
सलमानचा मेहुणा पुण्याच्या रस्त्यावर धावला ३३ किमी; जाणून घ्या कारण..
प्रवीण तरडे दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटाचा हिंदी रिमेक 'अंतिम: द फायनल ट्रुथ' Antim: The Final Truth लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत Salman Khan त्याचा मेहुणा आयुष शर्मा Aayush Sharma मुख्य भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी आयुषने बरीच मेहनत घेतली आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनसाठी आयुष पुण्यातील रस्त्यावर तब्बल ३३ किलोमीटर धावला. 'अंतिम'चं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. येत्या २६ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटात आयुष हा राहुलिया ही भूमिका साकारत आहे. क्लायमॅक्स सीन शूट करण्यासाठी जवळपास पाच ते सहा तास लागले आणि या वेळेत आयुषला तब्बल ३३ किलोमीटर धावावं लागलं. पुण्यात हा सीन चित्रित करण्यात आला. चित्रपटातील भूमिकेविषयी आयुष म्हणाला, "मला या भूमिकेसाठी शारीरिक मेहनत खूप घ्यावी लागली. कारण मला ऑनस्क्रीन फिट दिसायचं होतं. या भूमिकेने मला खूप काही दिलं. एक अभिनेता म्हणून यातून मी खूप काही शिकलो. महेश सर, सलमान भाई यांनी माझी खूप मदत केली."
चित्रपटात सलमान खान एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर आयुष हा गुंडाची भूमिका साकारणार आहे. 'अंतिम : द फायनल ट्रुथ' हा चित्रपट 'मुळशी पॅटर्न' या मराठी सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. चित्रपटाची निर्मिती सलमाननेच केली आहे. त्याचप्रमाणे यात तेलुगू अभिनेत्री प्रज्ञा जैस्वाल, सयाची शिंदे, महिमा मकवाना हे कलाकारदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.