कोल्हापूर देतं स्वप्न अन्‌ त्यासाठीचं बळही...!

संभाजी गंडमाळे
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

बालपणीचा हा सुखाचा काळ मस्तपणे एन्जॉय करतानाच कोल्हापूरनं स्वप्नं पहायला शिकवलं आणि ती पूर्ण करण्याचं बळही दिलं.

- अभिराम भडकमकर, प्रसिद्ध अभिनेता, लेखक, दिग्दर्शक

मी वि. स. खांडेकर प्रशालेचा विद्यार्थी. शाळेतच नाटकाविषयीचं वातावरण इतकं चांगलं होतं की आमच्यासारखी पोरं आपसूकच तिकडे आकर्षित झाली. त्यातही मंदाकिनी खांडेकर आमच्या शिक्षिका. एकीकडे हा सारा शैक्षणिक प्रवास सुरू असताना टाकाळ्यावर बालपण फुलत होतं. याच परिसरात मी रहायला. टाकाळ्याच्या खाणीत पोहणं असो किंवा झाडावर चढून वेगवेगळे खेळ खेळणं असो, हे सारं काही सुरू असायचं. चोरून शूटिंग बघणं असायचं.

दादा कोंडके, अरुण सरनाईक, अशोक सराफ, अनंत माने यांच्या कामाची पद्धती अगदी जवळून पहायला मिळायची. थोडक्‍यात काय तर बालपणीचा हा सुखाचा काळ मस्तपणे एन्जॉय करतानाच कोल्हापूरनं स्वप्नं पहायला शिकवलं आणि ती पूर्ण करण्याचं बळही दिलं...प्रसिद्ध अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अभिराम भडकमकर ‘सकाळ’शी संवाद साधत असतात आणि त्याचवेळी ते कोल्हापुरातील आठवणींत रममाण होत जातात. त्यांच्या या साऱ्या आठवणी आता लवकरच त्यांच्याच ‘इन्शाल्ला’ या कादंबरीतून वाचकांना अनुभवायला मिळणार आहेत. 

अभिराम यांनी आजवर आठ ते नऊ चित्रपटांत भूमिका केल्या. दोन चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातला ‘आम्ही असू लाडके’ या चित्रपटाची संकल्पना त्यांना कोल्हापुरातच सुचली आणि या चित्रपटाचे बहुतांश सर्व शूटिंग त्यांनी कोल्हापुरातच केले. अभिनय आणि दिग्दर्शनाबरोबरच हा माणूस अधिक काळ रमला तो लेखनामध्ये. आजवर त्यांनी वीसहून अधिक चित्रपटांसाठी पटकथा-संवाद लिहिले आहेत. ‘बालगंधर्व’ आणि ‘ॲट ऐनी कॉस्ट’ या कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. त्याशिवाय ‘चुडैल’ हा त्यांचा कथासंग्रहही प्रसिद्ध आहे. अकराहून अधिक नाटकंही त्यांनी लिहिली आहेत. नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांतही त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. नुकतेच त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. 

अभिराम सांगतात, ‘‘वि. स. खांडेकर प्रशालेनंतर बारावीपर्यंतचं शिक्षण कॉमर्स कॉलेजला झालं. चित्र व नाट्यसृष्टीत कितीही बिझी असलो तरी जेव्हा जेव्हा शक्‍य होईल, तेव्हा कोल्हापुरातच येतोच येतो. कारण इथून निघताना पुन्हा नवं काही करण्याची ऊर्मी मिळत असते....!’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhiram Bhadakamkar comment