब्यासाठी उघडपणे समोर आलेला नाही. सोशल मीडियावरून सुरु असलेली तुझ्या कुटुंबाविरोधातील ही पीआर मोहीम अस्वस्थ करणारी आहे. मला माहित आहे आपण खूप चांगले मित्र नाही फक्त ओळखीचे आहोत. मात्र तरीही माझा तुला पूर्णपणे पाठिंबा आहे,’ असं ट्विट आरोहने त्यावेळी केलं होतं.

loading image
go to top